राजू शेट्टी सभा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
L62666
गडहिंग्लज : ऊस तोड बंद आंदोलन प्रबोधनासाठीच्या सभेत बोलताना राजू शेट्टी. व्यासपीठावर राजेंद्र गड्ड्यान्नावर, आनंद कुलकर्णी, बसवराज मुत्नाळे आदी. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
——————
काटामारीतून ४५०० कोटींचा दरोडा
राजू शेट्टींचा आरोप : गडहिंग्लजला सभा, दोन दिवस ऊस तोड बंदचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांच्या उसाची काटामारी करण्याचे प्रमाण वाढते आहे. गतवर्षीच्या हंगामात टनामागे कमीतकमी दहा टक्के उसाची काटामारी गृहीत धरली तरी, राज्यातील २०० कारखान्यांच्या माध्यमातून १ कोटी ३२ लाख टन उसाची चोरी झाली असून त्या उसापासून उत्पादित साखर विक्रीतून ४ हजार ५०० कोटींचा दरोडा घातल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केला.
विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीतर्फे १७ व १८ नोव्हेंबर रोजी ऊस तोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्याच्या प्रबोधनासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान, यावेळी कार्यकर्ते अशोक पाटील यांच्यातर्फे शेट्टी यांची गुळाने तुला केली. लक्ष्मी मंदिर चौकात ही सभा झाली.
शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीच्या मोर्चामुळे बाहेरच्या काट्यावर वजन करून आणलेला ऊस कोणत्याही कारखान्याला नाकारता येणार नाही, असा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला. परंतु, केवळ यावरच आम्ही थांबणार नाही. सर्व २०० कारखाने जोपर्यंत डिजिटल वजनकाट्याद्वारे साखर आयुक्त कार्यालयाशी लिंकिंग होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील. गतवर्षी १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातील दहा टक्के काटामारीद्वारे मिळालेली साखर रात्री अपरात्री विक्री केली जाते. त्यातून मिळवलेला काळा पैसा कारखानदार घशात घालत आहेत. म्हणून स्वाभिमानीने काटामारीचा प्रश्‍न गांभीर्याने घेतला आहे.
ते म्हणाले, यंदाची एफआरपी १५० रुपयांनी वाढल्याचे केंद्र सरकार कांगावा करीत असले तरी प्रत्यक्षात ७५ रुपयेच वाढलेत. एफआरपीसाठी यंदा १० ऐवजी १०.२५ टक्के बेस पकडल्याचा हा परिणाम आहे. तसेच इथेनॉल निर्मितीसाठीही जास्त मोलॅसिस वळवली जात आहे. परिणामी, साखर उत्पादन कमी होऊन उतारा घटत आहे. दुसरीकडे इथेनॉल निर्मितीतून कारखानदार टनामागे ९०० रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न घेत आहेत. यातील ८० टक्के रक्कम शेतकऱ्‍यांच्या पदरात पडली पाहिजे. म्हणून आता साखर आणि इथेनॉल निर्मिती गृहीत धरून एफआरपीचे नवे धोरण राबवायला हवे. विविध मागण्यांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी ऊस तोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्याला शेतकरी आणि वाहतूकदारांनी साथ द्यावी.
संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, शेतकऱ्यां‍ना आपल्या घामाचे दाम देण्याचे काम स्वाभिमानी करीत आहे. शेट्टी यांच्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत असून ऊस तोड बंद आंदोलनाला साथ द्यावी.
तानाजी देसाई यांचेही भाषण झाले. बसवराज मुत्नाळे यांनी स्वागत केले. अ‍ॅड. आप्पासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सभेला स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.
….
चौकट…
ऊस तोड बंद कशासाठी ?
– कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करावेत
– साखर व इथेनॉल उत्पादनावर एफआरपीचे नवे सूत्र राबवावे
– जगात साखरेला वाढलेली मागणी लक्षात घेता यंदा टनामागे ३५० रुपये अधिक हवेत
– गतवर्षीच्या उसाला आणखीन २०० रुपये जादा द्यावेत
– ऊस तोड मजुरांसाठी सरकारने महामंडळ स्थापन करावे
– ऊस तोड मजूर व कारखान्यांतील दलाल मुकादमांची व्यवस्था संपवावी
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares