लोकसत्ता दुर्गा पुरस्कार : नामांकने पाठवण्यासाठी शेवटचे चार दिवस – Loksatta

Written by

Loksatta

मुंबई : सामाजकार्य, उद्योग, शिक्षण, विज्ञान, आरोग्य, क्रीडा, मनोरंजन, पर्यावरणरक्षण, शेती, अशा विविध क्षेत्रांमधील प्रेरणादायी स्त्रियांची माहिती ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२२’करिता पाठवण्यासाठी शेवटचे चार दिवस उरले आहेत. दरवर्षी नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं नऊ स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांसाठी ११ सप्टेंबर २०२२ (रविवार) पर्यंत ‘लोकसत्ता’कडे नामांकने पाठवता येणार आहेत.
एखाद्या वेगळय़ा वा पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्रीने गाजवलेले कर्तृत्त्व, प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या व्यवसायातून इतर स्त्रियांसाठीही निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधी, शिक्षणाचा घेतलेला वसा, विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधनात गाठलेली उंची, शेती वा ग्रामीण विकासातली भरारी किंवा अनेकांची मोट बांधून उभारलेले सामाजिक काम, असे कोणतेही विधायक काम हाती घेतलेल्या सामान्य स्त्रियांची माहिती या पुरस्कारांसाठी पाठवता येणार आहे. राज्यभरातून अशी नामांकने ‘लोकसत्ता’कडे येत आहेत. या सर्व नामांकनांतून तज्ज्ञ परीक्षक समितीने निवडलेल्या नऊ स्त्रियांना ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’चा सन्मान प्रदान केला जातो. गेली आठ वर्षे हा उपक्रम सुरू आहे.
नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका पुरस्कारप्राप्त स्त्रीची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाणार आहे, तसेच त्यानंतर होणाऱ्या रंगतदार सोहळय़ात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गाचा सन्मान केला जाणार आहे.
माहितीत काय असावे? सामान्य नागरिकांमधील जी कर्तृत्त्ववान स्त्री ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’साठी पात्र ठरू शकेल असे आपल्याला वाटते अशा स्त्रीचे नाव सुचवून वाचक तिची माहिती पाठवू शकतात. ही माहिती ‘लोकसत्ता’कडे सुमारे ५०० शब्दांत आणि केवळ मराठीतच लिहून वा टाईप करून पाठवावी. इंग्लिशमध्ये पाठवलेले अर्ज अपात्र ठरवले जातील, तसेच ११ सप्टेंबरनंतर मिळालेले अर्जही अपात्र ठरतील. अर्जात संबंधित स्त्रीचे वेगळेपण, तिचा संघर्ष, विधायक काम आणि प्रेरणादायित्त्व याची माहिती देणे आवश्यक आहे. त्याबरोबर त्या स्त्रीचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडीही पाठवणे आवश्यक.
हे महत्त्वाचे :
*  माहिती फक्त मराठीत, नोंदी स्वरूपात आणि एकदाच पाठवावी.
*  संबंधित स्त्रीचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.
*  माहिती पाठवण्याची अंतिम तारीख आहे ११ सप्टेंबर २०२२.
माहिती कुठे पाठवाल? माहिती loksattanavdurga@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी. ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२’साठी असा स्पष्ट उल्लेख करावा. माहिती प्राप्त झाल्यानंतर दुर्गाची निवड करण्याच्या काळात ‘लोकसत्ता’कडून त्याविषयी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार वा दूरध्वनी संवाद केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. पुरस्कारप्राप्त दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’मध्ये थेट २६ सप्टेंबरपासून प्रसिद्ध केली जाईल.
मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares