Parbhani : परभणीत शिवसेनेचा बेधडक मोर्चा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
परभणी : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह पीक विम्याच्या रक्कमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात याव्यात, या मागण्यांसाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मंगळवारी (ता.१५) हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यातील युती सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. असे असतानाही राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही मोजक्याच महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे घोषित करण्यात आले. वास्तविक जिल्ह्यातील सर्वच महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली. असे असले तरी राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला नाही. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. अनेक शेतकऱ्यांना तर मागील वर्षाचे अनुदानही मिळालेले नाही. यावर्षी जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या धरणामध्ये मुबलक पाणी असूनही ते शेतीसाठी सोडले जात नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या विरोधात शेतकऱ्यांचा आवाज व त्यांच्या समस्या राज्य सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मंगळवारी (ता.१५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिवार बाजार परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो शिवसैनिक, शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र वायकर, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमख ज्योती ठाकरे, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले. जिल्हा प्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, डॉ. विवेक नावंदर, अंबिका डहाळे, रवींद्र पतंगे, सखूबाई लटपटे, अरविंद देशमुख, संजय गाडगे आदींसह हजारो शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते.
राज्यातील शिंदे सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे काही घेणे- देणे नाही. कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात, परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याची गरज नाही. असे बेजबाबदार व्यक्तव्य करून शेतकऱ्यांच्या दु:खावर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या परभणी व बीड जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी बेधडक मोर्चाच्या माध्यमातून चेतावणी देण्याचे काम करण्यात आले आहे.
– अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
सत्तेसाठी आसुसल्यांनी महाविकास आघाडी सरकारला पायउतार करण्याचे महापाप केले आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कारभार सुरू असताना केवळ सत्ता व पैशांच्या लोभापायी शिवसेनेत फूट पाडण्याचे काम करण्यात आले. राज्यातील शिंदे सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. ही शोकांतिका आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला जाणार आहे.
– डॉ. राहुल पाटील, आमदार, परभणी
जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे. अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेले असताना भरपाई राज्य सरकार देत नाही. त्याच बरोबर पीक विम्याच्या पैशांसाठीही देखील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खस्ता खाव्या लागत आहेत. मुबलक वीज, पाणी असतानाही हे दोन्ही वेळेवर दिल्या जात नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. तो दूर करण्यासाठी हा मोर्चा आहे.
– संजय जाधव, खासदार, परभणी
राज्यातील शिंदे सरकार हे कपाळ करंटे सरकार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत या सरकारला पाय उतार व्हावे लागेल, याची आम्ही गॅरंटी देत आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी या सरकारला घेणे देणे नाही. उद्धव ठाकरे यांच्या सारख्या कुशल नेतृत्वाला सत्तेवरून खाली खेचण्याचे महापाप करण्यात आले आहे. या कामात केंद्रीय यंत्रणाही कार्यरत होती. परंतु राज्यातील सर्वसामान्य जनता त्यांना माफ करणार नाही.
– रवींद्र वायकर, आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares