Rahul Gandhi- Bharat Jodo Yatra : काँग्रेसचा 'इव्हेंट'की स्थित्यंतराची सुरूवात – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
राहुल भारत जोडू पाहतोय, म्हणून यात्रा महत्त्वाची आहेच. पण इंटरनेटच्या धाग्यांनी जोडलेल्या या नव्या जगातल्या ऑफलाइन ठिपक्यांपर्यंतही तो पोहोचू पाहतोय ही खरी खास गोष्ट आहे. आत्मविश्वास आणि प्रेमाचं मॉडेल घेऊन जाणाऱ्या या यात्रेबद्दल…. 
सुरूवातीला फारशी हवा नसलेली भारत जोडो (Bharat Jodo Yatra) आता खऱ्या अर्थाने आकार घेतेय. ही ऑफलाइन यात्रा ऑनलाइन विश्वातसु्द्धा ट्रेंड होतेय… काय आहेत कारणं, याप्रकारच्या आंदोलनांची हवा किती झाली? किती राहिली? या सगळ्याचा जमाखर्च मांडण्याचा हा प्रयत्न…. (Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra analysis)
दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर, किमान एक वर्ष संपूर्ण भारतात प्रवास करुन 'भारत' समजावून घेण्याचा सल्ला नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी महात्मा गांधींना दिला होता. गांधीजींनी एक वर्ष भारतभर भ्रमण केले, लोकसंपर्क केला, लोकसंवाद साधला. ही घटना 1915 मधली..आज शंभर वर्षांनंतर जग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एवढे समीप आलेले असताना, हवी ती माहिती क्षणात उपलब्ध करुन देणारी अनेकानेक साधनसमृध्दी हाताशी उपलब्ध असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) कन्याकुमारी ते श्रीनगर असा 3570 किलोमीटर प्रवास 150 दिवसांत, दररोज सुमारे 25 किलोमीटर चालत करायचा ठरवतात, यामागची प्रेरणा काय असेल….  
राहुल म्हणतात, त्यांना भारताचा शोध घ्यायचा आहे. त्यांचे पणजोबा पं.नेहरुंनी 'भारत एक खोज' च्या रुपातून हा शोध पुस्तकातून घेतला. आता राहुलचा शोध सुरू झालाय.  
यात्रेद्वारे भारताचा शोध घेण्याचा प्रयत्न आजपर्यंत विशिष्ट मर्यादेत अनेकांनी केला. काहींनी स्वतःचे अनुभवही शब्दबद्ध केलेले आहेत. पण भारताच्या मातीत, समाजमनात, इतिहासात, भूगोलात आणि विशेषतः संस्कृतीत एवढे वैविध्य आहे की कोणाही एका व्यक्तीचा अनुभव आणि निरीक्षण संपूर्ण ठरणार नाही. भारतीय समाजमनातील सहिष्णुतेने आणि उदारमतवादाने आपले सांस्कृतिक वैविध्य एका सूत्रात बांधले आहे. परस्परविरोधी मतमतांतरांचा सन्मान ठेवून सर्वांना एकप्रवाही ठेवणारी भारतीय सांस्कृतिक सभ्यता आहे. येथे उन्मादाला थारा नव्हता किंवा नाही, असेही नाही. तोही होताच आजही दिसतो. पण सांस्कृतिक सहिष्णुतेसमोर तो अल्पकालीन ठरतो. ही सांस्कृतिक सहिष्णुता चिरंतन ठेवणं, हेच भारत जोडो यात्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे. 
एक राजकीय विचार करणारा नागरिक म्हणून 'याचा काँग्रेसला (Indian National Congress) राजकीय फायदा किती होईल?' , 'नजिकच्या काळात गुजरात, हिमाचल प्रदेशमधील निवडणुका काँग्रेस जिंकेल काय ?' अर्थात प्रत्येक आंदोलन हे निवडणूक जिंकण्यासाठीच असते का? समाज, संस्कृत, सहिष्णुतेचे संवर्धन आणि सबलीकरण हे दूरगामी राष्ट्रीय उद्दिष्ट 'भारत जोडो' सारख्या आंदोलनातून साकार होऊ शकते.  
हे देखिल वाचा-
हेही वाचा: कोणाचे हिंदुत्व शाश्वत…बापुंचे की संघाचे?
आत्मबल देणारं आंदोलन 
कोणत्या ना कोणत्या निवडणुका लोकशाहीत बारोमास सुरु असतात. प्रत्येक पक्ष,संघटनांच्या उमेदवारांची सर्वत्र पडझड सुरु असतेच. निवडणुकीत सत्ता मिळते. मात्र 'सत्ता संपादन' एवढे एकमेव लोकशाहीचे ध्येय नसते. हुकुमशाहीतूनसुद्धा सत्ता मिळतेच. मात्र समाजमन सुदृढ, सहिष्णू, सर्वसमावेशक असेल तर हुकुमशाहीवर अंकुश ठेवता येतो. समाजाला त्यासाठी आत्मविश्वास आणि आत्मबल द्यावे लागते. 'भारत जोडो' असा आत्मबल व आत्मविश्वास देऊ पाहणारे आंदोलन आहे.   
दूरगामी परिणाम दीर्घकालीन असतात. सेनापती बापट यांचा प्रकल्प विस्थापितांना न्याय देणारा 'मुळशी सत्त्याग्रह' तर स्वातंत्र्योत्तर काळातील तत्सम सत्त्याग्रहांसाठी दीपस्तंभ ठरला. विनोबा भावे यांचा 'भूदान यज्ञ' देशातील 'भूमिधारणा' कायद्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला. बाबा आमटेंनीसुद्धा एक भारत जोडो यात्रा केली होती. चंद्रशेखरनीसुद्धा एक भारत यात्रा केली. डॉ.बाबा आढाव यांचे  'एक गाव एक पाणवठा' असो की मेधा पाटकर यांचे 'नर्मदा बचाव' असो, ही आंदोलने वंचितांना संघटीत व संघर्षप्रवण करणारी ठरली. 'शेतकरी आंदोलन' तर अनेक संघटनांनी एकी करुन चालविलेले 'जन आंदोलन' होते. वाय एस आर रेड्डी आणि जगनमोहन रेड्डी यांच्या अशा आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि राजकीय फायदाही. 
 'भारत जोडो'ची जडणघडण 
'भारत जोडो'मध्ये अनेक अराजकीय संघटना, संस्था आहेत. अगदी काँग्रेसचे काही विरोधकसुद्धा आहेत. यात्रा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत तिला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतोच आहे. खरंतर एक 'इव्हेंट' म्हणून कॉंग्रेसने या यात्रेची पुरेशी तयारी केलेली नव्हती. संघटना पातळीवर फारसे नियोजन केलेलं नव्हतं. जिथून यात्रा सुरु झाली त्या तामिळनाडूमध्ये कॉंग्रेसचं फारसं अस्तित्वही नाही. मात्र प्रतिसाद उत्तम मिळतोय, अशांत समाजमनावर फुंकर घालण्याचं अचूक 'टायमिंग' काँग्रेसने साधलं आहे.  
सध्या भारतात, सामाजिक, आर्थिक सगळ्याच क्षेत्रात संकटं वेगवेगळ्या रुपाने उभी आहेत. त्यावर  खोटी, चमकदार आश्वासनं देण्याऐवजी राहुल त्याची विचारपूस करण्यासाठी स्वत: लोकांच्या दारी जातायत, नेमकं हेच जनतेला सुखावतंय.  
 यात्रे दरम्यानचा आणि यात्रेनंतरचा राहुलचा लोकांबरोबरचा संवाद विशेष गाजतो आहे.  लोक भावनिक होऊन व्यक्तिगत आणि कौटुंबिक विषयावर राहुलशी बोलतात. एका सहा-सात वर्षाच्या मुलीने त्यांच्याबरोबर बोलताना आई वडील माझ्यापेक्षा माझ्या भावावर अधिक प्रेम करतात असे सांगितले. राहुलने असा भेदभाव करू नका, असं कळकळीचं आवाहन जनतेला केलं.  हा मुक्त संवाद तसेच यात्रेदरम्यान सर्व वयोगटातील महिलांनी, मुलींनी नि:शंक मनाने राहुलची घेतलेली भेट, त्याला भेटल्यावर त्यांना वाटणारी आश्वासकता या पदयात्रेत महत्त्वाची ठरतेय. महिलांचा हा सहभाग भविष्यासाठी आश्वासक आहे. 
हे देखिल वाचा-
हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?
सामान्य माणसाबरोबर संवाद साधताना राहुलचं बोलणं जास्त खुलतं, यात्रेची उद्दिष्ट सांगताना सगळे सोबत चालू हे आवाहन केलं जातं. त्यात कुठेही आत्मप्रौढी नाही. हे सामूहिक सहभागाचं आवाहन परिणामकारक ठरताना दिसतंय. यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी, रात्री उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण असत. सगळा भारत जणू एका छोट्याश्या गावात सामावलेला असतो.  
 भारत जोडो यात्रेत योगेंद्र यादव ,रोहित वेमुलाची आई,  गौरी लंकेश यांची आई आणि बहिण यांनीही सहभाग नोंदवला. 'भारत जोडो' ही समाज जागृती यात्रा आहे. काँग्रेस पक्षाने यात्रेचे आयोजन व नियोजन केलेले असले तरी विविध पक्ष, संघटनाही त्यामध्ये ठिकठिकाणी सहभाग नोंदवित आहेत. सामाजिक संस्थाही सहभागी होत आहेत. ही यात्रा यात्राच आहे, सत्त्याग्रह किंवा संघर्ष नाही. काँग्रेस पक्षाचे यात्रेतील एकूण यात्री व संयोजक 500 सुद्धा नाहीत. तरीही यात्रेत तामिळनाडू ते महाराष्ट्र सुमारे 1700 किलोमीटर रस्त्यांवर हजारो लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत घोषणा देत वाजत गाजत चालत आहेत. गावोगाव गर्दीचे नवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत.   
 प्रजासत्ताक दिनी राजपथावर दिसणारे सांस्कृतिक वैविध्याचे सुंदर रुप भारताच्या डोंगर दरी पठारांवरील खड्डे पडलेल्या सडकांवर या यात्रेच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मोकळ्या ढाकळ्या स्वरुपात सादर होताना दिसते आहे. त्यात गोरगरीब आदिवासी, वंचितांची सामुहिक संगीत-नृत्त्ये आहेत, लेझीम आहे, वारकरी दिंडी आहे. एवढेच नव्हे तर दिव्यांगांचेही विविध गुणदर्शन आहे. यात्रेच्या रस्त्यांवरील गावागातील सर्व आर्थिक सामाजिक धार्मिक स्तरांवरील आबालवृध्द त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. उत्स्फूर्त यासाठी की काँग्रेसकडे एवढे नियोजन करण्याची क्षमता असणारे संघटन नाही. अगदी देशव्यापी पक्ष असूनही नाही. उलटपक्षी गावोगावचं कार्यकर्त्यांचं नेटवर्क काहीसं दुबळंच झाल्याचं वाटतंय. तथापी उत्तम प्रतिसाद मिळवणारी ही यात्रा जनमानसांत काँग्रेसबरोबरच संविधानाची मूल्यसुद्धा नव्याने रुजवण्यात यशस्वी होणार का, हा प्रश्न आहे.  
महागाई, बेरोजगारी, आणि द्वेषाचा विरोध करणारी, लोकशाही व संविधानाचे समर्थन करणारी उस्फूर्त लोकयात्रा! यात्रेत कोणत्याही मागण्या नाहीत किंवा "मुर्दाबाद" च्या घोषणा नाहीत. लाखो पदयात्री एकमेकांबरोबर संवाद साधता साधता स्वतःशी संवाद करतायत. तंत्रज्ञानामुळे संवाद तुटू पाहणाऱ्या आजच्या जगात असा स्वसंवाद खरोखरच महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थात  याचा तात्कालिक परिणाम लगेच दिसून राजकीय सामाजिक बदल लगेच दिसणार नाहीच.  
पण एका मोठ्या स्थित्यंतराला सुरूवात झालीय, एवढं नक्की…  
(लेखक हे सीए असून झेप फाऊंडेशनचे सहसंस्थापक आहेत)  
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares