मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा: कर्जबाजारीपणाचे बळी – Loksatta

Written by

Loksatta

डॉ. शुभांगी पारकर
कर्ज घेणं आणि ते वेळेत न फेडू शकणं, ही सर्वसामान्य लोकांसाठी लाजेची, अपमानास्पदच गोष्ट असते. आपल्याला कर्ज घ्यावं लागतं आहे, म्हणजे आपण लायक नाही, अपयशी आहोत, इथपासून नैराश्य आणि पुढे न्यूनगंड येण्यापर्यंत त्या व्यक्तीचं मनोधैर्य ढासळत जाण्याच्या पायऱ्या वाढत जातात, ज्या त्याला आत्महत्येच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतात. आर्थिक अडचण वा कर्जबाजारीपण हे सामाजिक अप्रतिष्ठेचे विषय मानले जात असल्यानं त्यातलं दीर्घकालीन अपयश हे त्या व्यक्तीचा, तर काही वेळा त्या कुटुंबाचा बळी घेतं. मात्र ते टाळता येऊ शकतं..
आर्थिक अडचण वा कमतरता ही जागतिक पातळीवरची एक सामाजिक, कौटुंबिक समस्या आहे. पैशांच्या कारणास्तव येणाऱ्या तणावामुळे अनेकांचा आत्महत्येकडे कल वाढतो आणि तो इतर सर्वसामान्य कारणांपेक्षा २० पटीनं अधिक असतो.कर्जबाजारीपण हे आत्महत्यांचं एकमेव कारण नसलं, तरीही अमेरिकेमध्ये आत्महत्यांमागचं ते एक प्रमुख कारण आहे. २०२२ च्या अहवालानुसार अमेरिकींना सरासरी ५२,९४० डॉलरचं कर्ज आहे. या कर्जामध्ये क्रेडिट कार्डचं कर्ज, काही गहाण ठेवून घेतलेले पैसे, वाहन खरेदी कर्ज आणि वैयक्तिक कर्ज, यांचाही समावेश होतो. एका सर्वेक्षणानुसार जपानमधल्या ज्येष्ठ, प्रौढांमध्ये कर्ज हे सौम्य-मध्यम आणि तीव्र नैराश्याच्या वाढीशी लक्षणीयरीत्या संबंधित असल्याचं आढळलं आहे. कर्जाची वाढती रक्कम ही नैराश्याची एकमेव सांकेतिक खूण मानता येणार नसली तरी आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची शक्यता जास्त असते. कर्जाची परतफेड करण्याच्या बंधनामुळे मानसिक अस्वस्थता येते, कर्जफेडीचे दिवस वाढत जातात तसतसं माणसाच्या जगण्यावर, जीवनशैलीवर नकारार्थी परिणाम होतो. काही शास्त्रीय अहवालांनुसार, स्वत:च्या नावावर नोंद केलेली र्कज आणि उदासीनता यांच्यात घनिष्ठ संबंध आहे. विशेषत: अति-कर्जाचा दीर्घ कालावधी नैराश्याच्या लक्षणांशी गंभीरपणे संबंधित आहे.
आर्थिक तणावाचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना सजगपणे माहीत असलं, तरी बहुतेक लोकांना हे कळत नाही, की आर्थिक अडचणी या आत्महत्या आणि आत्महत्येच्या विचारांचं प्रमुख कारण आहे. अतुल या एका कॉलेजवयीन विद्यार्थ्यांची ही कथा. त्यानं शिक्षणासाठी भरपूर कर्ज घेतलं होतं आणि नंतर त्याला ते फेडता येणं सोपं नाही, असं वाटू लागलं. त्यानं आत्महत्येचा गंभीर प्रयत्न केला. कसाबसा वाचला. त्यानं सांगितलं, ‘‘कर्जाची परतफेड करण्याच्या माझ्या प्रयत्नाला जराही यश येत नव्हतं. त्या हताश वस्तुस्थितीचा माझ्या मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम झाला होता. सतत मनात घोंगावणारी चिंता आणि खोलवर रुतलेलं नैराश्य, यामुळे मला सर्व काही संपलं असंच वाटत होतं.’’ जेव्हा आपण अशी जगण्याची आस गमावू लागतो, तेव्हा आपण जीवनाचा आनंद घेण्याची क्षमताही गमावू लागतो.
कर्जबाजारी असणं ही आयुष्य ढवळून काढणारी भावना आहे, जी आपला लढण्याचा प्रतिसाद गोठवते आणि अनेकदा ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित न राहाता कुटुंबाचाही घास घेतं. याचं उदाहरण म्हणजे, पंजाबमध्ये बरनाला येथील सिंग कुटुंबाच्या चार पिढय़ांनी कौटुंबिक कर्ज थकल्यामुळे एकत्रितपणे केलेली आत्महत्या. २२ वर्षांच्या लवप्रीत सिंग याची गोष्टही चटका लावणारी. त्याच्या कुटुंबातली पहिली आत्महत्या लवप्रीतच्या पणजोबांनी- जोगिंदर सिंग यांनी ४० वर्षांपूर्वी केली होती. त्यांचा मुलगा म्हणजे लवप्रीतचे आजोबा भगवान सिंग यांनीही २५ वर्षांपूर्वी कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यानं आत्महत्या केली होती. लवप्रीतसुद्धा कर्जाच्या झंझावातात हरला आणि त्यानंही आपल्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. पिढय़ान्पिढया साठलेली कर्जाची रक्कम तो परत करू शकला नव्हता.
मध्यंतरी कर्जबाजारी होऊन निराशेच्या गर्तेत हरवलेले मेकॅनिक संजीव जोशी (वय ४७), त्यांची आई नंदिनी (६७), पत्नी अर्चना (४५), मुली ग्रीष्मा (२१) आणि पूर्वी (१६) यांनी एका रात्री विष मिसळलेलं शीतपेय प्राशन केलं. त्यांचा हा व्हिडीओ मित्रांबरोबर ‘लाइव्ह’ होत होता. त्यांना कर्जाचे तीन लाख रुपये परत करायचे होते. व्याजासह खूप मोठी रक्कम देणं बाकी होतं. त्यावरून या कुटुंबाचं सावकाराशी भांडणही झालं होतं. अशा दारुण परिस्थितीला कंटाळून संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या कुटुंबाची भावनिक बेचैनी इतकी शिगेला पोहोचलेली होती, की त्यांनी मृत्यूपूर्वी दोन अत्यंत लाडकी कुत्री आणि उंदीर यांनाही विष खायला घातलं.
कर्जबाजारी असण्यामध्ये सामाजिक मूल्यमापनातली मानसिक असुरक्षितता आणि नैतिक अध:पतनाची भावना, असे आत्महत्येच्या प्रक्रियेचे मुख्य घटक असतात. त्यामुळे कर्ज वाढत गेलं, की व्यक्तीला स्वत:पासून आणि जगापासून सुटका करून घ्यावीशी वाटू लागते. आपण घेतलेल्या कर्जाची सन्मानपूर्वक परतफेड करण्यास सक्षम नसणं हे एक प्रकारचं व्यक्तिगत अपयश मानलं जातं. सामाजिकदृष्टय़ा सर्वसामान्य अशी जी उच्च मानकं आहेत आणि व्यक्तींकडून ज्या सामाजिक अपेक्षा केल्या जातात, त्याच्याशी तुलना करता कर्जबाजारीपणा त्या व्यक्तीला खूप कमीपणाची भावना देतो. पैसेफेड करण्यात अयशस्वी झालेली व्यक्ती स्वत:लाच दोषी ठरवते. त्यांच्यात नकारात्मकता आणि न्यूनगंड निर्माण होतात. तीव्र नकारात्मक भावनांनी भरलेला तो एक वेदनादायक अनुभव असतो. जेव्हा लोक नकाराच्या टप्प्यावर पोहोचतात, तेव्हा आत्मघाती कृत्य घडण्याचा धोका वाढतो.
आज सामाजिक आणि राजकीयदृष्टय़ा सतावणारा एक प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या का करतात? पूर, दुष्काळ, कर्ज, जनुकीय सुधारित बियाणांचा वापर, अशी अनेक कारणं आहेत. परंतु यावर एकमत नाही. कर्जाची परतफेड करण्याची असमर्थता हे एक महत्त्वाचं प्राथमिक कारण सांगितलं जातं. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अर्थतज्ज्ञ अरिवद पानगरिया म्हणतात, ‘‘२५ टक्के आत्महत्यांसाठी शेतीशी संबंधित कारणं उद्धृत केली जातात. शेतकऱ्यांवर सातत्यानं असलेला कर्जाचा अमाप बोजा आणि कर्जाच्या अनौपचारिक स्रोतांवर त्यांनी दिलेला अधिक भर ही महत्त्वाची कारणं असल्याचं दिसून येतं.’’ अर्थात या विषयावर आणखी चर्चा करणं आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशातल्या एका व्यापाऱ्यानं या वर्षीच ‘फेसबुक लाईव्ह’ करत, मोठय़ा नुकसानीचं कारण सांगत विषप्राशन केलं. दोन मुलांचे वडील असलेले तोमर हे काही काळापासून आर्थिक अडचणीत होते. त्यांनी आत्महत्या केली, त्यावर त्यांची ३८ वर्षांची पत्नी पूनम तोमर हिनंही पतीला आत्महत्येपासून रोखण्यात अपयश आल्यानं विषप्राशन केलं. त्यांचे नि:शब्द झालेले नातेवाईक सांगतात, की ‘तो खूप मोठय़ा आर्थिक संकटात आहे हे आम्हाला कधीच कळलं नाही.’ त्यांच्या काकांनी सांगितलं, ‘तो एरवी अत्यंत आनंदी व्यक्ती होता.’ आता त्यांना वाटतं, की ते नैराश्याचा सामना करत असावेत. ‘पण त्यानं कधीच सांगितलं नाही, की त्याला कोणत्या समस्या आहेत..’ ‘तो एक सक्षम व्यक्ती होता आणि त्यानं इतर लोकांच्या समस्याही सोडवल्या होत्या,’ असं काही नातेवाईक सांगतात.
‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’(NCRB)च्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये एकूण १२,०५५ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. २०२० च्या तुलनेत एकूण आत्महत्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘एनसीआरबी’नं नमूद केलं आहे, की २०२१ मध्ये व्यापारी समुदायातले मृत्यू हे शेती विभागाच्या तुलनेत जास्त होते. २०१८ च्या आकडेवारीच्या तुलनेत २०२१ मध्ये स्वयंरोजगार असलेल्या लोकांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये ५४ टक्के वाढ झाली आहे. आत्महत्येमुळे मरणाऱ्या लोकांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जगण्यासाठी कर्ज हा निर्णायक घटक असतो, तेव्हा त्यानं आपल्या आवडीनिवडी पणास लावल्यासारखी स्थिती होते. कष्टानं कमावलेला पैसा दर महिन्याला कर्जासाठी जातो आणि तोसुध्दा वर्तमान किंवा भविष्यासाठी नव्हे, तर भूतकाळासाठी! तेव्हा स्वाभाविकच निराशा येते. हे सर्व घटक नैराश्याला कारणीभूत ठरतात आणि आत्महत्या हा एकमेव मार्ग दिसायला लागतो. जीवनात धकाधकीच्या गोष्टी घडणं सामान्य आहे आणि आपलं मन आणि शरीर अधूनमधून अल्प काळाच्या तणावाला हाताळण्यासाठी सुसज्ज असतं. पण कर्ज एखाद्या व्यक्तीच्या जीवनात दीर्घकालीन ताणतणाव निर्माण करू शकतं. जेव्हा शेतकऱ्यानं घेतलेल्या कर्जासारख्या मोठय़ा कर्जाचा प्रश्न येतो, तेव्हा तो ताणतणाव अधिक क्लिष्ट होतो आणि मन आणि शरीर थकायला लागतं. जे लोक आत्महत्येचा विचार करत आहेत त्यांना अनेकदा आपण अडकून पडल्यासारखं, डोक्यावरचं ओझं जड झाल्यासारखं आणि त्याबरोबर आपण इतरांसाठी भार असल्यासारखं वाटत असतं. आर्थिक अडचण हताशपणाची भावना गंभीरपणे प्रतिबिंबित करू शकते. दीर्घकालीन आर्थिक अडचणी व्यक्तीची सर्वागीण लवचीकता कमी करून आत्महत्येशी संबंधित भावना वाढवू शकतात. सतत गरिबीत किंवा आर्थिक असुरक्षिततेत जगणं एखाद्या व्यक्तीला थकवू शकतं आणि सामाजिकदृष्टय़ा ती व्यक्ती एकटी पडते. अनपेक्षित आर्थिक फटका, असंवेदनशील किंवा आक्रमक अशा वसुलीच्या पध्दती आणि कर्जावरचं शुल्क आणि व्याजाचा वेगवान संचय, हे एखाद्या व्यक्तीच्या निश्चिंतपणाच्या भावनेला आव्हान देतं. त्याच्या कुटुंबातली त्याची जबाबदारीची भूमिका आणि सुरक्षिततेची भावना यालाही आव्हान मिळतं. बऱ्याच वेळा त्या व्यक्तीला त्याचं निराकरण करण्याच्या संभाव्यतेबद्दल ओझं किंवा निराशा वाटू शकते. परंतु परिस्थिती कितीही अपरिहार्य वाटली तरीही स्वत:ला मारणं हे कधीही उत्तर नाही. अशा भीषण कृतीमुळे तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना खूप त्रास होऊ शकतो. याहून वाईट म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तुमच्या थकीत कर्जासाठी कुटुंब किंवा जोडीदार यांना जबाबदार धरलं जाऊ शकतं.
आर्थिक अडचणी आणि आत्महत्या यांच्यातला विकृत दुवा तोडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आर्थिक अडचणी दूर करणं. तथापि अल्पावधीच्या उपायांत कर्जासंबंधीच्या मानसिक समस्यांना आणि आत्महत्येच्या समस्यांना प्रतिबंध घालण्यासाठी, लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण बरंच काही करू शकतो.
कर्ज, बेघरपणा, बेरोजगारी आणि निराशेच्या भावनांशी झुंजत असणाऱ्या व्यक्तींनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते एकटे नाहीत. मदत आणि आशा दोन्ही या जगात आहेत. मदत मागणं हे दुर्बलतेचं लक्षण नाही आणि याचा अर्थ असाही नाही की तुम्ही पालक किंवा जोडीदार म्हणून अपयशी झाला आहात. तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला तणावाखाली आणत आहे हे ओळखलं आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे!
संकटांतून बाहेर पडण्याचे मार्ग असतातच. फक्त योग्य मार्ग कोणता हे शोधण्यासाठी शांत डोक्यानं विचार करणं आणि मदत मागायला न लाजणं हे त्यावरचे उपाय असू शकतात.
pshubhangi@gmail.com
मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares