विजया वसावे… नंदूरबारमधील ओळखपत्रधारक पहिली तृतीयपंथीय! – Loksatta

Written by

Loksatta

जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणणं वेगळं आणि वेगळ्या प्रकृती असलेल्या माणसाचं संघर्षमय जीणं वेगळं. तसं म्हणायला गेलात तर संघर्ष कुणाच्या आयुष्यात नसतो? मात्र विजया वसावेच्या वाट्याला जगण्याचा किंबहुना तिच्या अस्तित्वाबद्दलच्या संघर्षाचा जो तिढा आला; तसा तर कुणाच्या आयुष्यात फारच अपवादाने आढळून येईल. चारचौघांसारखं आयुष्य मिळावं अशी किमान अपेक्षा असणंसुद्धा जिथे गुन्हा ठरतो, अशा भोवतालामधे विजया पूर्वाश्रमीचा विजय स्वतःची नेमकी ओळख मिळवण्यासाठी अनेक हालअपेष्टांमधून जात होता. साध्यासरळ जगण्यालाही पारख्या झालेल्या विजयाने अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले… अस्तित्वाचा संघर्ष किती जीवघेणा असू शकतो, हे विजया वसावेच्या कहाणीतून कळू शकतं. संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनाचे, माणसांचे विविध रंग, पैलू तिने अनुभवले आणि अखेरीस तिला ‘ती’च्या अस्तित्वाचा अर्थ कळला, ओळख मिळाली. आज तिच विजया नंदूरबारमधील एलजीबीटीआयएक्यू समुदायाकरिता आशेचा किरण ठरली आहे!
आणखी वाचा : आलियाला लग्नाआधीच गरोदर म्हणणाऱ्या ट्रोलर्सना चपराक
नंदूरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुआ तालुक्यातलं दहेल एक छोटंसं खेडं. त्या खेड्यातल्या शेतकरी कुटुंबात विजया ‘विजय’ म्हणून जन्माला आली. बालपणापासूनच विजयला काहीतरी सतत अस्वस्थ करत असायचं. मुलाच्या शरीरामध्ये आपण अडकलो आहोत, घुसमटतो आहोत, अशी काहीशी त्याची तेव्हा भावना होती. वयात येणाऱ्या विजयला हे विचार, ही घुसमट गोंधळात टाकणारी तर होतीच, शिवाय ती समजून घेणंदेखील कठीण जात होतं. तिथल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विजय आदिवासी मुलांसाठीच्या आश्रमशाळेत दाखल झाला. परंतु आश्रमशाळेत दाखल झाल्यानंतर परिस्थिती एकदमच उलट झाली, प्रतिकूल झाली. अचानकपणे तो या शाळकरी मुलांच्या चेष्टेचा, टिंगलटवाळीचा प्रसंगी अत्याचाराचाही विषय ठरला.
आणखी वाचा : ‘मेटा’च्या ‘इंडिया हेड’ संध्या देवनाथन आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा प्रवास…
याविषयीचा अनुभव सांगताना विजया म्हणते, की “ही मुलं माझ्याकडे एकटक पहात रहायची. मला खूपच असुरक्षित वाटायचं. मी रात्री सर्वजण गाढ झोपल्यानंतर उशिरा माझी अंघोळ उरकून घ्यायचे. त्यामुळे सकाळी कुणीही उठण्यापूर्वीच मी शाळेत जाण्यासाठी एकदम तयार असायचे. एकाकी, असहाय्य आणि कुणालाही सांगता येणार नाही, अशी स्थिती झाली होती तेव्हा. शाळकरी मित्रांकडून छळवणूक आणि छेडछाड संपतच नव्हती.
आणखी वाचा : नातेसंबंध : स्पर्शाचा हेतू
कधीकधी मुद्दाम धक्का देण्यासारखे प्रकार तर वरचेवर होतच. मी मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राही. त्यामुळे त्यांची हिंमत अजूनच वाढली. धक्काबुक्कीपासून ते शारीरिक हिंसेपर्यंतचे अत्याचार त्यावेळी सहन करावे लागले. माझ्याशी असं वागताना त्यांना आनंद होत असावा. अशा बिकट प्रसंगातून माझी सोडवणूक करण्यासाठी त्यावेळेस कुणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. शाळेतल्या शिक्षकांना तर माझ्याविषयी सहानुभूती नव्हतीच उलटपक्षी तेच मला ‘मुलीसारखं वागू नकोस’, असं बजावत रहायचे.”
आणखी वाचा : फॅशनमधले अचाट तोडगे : ‘ब्रा’ऐवजी वापरल्या जाणाऱ्या ‘पेस्टीज्’!
पराकोटीच्या हेटाळणीच्या, गुंडगिरीच्या वागणूकीने विजयला नैराश्याच्या खाईत लोटले. याच नैराश्यामुळे जगण्याची उमेदच हरवून बसलेल्या विजयने अनेकदा आपले जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला. अनेकदा विजय रात्री झोपताना जीवन संपवण्याचा एक मार्ग म्हणून डेटॉलची बाटली सोबत घेऊनच झोपत असे. पदवीशिक्षणासाठी विजय नाशिकला आला तरीही त्याच्यामागचा छळ आणि एकाकीपणा काही संपला नाही.
आणखी वाचा : मेन्टॉरशिप : कोरिओग्राफर दीपाली विचारे- लाभली चालती बोलती विद्यापीठं !
२०१९ मधे विजय ज्या महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण घेत होता त्या महाविद्यालयाने एलजीबीटीआयएक्यू संदर्भात एक कार्यशाळा आयोजित केली होती. पुण्याचे कार्यकर्ते बिंदुमाधव खैरे आणि मानसोपचारत्ज्ञ यांनी या कार्यशाळेला हजेरी लावली होती. ही कार्यशाळा विजयच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. कार्यशाळेच्या अनुभवाबद्दल सांगताना विजया म्हणते, की “त्या क्षणापर्यंत मला हे ठाऊक नव्हतं की स्त्री किंवा पुरूष असण्याइतकंच तृतीयपंथी असणं हेदेखील तितकंच नैसर्गिक असतं. कार्यशाळेत दाखल होईपर्यंत मी सामान्यांसारखा नाही, अशीच माझी भावना होती. परंतु या कार्यशाळेने माझा हा समज खोडून काढला. मीही इतरांप्रमाणेच सामान्य आहे, हे लक्षात आलं” विजया आत्मभानाचा क्षण उलगडते.
आणखी वाचा : नातेसंबंध : नात्यातच होतंय लैंगिक शोषण?
पदवी घेतल्यानंतर विजयाने कर्वे इन्स्टिट्यूटमधे त्याच वर्षी एका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्याचबरोबर विजयाने लिंगबदलाची शस्त्रक्रियाही करून घेतली. “आता मी सातपुडा प्रदेशातली पहिली तृतीयपंथीय आहे. एवढंच नाही तर नंदूरबार जिल्ह्यात तृतीयपंथीय ओळखपत्र मिळवणारीही पहिलीच आहे. ‘मी कोण आहे’, या प्रश्नाचं उत्तर तर मला मिळालंच शिवाय मला जे हवं होतं ते शस्त्रक्रियेद्वारे मी मिळवलंदेखील. तसंच मला आता माझी स्वतंत्र ओळख असलेलं ओळखपत्रही मिळालं आहे. माझ्या आयुष्यातल्या इतक्या उलथापालथीनंतर, संक्रमणानंतर, संघर्षानंतर मला खूपच शांत आणि हलकं वाटतं आहे.”
(शब्दांकन : साक्षी सावे)
मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares