वीजसेवेतील त्रुटींवर दोडामार्गात आसूड – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
वीजसेवेतील त्रुटींवर दोडामार्गात आसूड
वीज ग्राहक मेळाव्यात ग्रामस्थ आक्रमक; समस्या प्रामुख्याने मार्गी लावण्याची मागणी
दोडामार्ग, ता. १८ ः तालुक्यात महावितरणची सेवा व्यवस्थित मिळत नाही. याचा जाब विचारण्यास गेलेल्या लोकप्रतिनिधींवर मुद्दाम केसेस टाकल्या जातात. महावितरणची ती दडपशाही आहे. जिल्हा न्यायालयात सहा वर्षांपासून आमच्यावर विनाकारण खटला चालू आहे. तालुका दुर्गम व डोंगराळ असल्याने येथे ज्या-ज्या उपायोजना करणे आवश्यक आहे, त्या महावितरण कंपनीला सुचविल्या. मात्र, महावितरणकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. वीज बिलासाठी गोरगरिबांना वेठीस धरले जाते. त्यामुळे येथील समस्या प्रामुख्याने मार्गी लावा, अशी मागणी नगरसेवक संतोष नानचे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना येथील मेळाव्यात केली. वीज सेवेतील त्रुटी आणि महावितरणची दंडेलशाही यावर त्यांनी मेळाव्यात आसूड ओढले.
येथील पिंपळेश्वर हॉलमध्ये जिल्हा व्यापारी महासंघ व महावितरणने वीज ग्राहक मेळाव्याचे काल (ता.१७) आयोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या मेळाव्याची सुरुवात झाली. तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर, नगरसेवक राजेश प्रसादी, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप चांदलकर, उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस, महावितरणचे कार्यकारी अभियंता विनोद विपर, कार्यकारी अभियंता लोकरे, उपकार्यकारी अभियंता संतोष नलावडे आदी उपस्थित होते.
गणेश चतुर्थी, दिवाळीसारख्या सणाला तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. अशावेळी महावितरण कंपनीने कोणत्या उपाययोजना केल्या? यात दोषी कोण व त्यांच्यावर काय कारवाई केली, अशी विचारणा पांडुरंग बोर्डेकर यांनी केली. त्यावर आपटेकर यांनी सांगितले की, गणेश चतुर्थीत लाईट गेलेली व त्यावेळी पाऊसही होता. त्यामुळे प्रत्येक खांब तपासताना अनेक अडचणी येत होत्या. परिणामी वीजपुरवठा सुरळीत करण्यास उशीर झाला, असे सांगून सहाय्यक अभियंता आपटेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली व यापुढे असे प्रकार होणार नसल्याची ग्वाही दिली.
साटेली-भेडशी ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे दोडामार्ग व साटेली-भेडशी बाजारपेठेला वेगळी वीज वाहिनी देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? असा प्रश्न उपसरपंच गणपत डांगी यांनी उपस्थित करत गावासाठी कायमस्वरूपी दोन वायरमन देण्याची मागणी केली. संतोष नलावडे यांनी समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणपत डांगी यांनी तेथे तुमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा नको तर लाईटची सेवा दर्जेदार द्या, असे सांगितले, विनोद विपर यांनी साटेली-भेडशीतील तांत्रिक समस्या सोडवा, आवश्यक असल्यास तेथील अंदाजपत्रक द्या आणि लाईटची सोय करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता विनोद विपर यांनी उपस्थितांना दिले. आम्ही आमच्या सणासुदीचा विचार न करता तुमचा सण तुम्हाला कसा व्यवस्थित साजरा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहतो. त्यामुळे कोणतीही बीज समस्या निर्माण झाल्यास ग्राहकांसाठी आम्ही २४ तास उपलब्ध असल्याचे विनोद विपर यांनी सांगितले.
वीज ग्राहकांचे अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न घेऊन कार्यालयात वारंवार गेले असता तेथे अधिकारी मिळत नाहीत. कार्यालयात हालचाल रजिस्टरची विचारणा केल्यास ते नसल्याचे उत्तर मिळते. हा डोंगराळ भाग असल्यामुळे येथील बीएसएनएल सांगितले. व महावितरणची सेवा सारखीच झाली आहे. वीज बिल भरले नाही तर तुमचे अधिकारी व कर्मचारी बीजपुरवठा तोडतात, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस यांनी केला. याला उत्तर देताना विनोद विपर यांनी सांगितले की अधिकारी, कर्मचारी टेक्निकल असल्यामुळे बाहेर असतात. मात्र, यापुढे कार्यालयात हालचाल रजिस्टर ठेवले जाईल व ते ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार दाखविले जाईल. कारण हालचाल रजिस्टर पाहणे हा ग्राहकाचा अधिकार असल्याचे विपर यांनी सांगितले. सुरुवातीला अडीच हजार आलेले बिल अचानक अडीच लाख कसे आले? मागील तीन वर्षांपासून आपण महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. यावर आपण सविस्तर बोलू असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. मात्र, कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. महावितरणकडे याबाबत पाठपुरावा करूनही अधिकाऱ्यांनी याची तपासणी वेळेत केलेली नाही. परिणामी मला कोर्टाकडून नोटीस आली, असे शेतकरी संतोष म्हावळणकर यांनी सांगताच त्याबाबत तांत्रिक बाबी तपासू, असे विनोद विपर यांनी सांगितले.
———-
चौकट
व्हॉटस्अॅपवरून तक्रार
ज्याप्रमाणे एसएमएसवर बिल येते, त्याप्रमाणे एसएमएसवरून तक्रार केली तर चालेल का? तसेच पावसाळ्यापूर्वी कोणताही मेंटेनन्स होत नाही. याला जबाबदार कोण? असे अनेक सवाल करण्यात आले. याला उत्तर देताना विनोद विपर यांनी सांगितले की एसएमएस तथा व्हॉटस्अॅपवरून तक्रार नोंदवता येते. तसेच यापुढे पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची सर्व कामे केली जातील, असे आश्वासन संतोष नलावडे यांनी दिले.
———-
चौकट
कार्यवाहीचे आश्वासन
हेवाळेत तीन वर्षांपूर्वी ११ केव्हीची लाईन तुटून दुर्घटना घडली व यात शेती बागायतीचे नुकसान झाले. मात्र, अद्याप त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. वीज बिल थकीत असेल तर वसुलीसाठी तगादा लावता. मग नुकसान भरपाईला उशीर का? असा सवालही मेळाव्यात उपस्थित झाला. त्याची माहिती घेऊन उचित कार्यवाही केली जाईल, असे विपर यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares