संवाद: विविध क्षेत्रातील व्यक्तींशी राहुल गांधींनी साधला संवाद – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
रस्त्याच्या दुतर्फा फुललेली गर्दी, शेतकरी कामगारांच्या आशादायी नजरा, चिमुकल्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्नं आणि महिलांच्या मनी सुरक्षिततेची भावना… अशा भारलेल्या वातावरणात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे गुरुवारी जिल्ह्यातून मार्गक्रमण सुरू झाले.
वाशीम जिल्ह्यातून बुधवारी रात्री आगमन झालेल्या भारत यात्रेने गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास बाळापूरकडे मार्गक्रमण केले. पदयात्रेला पातूर पोलिस स्टेशनजवळ असलेल्या शहाबाबू हायस्कूल येथून प्रारंभ झाला. संभाजी चौक, बाभुळगाव या मार्गाने मार्गक्रमण करत यात्रा चान्नी वाडेगाव, बाळापूरकडे रवाना झाली. पदयात्रेत प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थाेरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, आमदार प्रणिती शिंदेे, माजी खा. कुमार केतकर, आ. नितीन देशमुख, आ. अमाेल मिटकरी, झिशान बाबा सिद्धीकी, माजी राज्यमंत्री अजहर हुसेनसह वरिष्ठ नेते सहभागी झाले.
पदयात्रेत महिलांना प्राधान्य : १९ नोव्हेंबरला इंदिरा गांधी यांची जयंती लक्षात घेऊन राहुल गांधींसोबत महिलांना पायी चालण्याची प्राधान्याने संधी देण्यात येणार असल्याची माहिती माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिली. विविध राज्यातील काँग्रेसच्या महिला खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी या निमित्ताने पदयात्रेत सहभागी होणार आहेत. यात ९० टक्के महिला पदाधिकारी या महाराष्ट्रातील राहणार असल्याचे जयराम रमेश म्हणाले. महिला पदाधिकाऱ्यांनी श्वेतवस्त्र धारण करून सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
वारकरी दिंडीचा सहभाग : भारत जोडो यात्रेत वारकरी दिंडीनेही सहभाग नाेंदवला हाेता. टाळ, मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पदयात्रेचे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक वारकऱ्यांच्या वेशात येऊन पदयात्रेचे स्वागत करत होते.
नेत्यांची दमछाक, माजी मंत्री ठाकूर यांच्या हाताला जखम : राहुल गांधी यांचा उत्साह पदयात्रेत शेवटपर्यंत कायम असताे. पातूर येथील पदयात्रेत सहभागी हाेण्यासाठी काँग्रेसचे नेतेही पहाटेपासूनच सज्ज हाेते. यात्रा सुरू झाल्यानंतर चालताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. अनेकांना नागरिकांच्या गर्दीचा सामना करत रस्ता काढावा लागला. एका ठिकाणी माजी मंत्री तथा आमदार अॅड. यशाेमती ठाकूर यांच्या हाताला खरचटले. मात्र त्या निर्धाराने पदयात्रेत सहभाग हाेत ग्रामस्थांशी संवादही साधत हाेत्या.
वन संरक्षक कायद्यातील बदल घातक
आम्ही विविध मुद्यांवर राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली, असे भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नर्मदा बचाव आंदाेलनाच्या नेत्या मेधा पाटकर म्हणाल्या. पदयात्रेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील जन आंदोलन लढणारे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. शाश्वत विकास करताना पर्यावरणाचा, जलवायू परिवर्तनाचा विचार न करता पाश्चिमात्य संकल्पनेतून झाल्यास जल- जंगल- जमीन व काही नद्याही नष्ट होतील, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
आदिवासींना उद्धस्त करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे, असा घणाघात मेधा पाटकर यांनी केला. सन १९८० च्या वन संरक्षक कायद्यात बदल प्रस्तावित आहेत. यात ग्रामसभेला न विचारता आदिवासींचे हजारो एकर जंगल अदानीला किंवा कंपनीला देऊ शकतील. या प्रयत्नाला विरोध करणे आवश्यक असल्याचे आम्ही राहुल गांधी यांना सांगितले आहे. संसदेत अवकाश नाही; तर तुम्ही जनसंसद घ्या. ग्रामसभेला संसद माना, असेही त्या म्हणाल्या. यावर राहुल गांधी यांनी विचार करू, असे सांगितले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र एका यात्रेतून हे साध्य हाेणार नसून, तुम्हीही प्रयत्न करा, असेही ते म्हणाल्याचे पाटकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares