सहकार तत्वावरील प्रकल्पांची गरज – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
63223
वेंगुर्ले ः येथील सहकार मेळाव्याचे उद्‍घाटन करताना उर्मिला यादव. शेजारी एम. के. गावडे आदी.
सहकार तत्वावरील प्रकल्पांची गरज
एम. के. गावडे ः वेंगुर्ले येथील सहकार सप्ताहात रंगला मेळावा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ ः जिल्ह्यात सहकार गुणात्मकदृष्ट्या उत्तम आहे; मात्र आता संख्यात्मक सहकार वाढण्याची आवश्यकता आहे. केंद्र व राज्याच्या अनेक योजना आर्थिक उन्नतीसाठी पूरक असून कृषी, प्रक्रिया, औद्योगिक संस्था निर्माण होण्याची आवश्यकता आहे. राजकीय पक्ष भेद बाजूला ठेवून सहकार तत्वावर मोठे प्रकल्प उभे राहणे आवश्यक आहेत. सहकारात काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी सहकारी कायदा व व्यवस्थापन तसेच उपलब्ध संधीचा अभ्यास केल्यास निश्चित आर्थिक उन्नती होईल, असे प्रतिपादन सहकार तज्ज्ञ एम. के. गावडे यांनी येथे केले.
येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था याठिकाणी १४ ते २० नोव्हेंबर या दरम्यान सहकार सप्ताह आयोजित केला आहे. यानिमित्त आज पाचव्या दिवशी सहकार मेळावा आयोजित केला होता. यावेळी गावडे बोलत होते. याचे उद्‌घाटन कुडाळ सहकारी संस्था सहाय्यक निबंधक उर्मिला यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र सहकार बोर्ड संचालक विलास ऐनापुरे, सिंधुदुर्ग जिल्हा सहकार मंडळ अध्यक्ष गजानन सावंत, जिल्हा बँक माजी संचालिका प्रज्ञा परब, विजय रेडकर, प्रविणा खानोलकर, गीता परब, श्रुती रेडकर, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. खरेदी विक्री संघ बिनविरोध केल्याबद्दल गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ऐनापुरे म्हणाले, ‘‘याठिकाणी असलेल्या काथ्याचा प्रकल्प एवढा भव्य आहे की गावडे पश्चिम महाराष्ट्रात असते तर अनेक सहकारी कारखाने निर्माण केले असते. (कै.) जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्याच पंचवार्षिक योजनेत सहकारासाठी आर्थिक तरतूद केली त्यानंतर (कै.) शिवरामभाऊ जाधव व (कै.) डी. बी. ढोलम यांनी जिल्ह्यात सहकार विस्तारण्याचा भरपूर प्रयत्न केला. तरुणांनी व महिलांनी पुढे जाऊन सहकारात नवीन नवीन संधीचा लाभ घ्यावा व गावातील शेतकरी गरिबांना मदत करावी.’’
———
कोट
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उद्योग खात्याचे मंत्री असून जिल्ह्यातील शेतकरी महिला यांनी ठरविल्यास करोडो रुपयांची सबसिडी जिल्ह्यात येऊ शकते. व्यक्तिगत प्रकल्प उभा करणे जिल्ह्यात परवडणारे नाही मात्र सहकारी संस्थांच्या माध्यमातून आंबा, काजू, प्रक्रिया उद्योग, काथ्या अगरबत्ती यासारखे उद्योग सुरू झाल्यास रोजगार समस्या राहणार नाही. त्याचबरोबर आर्थिक उन्नतीची दालने उघडतील.
– एम. के. गावडे
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares