Ahmednagar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन पहिल्याच दिवशी चिघळले – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
राहुरी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुकारलेले राज्यव्यापी ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन आज (गुरुवारी) पहिल्याच दिवशी अहमदनगर जिल्ह्यात चिघळले. वांबोरी येथे प्रसाद शुगर साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून, कार्यकर्त्यांनी अर्धा तास कारखाना बंद पाडला. राहुरी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.
"स्वाभिमानी"तर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) व उद्या (शुक्रवारी) राज्यव्यापी ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे. कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत. एकरकमी एफआरपी द्यावी. मागील वर्षीची एफआरपी अधिक दोनशे रुपये आणि यंदाच्या वर्षी एफआरपी अधिक तीनशे पन्नास रुपये मिळावेत. अशा स्वाभिमानीच्या प्रमुख मागण्या आहेत.
आज (गुरुवारी) सकाळी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी स्वाभिमानीचे नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी शेतातील ऊस तोडणी बंद करून, रस्त्यावरील उसाची वाहने अडविली. दुपारी कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. वांबोरी येथे "प्रसाद शुगर ॲण्ड अलाईड ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड" या साखर कारखान्यावर शेकडो शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला.
कारखान्याचे सुरक्षारक्षक व आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. माहिती समजताच पोलीस पथक हजर झाले. जिल्हाध्यक्ष मोरे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी थेट गव्हाणीत उड्या मारल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून, आंदोलकांना गव्हाणीतून बाहेर काढले. त्यामुळे, पुढील अनर्थ टळला.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, राहुल करपे, सुभाष जुंदरे, किशोर मोरे, राहुल चोथे, पप्पू मोरे, जुगल गोसावी, प्रमोद पवार, सतीश पवार, प्रवीण पवार, सचिन पोळ, अमोल पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना नोटीस बजावून वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन दिवस साखर कारखाने बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला सहकार्य करावे. असे निवेदन साखर कारखान्यांना दिले होते. पोलीस बळाचा कितीही वापर केला. तरी, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहील. – रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना."
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares