रासायनिक खतांची साठेबाजीमुळे बळीराजा त्रस्त – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
नारायणगाव, ता.१९ : जुन्नर तालुक्यात खरीप हंगामात बनावट सोयाबीन बियाणे व कीटकनाशकांची विक्रीचा प्रकार उघडकीस आला. त्या नंतर जुन्नर येथे रब्बी हंगामात बनावट गहू बियाणांची विक्री व रासायनिक खतांच्या साठेबाजीची घटना उघडकीस आली. यापूर्वी बनावट टोमॅटो, कांदा, फूल कोबी बियाणे व रोपे विक्रीतून, पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर अंकुश नसल्याने शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत धरणे व कालवे यामुळे पाण्याची उपलब्धता असल्याने जुन्नर तालुक्यात कृषी क्रांती झाली आहे. यामुळे संकरित बियाणे, रासायनिक खते, किटक व बुरशीनाशके, शेण खत, गांडूळ खत, फवारणी यंत्रणा, पीव्हीसी पाइप, कृषी पंप, ट्रॅक्टर आदींच्या विक्रीतून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. कृषी निविष्ठा विक्री व कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय तालुक्यात भरभराटीला आला. त्या बरोबरच शेतकऱ्यांची फसवणूक करून नफेखोरी सुरू झाली आहे.तालुक्यात ३५० कृषी निविष्ठा व कृषी साहित्य विक्री केंद्र आहेत. कृषी निविष्ठा केंद्राची तपासणी करून बियाणे, खते व औषधे गुण नियंत्रण करणे, साठे बाजीला आळा घालण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. शासकीय यंत्रणा असताना शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. बिबट समस्या, खंडित वीजपुरवठा, ग्लोबल वार्मिंग, अतिवृष्टी, सतत बदलणारे हवामान, बाजारभावाचा अभाव,अडते, व्यापारी यांच्याकडून होणारी फसवणूक यामुळे बळिराजा गलितगात्र झाला आहे. या प्रतिकूल परिस्थितीत बनावट बियाणे, खते, कीटकनाशकांची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करून जास्त दराने विक्री केली जात आहे .सर्वच बाजूने शेतकऱ्यांची पिळवणूक व अडवणूक होत असेल तर शेती कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार भाव न मिळाल्याने नुकतीच तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
कृषी विभाग कारवाई करते.खरीप व रब्बी हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच योग्य तपासणी झाल्यास शेतकऱ्यांची फसवणुकीला आळा बसेल. मात्र शासकीय यंत्रणेकडून तसे होताना दिसत नाही, अशी खंत शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे, अजित वालझाडे, रमेश कोल्हे, राजेंद्र वाजगे यांनी व्यक्त केली आहे.
कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी लॉट नंबर असलेले बिल घ्यावे. कृषी निविष्ठा केंद्राने बियाणे विक्री स्रोत प्रमाणपत्र असल्या शिवाय बियाणे विक्री करू नये. जास्त दराने विक्री करणाऱ्या व साठेबाजी करणाऱ्या कृषी निविष्ठा केंद्रावर कारवाई कठोर कारवाई केली जाईल.
-सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares