दुंडगेत रास्ता रोको – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
63353
दुंडगे : संकेश्‍वर-बांदा महामार्ग बाधितांनी केलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनप्रसंगी बोलताना राजेंद्र गड्यान्नावर.
दुंडगेत ‘रास्ता रोको’
संकेश्‍वर-बांदा महामार्ग बाधितांचे आंदोलन; पाचपट नुकसान भरपाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १९ : संकेश्‍वर-बांदा महामार्गाच्या कामाला सुरवात झाली आहे. यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी आज दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सुमारे पाऊण तास गडहिंग्लज-संकेश्‍वर राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
संकेश्‍वर-बांदा महामार्गाच्या कामाला सुरवात झाली आहे. मात्र, रस्त्याच्या कामाबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे शेतकरी एकत्र येऊन आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. आज दुपारी एकच्या सुमारास महामार्ग बाधित शेतकरी दुंडगे येथे जमले. त्यांनी गडहिंग्लज-संकेश्‍वर राज्यमार्ग रोखून धरला. रस्त्यावरच शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ‘पाचपट नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे…’ यासह विविध घोषणा देण्यात आल्या.
गड्यान्नावर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत या रस्त्यावरून वाहतूक वाढली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण होणे रास्त असले तरी त्यासंदर्भातील विविध प्रश्‍न अनुत्तरित आहेत. महामार्ग बाधितांना रेडिरेकनरच्या पाचपट भरपाई मिळाल्याशिवाय रस्त्याच्या कामाला हात लावू देणार नाही.’’ राजगोंडा पाटील, तमाण्णा ऊर्फ सिदगोंडा पाटील, अण्णासाहेब पाटील, रमेश आरबोळे यांचीही भाषणे झाली.
ओंकार घबाडे, हणमंत कानडे, राजेंद्र पाटील, प्रशांत काळापगोळ, राजू संकेश्‍वरी, संजय मिरजे, संजय देसाई, सदाशिव बागडी, सुभाष शिंदे, अजित धनगर यांच्यासह हिरलगेपासून हिटणीपर्यंतच्या गावातील महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त होता.
———————-
चौकट…
२८ नोव्हेंबरला बैठक…
दरम्यान, आंदोलनस्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर २८ नोव्हेंबरला गडहिंग्लज येथील शाहू सभागृहात दुपारी एकला बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. मुधाळे, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गड्यान्नावर यांनी केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares