तलासरीतील उन्हाळी शेती धोक्यात ; स्वातंत्र्यपूर्व काळातील काळू नदीवरील बंधाऱ्याची पडझड; रोजगारासाठी शेतकऱ्यांचे स्थलांतर – msnNOW

Written by

कासा : तलासरी तालुक्यातील काळू नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची पडझड झाल्यामुळे पाणी अडवले जात नाही. त्यामुळे  उन्हाळी शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे परिसरातील शेतकरी कुटुंबीयांवर रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर करण्याची वेळ येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचा फटका शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना बसत आहे.
तलासरी तालुक्याला वारोळी व काळू अशा दोन नद्या लाभल्या आहेत. काळू ऊर्फ दरोठा नदी उधवा येथून सूत्रकार, सावरोली, कोचाई, उपलाट व बोरमाळ इत्यादी गावांतून वाहत गुजरातला जाऊन मिळते. यातील कोचाई- बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या सात ते आठ हजार ग्रामस्थांना उन्हाळी शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी या नदीवर १८८५ साली कोचाई वडीपाडा येथे होरामजी दारबाजी व अदेशर्मीर दारबजी देवीयरवाला या पारशी कुटुंबाने  दोन बंधारे बांधले आहेत. बंधारे सुस्थितीत असताना येथील आदिवासी शेतकरी बंधाऱ्याच्या पाण्यावर पालेभाज्या, फूल व फळशेती तसेच अनेक बागायती करीत असत. कालांतराने हे बंधारे जीर्ण झाल्याने पावसाचे पाणी अडवता येत नाही.  सद्य:स्थितीत बंधारा कोरडा पडला आहे. तसेच उन्हाळय़ाच्या दिवसांत लगतच्या विहिरीही कोरडय़ा पडत असल्यामुळे भविष्यात सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. परिणामी उन्हाळी शेती धोक्यात आली आहे.
बंधाऱ्याअभावी येथील शेती सिंचनाखाली येऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांना  नाइलाजाने रोजगाराच्या शोधात स्थलांतर करावे लागत आहे. या गावात दरवर्षी उन्हाळय़ात पाण्याची पातळी खालावत असल्याने कूपनलिका, विहिरी कोरडय़ा पडतात आणि गावात पाणीटंचाई निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने बंधारा दुरुस्ती किंवा नवीन बंधारा बांधून द्यावा, अशी मागणी आदिवासी शेतकरी करीत आहेत.
या संदर्भात तलासरी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित अधिकारी यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
कोटय़वधींचा खर्च पाण्यात
बंधाऱ्याची दुरवस्था असताना भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी व शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यात खेडय़ापाडय़ातील नदी-नाल्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, येथे कोटय़वधी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक बंधारे निकामी झाले आहेत.
तीन वर्षांपूर्वी केवळ पाहणी
काळू नदीवरील या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी याकरिता आदिवासी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. या बंधाऱ्याची तीन वर्षांपूर्वी पाहणी करून मोजमापही करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू झाले नाही.
या नदीवर दोन ठिकाणी बंधारे ब्रिटिश काळात बांधण्यात आले होते. त्यामुळे पाणी साठवून शेती उपयोगी आणता येत होते. शिवाय गावातील भूगर्भातील पाणी पातळीही चांगली राहत होती. जीर्ण होऊन तुटलेल्या बंधाऱ्या जागी नवीन बंधारा बांधल्यास सिंचन क्षेत्राला लाभ होईल. – वसंत हाडळ (ग्रामस्थ)

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares