कंत्राटी कामगारांच्या भविष्यासाठी योजना – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
मुंबई, ता. २२ ः निवृत्त होणाऱ्या कामगाराच्या भविष्याची व्यवस्था करणारी योजना केंद्र व राज्य सरकारने आणावी यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित व्हाव्यात यासाठी आपण राज्य सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी शिवक्रांती कामगार संघटनेच्या मेळाव्यात दिली.
संघटनेचा पंचविसावा मेळावा सोमवारी लोणावळा येथे झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी कामगारांच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत चर्चा केली. जेव्हा कामगारांवर कोणतेही संकट, अडचण येईल, त्या वेळेला कामगारांच्या खांद्याला खांदा लावून मी नेहमीच त्यांच्यासोबत असेन, अशी ग्वाही त्यांनी कामगारांना दिली.
निवृत्त कामगारांच्या भविष्याची व्यवस्था करणारी योजना आणण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे आपण करू. यातील निधीपैकी काही भाग कंपनीमालक, काही भाग कामगार व उरलेले पैसे सरकार देईल. अशा प्रकारे कामगारांच्या निवृत्तीनंतरच्या काळातील विवंचना सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार करेल. यासाठी मी पुढाकार घेईन, असे आश्वासन दरेकर यांनी दिले.

घरे भाड्याने देण्याची परवानगी…
गिरणी कामगारांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोडपदेव येथे घरे दिली; मात्र हे कामगार निवृत्त असल्याने त्यांना कोणतीही बँक कर्ज देईना. त्यामुळे त्या कामगारांसोबत सहकर्जदार घेण्याची तसेच ही घरे भाड्याने देण्याची परवानगी आपण तेव्हाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मिळवून दिली. माथाडी कामगारांना सरकारने दिलेल्या भूखंडावर घरे बांधण्यासाठीही आपण वेगळ्या प्रकारे तोडगा काढला. माथाडींच्या पतपेढीला जिल्हा बँकेकडून कर्ज दिले व त्यातून पतपेढीकडून या कामगारांना घरासाठी अर्थसाह्य करणे भाग पाडले, असा दाखलाही दरेकर यांनी दिला.

शेतकरी आणि कामगार हे देशाचे महत्त्वाचे घटक सशक्त व ताकदवान असतील, तरच देशाचा गाडा पुढे जाईल. पंतप्रधान व राज्य सरकार यांनी या दोन्ही घटकांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.
– प्रवीण दरेकर, विधान परिषद गटनेते, भाजप
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares