गड-महामार्ग काम बंद – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
63770
कौलगे : संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. याप्रसंगी शेतकरी-अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक उडाली.
——————————
संकेश्वर-बांदा महामार्गाचे
काम पुन्हा बंद पाडले

कौलगेत शेतकरी-अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २१ : संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कामावरून बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गडहिंग्लज-आजरा मार्गावरील कौलगे (ता. गडहिंग्लज) येथे आज सलग दुसऱ्या दिवशी महामार्गाचे काम बंद पाडले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची जोरदार शाब्दिक चकमक उडाली. कामाच्या ठिकाणावरून वाहने हलविण्यास शेतकऱ्यांनी भाग पाडले.
संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, महामार्गाने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. बाधित जमिनीची मोजणी करावी, बाधित जमिनीची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. दरम्यान, ठेकेदार कंपनीने कामाला सुरुवात केली आहे. नुकसान भरपाईबाबत निर्णय होत नाही, तोवर काम करण्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. रविवारी (ता. २०) याच कारणावरून कौलगे येथे काम बंद पाडले होते.
दरम्यान, आज दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती शेतकऱ्यांना समजली. त्यानंतर कौलगे, अत्याळ गावातील शेतकरी जमले. त्यांनी काम बंद पाडण्यास भाग पाडले. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक ठरली आहे. तोपर्यंत काम न करण्याचा निर्णय झाला असताना पुन्हा काम का सुरू केले, असा जाब शेतकऱ्यांनी विचारला. याच मुद्यावरून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. या ठिकाणी स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव आले. त्यांनी अधिकाऱ्यांना यापुढे काम करण्यास विरोध केला. कामाच्या ठिकाणावरून पोकलॅनसह अन्य वाहने हलविण्यास भाग पाडले.
यावेळी जयवंत थोरवतकर, महेश शेट्टी, प्रशांत मुरुकटे, श्रीधर कदम, सुभाष देसाई, संजय पाटील, औदुंबर सुतार, पांडुरंग हजीरे, दिनकर देसाई, गजानन आर्दाळकर, विजय देसाई, बाळासाहेब देसाई, प्रकाश पोवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
…..
१ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन
संकेश्वर-बांदा महामार्गबाधित शेतकरी संघटनेतर्फे १ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन केले जाणार आहे. येथील प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन होईल. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची, घर असल्यास घराची मोजणी करून बाधित क्षेत्राची नुकसान भरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. आंदोलनादिवशी भूसंपादन अधिकारी, वनविभाग, महामार्ग विभागासह अन्य संबंधितांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच बैठक व संयुक्त मोजणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares