महावितरणकडून बागायतदारांना विजबिलांचा शॉक – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
महावितरणकडून बागायतदारांना वीजबिलांचा शॉक
निकषाविरोधात एल्गारची तयारी; आमदार निकम यांचा पुढाकार
रत्नागिरी, ता. २१ः रत्नागिरीसह कोकणातील सर्व कृषी, शेती पंपांची वर्गवारी ही बिगरकृषीमध्ये करण्यात आल्यामुळे आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागांना पाणी देण्यासाठी घेतलेल्या शेतीपंपांची बिले अव्वाच्या सव्वा येत आहेत. हा निकष महावितरणकडून फक्त रत्नागिरी जिल्ह्यालाच लागू केला आहे. अन्य जिल्ह्यात तशी बिले काढली जात नाहीत. विजबिलामुळे शॉक बसलेल्या आंबा बागायतदारांनी महावितरणविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्धार केला असून आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे.
रत्नागिरीतील काही आंबा-काजू बागायतदारांचे वीजबिल चौपट आले आहे. याबाबत प्रा. नाना शिंदे, सुभाष पोतकर, अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर यांच्यासह काही बागायतदारांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात आमदार शेखर निकम यांची भेट घेतली आणि भविष्यातील आंदोलनावर चर्चा केली. प्रत्येक तालुक्यातील बागायतदारांना एकत्रित करुन भविष्यात महावितरणच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार निकम यांनी जाहीर केले आहे. कोकणात साधारण ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतो, तिथपर्यंत सर्व पिकांना, फळबागा, नर्सरी- रोपवाटिका आदीना सिंचनासाठी पाणी लागत नाही. ऑक्टोबर हिटपासून ते जून मध्यापर्यंत सिंचनाची गरज भासते. बिगरकृषी या नव्या वर्गवारीद्वारे या कृषिपंपाना प्रचंड बिले येतात. विशेष म्हणजे हे प्रशुल्क फक्त आणि फक्त कोकणातील शेतकऱ्यांनाच लागू केले आहे. उर्वरित राज्यात कृषी अशीच नोंद केली जाते. हा अन्याय फक्त कोकणावरच केला जात आहे. हे बदल करताना कोणत्याच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जागेवर जाऊन पिकांची पाहणी केलेली नाही. भात सोडून आंबा, काजू, फणस, नर्सरी रोपवाटिका नारळी पोफळीच्या बागा आंतरपिके ही कृषीमध्ये मोडत नाहीत असा अजब शोध महावितरणने लावला आहे. त्यानुसार आयोगाकडून विजेचे दर लागू झाले आहेत. येणाऱ्या बिलांची जबरदस्तीने वसुली सुरू केली आहे. वसुली करताना धाकटशाही, जबरदस्ती व कायदेशीर धमक्या शेतकऱ्यांना मिळत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या-त्या भागतील अथवा जिल्ह्यातील सदस्य आयोगावर असणे बंधनकारक आहे; परंतु कोकणातील कोणीही सदस्य आयोगावर नाही. त्यामुळे वाढीव टेरिफला कोणीही आक्षेप घेतला नाही. ही कोकणातील शेतकर्‍यांच्या डोळयात केलेली धुळफेक आहे. कोकणातील शेतकरी हा संयमी, शांत, सहनशील व सहकार्य करणारा आहे. जाचक टेरिफमुळे दुर्दैवाने कोकणातील शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असतील तर त्याला जबाबदार महावितरण व महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग असेल असा इशारा बागायतदारांनी दिला आहे. हा प्रश्‍न कोकणातील मंत्री, सर्व आमदार, खासदारांमार्फत शासनापुढे मांडून तो सोडविण्यात येणार असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
—-
चौकट
मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
बागायतदारांवर महावितरणकडून होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हा नियोजनच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांच्यापुढे प्रश्‍न उपस्थित केला होता. मंत्री सामंत यांनी यावर तोडगा निघाल्याचे सांगितले होते; परंतु अजूनही महावितरण वाढीव बिले काढली जात आहेत. त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares