राहुरी : महाराष्ट्र बँकेत शेतकर्‍यांचे खाते होल्ड – MSN

Written by

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये शेतकर्‍यांचे खाते होल्ड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बँकेतील अधिकारी व कर्मचारी हे नेहमीच सर्वसामान्यांना मनस्ताप देत कामांना फाटा देत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे देण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठांनी कान टोचल्यानंतरही बँक ऑफ महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांचा कारभार ‘जैसे- थै’ असल्याचे चित्र आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टी व पिकांना भाव नसल्याने शेतकरी आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी वेळोवेळी बँक ऑफ महाराष्ट्र राहुरी शाखेमध्ये हेलपाटे मारतात.
बँकेचे उंबरठे झिझवूनही अधिकारी एक ना अनेक अडचणी सांगत शेतकरी, महिला व सर्वसामान्य खातेदारांना बँकेतच गुंतवून ठेवतात. बँकेत आलेल्या ग्राहकांना बँकेत आलो की एखाद्या चौकशी संस्थेमध्ये हे समजेनासे होते. ग्राहकांशी वाद विवादाच्या अनेक घटना घडत असतात. आमच्या विरोधात जे करायचे ते करा, असे सांगत बँक अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना मनस्ताप देत असल्याची चर्चा शहर हद्दीमध्ये होत आहे.
यासह अनेक शेतकर्‍यांचे बँक खाते कर्ज असल्याचे कारण सांगत किंवा जामिनदार असल्याचे सांगत होल्ड केल्याचे सांगितले जाते. परिणामी पैसे भरणे किंवा खात्यातील पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शेतकर्‍यांनी शासकीय योजनांचा लाभ व्हावा म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमध्ये आपले खाते उघडले. योजनेचे पैसे येऊनही होल्ड लावलेल्या खात्यातून शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेनासा झाला आहे.
संबंधित बँकेमध्ये शेतकर्‍यांसह महिला, विद्यार्थी व छोट्या मोठ्या व्यावसायिकांची हेळसांड पाहता बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वरिष्ठांनी तत्काळ दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास शेतकरी कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यात येणार आहे.
The post राहुरी : महाराष्ट्र बँकेत शेतकर्‍यांचे खाते होल्ड appeared first on पुढारी.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares