Gujarat Assembly Election : विधानसभेच्या रिंगणात रंगत – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
सुरेंद्रनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा खरपूस समाचार घेतला. जे सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत, ते सत्तेत परत येण्यासाठी यात्रा काढत आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
गुजरात विधानसभा निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. देशातील एकूण मीठापैकी ८० टक्के मीठ गुजरातेत तयार होते. तरीही गुजरातचेच मीठ खाऊनही काहीजण याच राज्याला नावे ठेवत आहेत, असा टोमणाही त्यांनी कुणाचे नाव न घेता लगावला.
पंतप्रधान पुढे म्हणाले, की दीर्घकाळापूर्वीच ज्यांना सत्तेवरून हटविण्यात आले होते. तेच लोक आता सत्तेत परत येण्यासाठी पायी यात्रा काढत आहेत. ते अशी यात्रा काढू शकतात. मात्र, गुजरातेतील नर्मदा धरणाचा प्रकल्प सुमारे ४० वर्षे रोखून धरून राज्याला तहानलेले ठेवणाऱ्यांसह ते या यात्रेत चालत आहेत, अशी टीकाही मोदी यांनी नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांचे नाव न घेता केली. लोकांना पाणीटंचाई भेडसावत असताना मी ही परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला.
मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे सुरेंद्रनगर जिल्ह्याला नर्मदा धरणाचा सर्वाधिक लाभ होत आहे. या निवडणुकीत गुजरातचे मतदार नर्मदा धरणाचा प्रकल्प रोखून धरणाऱ्यांना तसेच पदयात्रा काढणाऱ्यांनाही धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. पाटकर महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्या होत्या. पदयात्रा काढणाऱ्यांना भुईमूग व कापसातील फरक समजत नसल्याचा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता लगावला.
देशातील आदिवासींचा विकास होऊ नये, अशी भाजपची इच्छा आहे. आदिवासींची मुलं डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ नयेत, असे भाजपला वाटते, असा घणाघाती आरोप आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. गुजरातच्या रणसंग्रामात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एंट्री झाली आहे. देशातील तरुणांचे स्वप्न भंगले आहे, अशीही टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल यांनी आज पहिली सभा सुरत येथे घेतली. ते म्हणाले, की आम्ही ७० दिवसांपासून भारत जोडो यात्रा करत आहोत. आमच्यासमवेत लाखो लोक येत आहेत. या यात्रेत सर्व जाती, धर्माचे लोक येत आहेत. या दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला, परंतु यात्रा थांबली नाही. भारताला जोडण्याचे काम एका गुजराती महात्मा गांधी यांनी केले.
आम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा काढतो, तेव्हा ते (भाजप) दु:खी होतात. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही. देशातील तरुणांचे स्वप्न भंगलेले आहे. आदिवासींकडून जमीनी काढून घेतल्या जात आहेत. माझ्या आजीने (इंदिरा गांधी) मला शिकवले की, देशाचे पहिले मालक आदिवासी आहेत. मात्र देशातील आदिवासींचा विकास होऊ नये, असे भाजपने ठरविलेले दिसते.
भाजप आपल्याला आदिवासींना वनवासी म्हणते. एका अर्थाने ते ओळख संपविण्याचा प्रयत्न करत आहे, असेही राहुल यांनी नमूद केले. यात्रेच्या काळात शेतकरी, तरुण, आदिवासींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ते (भाजप) आदिवासींना देशाचे मालक कधीही म्हणत नाही, उलट आपण जंगलात राहता असा उल्लेख ते करतात. आपण शहरात राहावे, आपली मुलं डॉक्टर, इंजिनिअर व्हावेत, अशी त्यांची इच्छा नाही, असा आरोपही राहुल यांनी केला.
भारत जोडो यात्रा स्थगित करून राहुल गुजरातमध्ये
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात पोचली आहे. या यात्रेची सुरवात ७ सप्टेंबर रोजी झाली. आता विधानसभा निवडणुकीमुळे राहुल गांधी पदयात्रा स्थगित करून प्रचारासाठी सुरतला आले. सुरतनंतर त्यांनी राजकोटला सभा केली. १८२ सदस्यीय विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. आठ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे २६ आणि २८ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या दौऱ्यावर येत आहेत.
विधानसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी काँग्रेस मला ‘औकात’ दाखविण्याची भाषा करत आहे. खरे तर मोदींना कोणताही दर्जा नाही. मी केवळ कोणतीही ‘औकात’ नसलेला जनतेचा सेवक आहे. काँग्रेसचा उद्धटपणा तरी पाहा. पक्षाचे नेते एका राजघराण्यातील आहेत. यापूर्वीही काँग्रेसने माझ्याविरुद्ध ‘नीच आदमी’, ‘मौत का सौदागर’ आणि ‘नाली का किडा’ अशा शब्दांचा वापर केला आहे. मात्र, देशाच्या विकासावर लक्ष्य केंद्रित केल्याने मी असे अपमान गिळले आहेत.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares