औषधावरच औषध शोधण्याची वेळ… – msnNOW

Written by

प्रा. मंजिरी घरत
कोविडसारखी काही वैश्विक संकटे झंझावातासारखी येतात, जग दणाणून सोडतात, पण काही जागतिक समस्या मात्र हळूहळू वाटचाल करत असतात. २०५० ला अमुक होणार, २०३० ला तमुक होईल असे वाचनात आले तरी आपण तितकेसे गांभीर्याने घेत नाही. आज फार काही बिघडत नाही, पुढचे पुढे पाहू, असे वाटून खडबडून जागे होत नाही. अशा समस्यांची माहिती असते, पण महती माहीत नसते. अशाच दोन समस्या, म्हणजे जागतिक हवामान बदल आणि अँटिबायोटिक प्रतिरोध. या दोन्ही विषयांवर नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक चर्चा होत आहे आणि होणार आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे ६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान इजिप्त येथे आयोजित करण्यात आलेल्या हवामान बदलविषयक शिखर परिषदेत (कॉप २७) या समस्येचा आढावा घेण्यात आला. १८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान जागतिक अँटिबायोटिक (प्रतिजैविक) जनजागरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
प्रतिजैविक प्रतिरोध ही एक छुपी मात्र गंभीर साथ आहे आणि ती नकळत आपल्या दाराशी येऊन उभी ठाकली आहे. सूक्ष्म जंतू प्रबळ होत आहेत आणि प्रतिजैविके निष्प्रभ ठरत आहेत. जंतुप्रादुर्भाव नियंत्रण कठीण होत आहे आणि बरीच प्रतिजैविके त्यांच्या अस्तित्वाची लढाई हरत आहेत. जगात २०१९ मध्ये १३ लाख रुग्ण हे थेट बंडखोर जंतुप्रादुर्भावाने मृत्युमुखी पडले. हे प्रमाण मलेरिया (६.५ लाख मृत्यू) किंवा एड्स (८.५ लाख मृत्यू) पेक्षा जास्त आहे.
प्रतिजैविक प्रतिरोध हा मानवजातीसाठीचा एक जागतिक धोका आहे. यासंदर्भातील प्रबोधनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने २०१५ पासून दर नोव्हेंबरमध्ये जागतिक प्रतिजैविक जनजागरण सप्ताह आयोजित करण्यास सुरुवात केली. हे किती विचित्र आहे पाहा- औषधांचा शोध, विकास, उपयोग मानवाला वाचण्यासाठी, पण आज आटापिटा करावा लागतोय ते एका प्रकारच्या औषधाला वाचविण्यासाठी. हे वैद्यकीय इतिहासात अभूतपूर्व आहे. हा खटाटोप नेमका का करावा लागत आहे? तर मानवी चुकांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे.
मानवावरील उपचारांत आणि अन्नोत्पादक प्राण्यांमध्ये वजनवाढीसाठी व जंतुप्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा अतिरेकी वापर होत आहे. विविध कारणांमुळे पर्यावरणात जागोजागी प्रतिजैविकांचे अंश साठत गेले आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणजे आज समोर ठाकलेली प्रतिजैविक प्रतिरोधाची समस्या. मानव, प्राणी, वनसंपत्ती, अन्न, जमीन, पाणी हे सारे काही परस्परांशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रतिजैविकांचा गैरवापर कुठेही झाला तरी संपूर्ण परिसंस्थेवर त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाची फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, पर्यावरण प्रकल्प, जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ या चार जागतिक संघटनांनी एकत्र येऊन ‘मिळून सारे करू प्रतिजैविक प्रतिरोधाचा प्रतिबंध,’ असे ध्येयवाक्य यंदाच्या प्रतिजैविक सप्ताहासाठी निश्चित केले. यात ‘मिळून सारे’वर भर देण्यात आला आहे.
प्रतिजैविक प्रतिबंध म्हणजे नेमके काय?
शरीरातील उपद्रवी जिवाणूंचा नायनाट करणे हे प्रतिजैविकांचे काम असते. मात्र जेव्हा या प्रतिजैविकांचा अति प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, तेव्हा रुग्णाच्या शरीरातील जिवाणूंना प्रतिजैविकांची काम करण्याची पद्धत जोखण्याची मुबलक संधी मिळते. या संधीचा फायदा घेत ते अत्यंत चतुराईने स्वत:त बदल (म्युटेशन) घडवून आणतात.
नैसर्गिकरीत्यासुद्धा म्युटेशन होत असतात, पण प्रतिजैविकांच्या अतार्किक वापराने त्यांना चालना मिळते. अशा स्थितीत प्रतिजैविकांनाही चकवा देणाऱ्या प्रजाती निर्माण होतात. थोडक्यात, जिवाणूंच्या नवीन पिढ्या या निर्ढावलेल्या आणि बंडखोर असतात. पूर्वी एखाद्या प्रकारच्या जिवाणूंना लीलया नामोहरम करणारी प्रतिजैविके मग या नव्या पिढीच्या बंडखोर जिवाणूंपुढे केविलवाणी होतात. त्यांची परिणामकारकता कमी होत जाते आणि संपतेदेखील. यालाच म्हणतात प्रतिजैविक प्रतिरोध किंवा अँटिबायोटिक रेझिस्टन्स. अशा वेळी बंडखोर जंतूंमुळे झालेला संसर्ग नियंत्रणात येत नाही, रुग्ण बरा होत नाही. परिणामी रुग्णाला अधिक क्षमतेचे प्रतिजैविक देण्याची वेळ येते. काही जिवाणू मात्र सर्व प्रतिजैविकांना प्रतिकार करतात. तसे झाल्यास आपल्याकडे काहीच उपाय राहत नाही. आज अनेक रुग्णांत सर्वाधिक प्रभावी समजली जाणारी, हाय ॲण्ड अँटिबायोटिक्स- कार्बापिनिमनाही जिवाणू पुरून उरत आहेत.
जसे बंडखोर सूक्ष्म जीव पाणी, माती, मलमूत्र, दूषित वस्तू अशा माध्यमांतून लीलया एका रुग्णाकडून थेट दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्याचप्रमाणे त्यातील जनुकेही सहज एका जिवाणूतून दुसऱ्या जिवाणूत प्रवेश करतात. ही बंडखोरी तेथील सर्वच जिवाणूंत पसरते. हे ‘बंडखोर’ यथावकाश समाजात इतस्तत: संक्रमित होतात. प्रतिरोध ही समस्या वैयक्तिक न राहता सामाजिक आरोग्याची बाब होते. या प्रसाराला कोणत्याच सीमा नाहीत. त्यामुळे असा प्रतिरोध जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या टोकाला पसरायला वेळ लागत नाही.
प्रतिजैविकांचा कमी-अधिक वापर म्हणजे काय?
वैद्यकीय व्यावसायिक, फार्मासिस्ट आणि रुग्ण यांच्यामध्ये कोणतीही औषधे देताना, आणि घेताना औषधभान हवेच, पण प्रतिजैविकांबाबत तर ही जबाबदारी अधिक वाढते. १९४० च्या सुमारास पहिले अँटिबायोटिक पेनिसिलीन हाती आले आणि आज २००-२५० प्रतिजैविके आणि त्यांची मिश्रणे उपलब्ध आहेत. काही अँटिबायोटिक नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे जिवाणूंच्या थोड्याच जातींविरुद्ध काम करतात. उदा. पेनिसिलीन हे मुख्यतः ‘ग्राम पॉझिटिव्ह’ (उदा. घसा, श्वसनमार्ग यांच्या संसर्गाला कारणीभूत ठरणारे स्ट्रेप्टोकोकाय हे जिवाणू) प्रकारच्या जिवाणूंविरुद्ध उपयुक्त ठरते. तर काही प्रतिजैविके ‘ब्रॉड स्पेक्ट्रम’ म्हणजे जिवाणूंच्या बहुविध प्रजातींविरुद्ध उपयुक्त आहेत. उदा. सिप्रोफ्लोक्सासिन गटातील किंवा सेफ्लॉस्पोरीन गटातील बहुतांशी प्रतिजैविके ही ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह अशा विविध जिवाणूंविरुद्ध प्रभावी आहेत.
प्रतिजैविकांची निवड ही संसर्गाच्या प्रकारानुसार, लक्षणे, आजाराची गुंतागुंत, रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, वय, असे अनेक घटक पाहून करणे गरजेचे असते. विशिष्ट कालावधीत विशिष्ट मात्रेत प्रतिजैविकांचा ‘कोर्स’ करायला सांगितले जाते, जेणेकरून सर्व जंतूंचा नायनाट होईल. क्षयरोगसारख्या संसर्गात कमीत कमी सहा ते आठ महिने औषधे घ्यावीच लागतात.
प्रतिजैविकांच्या वापरासाठी प्रमाण मार्गदर्शक तत्त्वे
प्रतिजैविकांच्या वापरासाठी प्रमाण मार्गदर्शक तत्त्वे असतात. साधा घसा खवखवत असेल किंवा किरकोळ ताप असेल तर लगेच प्रतिजैविकांची गरज नसते. पोट बिघडल्यास प्रतिजैविके नव्हे तर जलसंजीवनी व तत्सम उपायांची गरज असते. सर्दी-पडसे अशा किरकोळ विषाणूजन्य आजारांसाठी तर प्रतिजैविके उपयोगाची नाहीतच.
कोणत्या प्रतिजैविकांना जलद प्रतिरोध होत आहे याचा अभ्यास करून जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिजैविकांचे तीन गटांत (ॲक्सेस, वॉच, रिझर्व्ह) वर्गीकरण करून २०१७ ला पहिली यादी प्रसिद्ध केली. २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या यादीत एकूण २५८ प्रतिजैविकांचा समावेश आहे. प्रतिजैविके आवश्यक असल्यास शक्यतो ‘ॲक्सेस’ ही पहिल्या गटातील प्रतिजैविके वापरावीत. ‘वॉच’ म्हणजे अगदी जपून वापरायची प्रतिजैविके आणि ‘रिझर्व्ह’ म्हणजे जेव्हा इतर प्रतिजैविके काम करत नाहीत, अत्यंत गंभीर गुंतागुंतीचा संसर्ग झालेला असतो तेव्हा, प्रतिरोध निर्माण झालेले जिवाणू असतात तेव्हाच ही राखीव अस्त्रे वापरायची, असे सर्वसाधारण मार्गदर्शन यात आहे. एकूण प्रतिजैविक वापरातील ६० टक्के ही ॲक्सेस गटातील असावीत अशी अपेक्षा आहे.
वस्तुस्थिती काय दिसते?
गरज नसताना प्रतिजैविके देणे, मोठ्या प्रतिजैविकांचा विनाकारण वापर, एका वेळी दोन प्रतिजैविकांचा मारा अशी बरीच ‘प्रिस्क्रिप्शन्स’ आढळतात. काही डॉक्टर्स, काही रुग्णालये मात्र या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करतात. पण हे सार्वत्रिक चित्र नाही. चाचण्या करण्याची सुविधा सहजी, माफक दरात उपलब्ध नसणे, झटपट गुण यावा ही रुग्णांची अपेक्षा आणि दबाव, औषधनिर्मिती कंपन्यांचे ‘प्रॉडक्ट प्रमोशन’, अपुरे वैद्यकीय ज्ञान, प्रतिजैविक प्रतिरोधासंबंधी माहिती नसणे किंवा निष्काळजी दृष्टिकोन अशा अनेक बाबींमुळे अनेक ठिकाणी प्रतिजैविकांची प्रिस्क्रिप्शन्स तार्किक रीतीने लिहून दिली जात नाहीत. जिथे सुरीने काम होणार आहे, तिथे तलवार परजायची गरजच नसते, पण हे लक्षात कोण घेतो? अलीकडे प्रतिजैविक वापरासाठी झालेल्या एका पाहणीत ‘वॉच’ गटातील प्रतिजैविकांचा वापर तब्बल ५५ टक्के आणि ‘ॲक्सेस’ अँटिबायोटिकचा वापर फक्त २७ टक्के होता. ज्यावर किंमत नियंत्रण असते अशा ‘आवश्यक औषधांच्या यादी’तील प्रतिजैविके केवळ ४९ टक्के वापरली गेली. ३४ टक्के औषध मिश्रणे वापरली गेली.
कोविड महासाथीच्या सुरुवातीला जनजीवन घरातच बंदिस्त झाल्याने संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले. अनेक देशांत प्रतिजैविकांचा वापर लक्षणीयरीत्या घटला. आपल्याकडे मात्र कडक टाळेबंदी असतानादेखील प्रतिजैविकांचा खप वाढला. गरज असो नसो, अनेकांनी अझिथ्रोमायसिन हे ‘वॉच’ गटातील प्रतिजैविक घेतले. अझिथ्रोमायसिनच्या प्रतिरोधात लक्षणीय वाढ झाली तर नवल नाही.
काही सुशिक्षित, सजग नागरिक वगळता सर्वसामान्यांमध्ये प्रतिजैविकांविषयी पुरेशी जागरूकता नसणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. स्ट्राँग औषध, शॉर्टकट, झटपट उपाय पाहिजेत ही मानसिकता असते, पण अनेकदा यासाठी आपण प्रतिजैविके घेत आहोत किंवा जुन्या अनुभवातून स्वत:च फार्मासिस्टकडे मागत आहोत, हे स्पष्ट माहीत नसते. काही जुनी प्रतिजैविके इतकी स्वस्त आहेत की किंमत हा मुद्दाही फारसा आड येत नाही. प्रतिजैविके वारंवार वापरून त्यांचे दुष्परिणाम होतातच. आतड्यातील गुणी उपयुक्त जिवाणूंच्या वसाहतींनाही धक्का पोहोचतो. उपद्रवी संधिसाधू जिवाणू, बुरशीच्या प्रजातींना संधी मिळते आणि त्यातून नवे आजार उद्भवतात. हे स्वतःचे स्वतः डॉक्टर होऊन प्रतिजैविके घेणाऱ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
प्रतिजैविके ही केवळ प्रिस्क्रिप्शनने देण्याची औषधे असतानादेखील रुग्णाने मागितली म्हणून, अनेक औषध दुकानांत (सन्माननीय अपवाद वगळता) ती विकली जातात. तशी न दिल्यास रुग्णही खट्टू होतो आणि दुसरीकडे जाऊन किंवा ऑनलाइन मागवतो. फार्मासिस्टने विनाप्रिस्क्रिप्शनने प्रतिजैविके विकणे योग्य नाही. रुग्णांना समुपदेशन करणे अपेक्षित आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली किंवा स्वमनाने घेतलेली प्रतिजैविके रुग्णांकडून जबाबदारीने घेतलीही जात नाहीत. कोर्स अर्धवट सोडला जातो. जरा बरे वाटले की औषधे थांबवली जातात आणि त्यामुळे पुढे बंडखोर जंतुजन्य संसर्गांचा सामना करावा लागतो. घरात उरलेली प्रतिजैविके लक्षणे सारखी वाटली म्हणून इतर कुटुंब सदस्यांनी घेणे असेही चुकीचे प्रकार होतात.
प्रगत देशांत आणि अनेक विकसनशील देशांतही प्रतिजैविकांचा वापर फार काळजीपूर्वक केला जातो. उगाच किरकोळ ताप, खोकला वगैरेसाठी पहिल्या दिवसापासून प्रतिजैविके देता येत नाहीत. डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही संयम बाळगावा लागतो. अगदीच गरज वाटलीच तरच (शक्यतो काही चाचण्या, तपासण्या करून) नंतरच वापर होतो. उपचारांची मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागतात. रुग्णसुद्धा स्ट्राँग औषध द्या असा दबाव आणून प्रतिजैविके देण्यास डॉक्टरांना भाग पडू शकत नाहीत. फार्मासिस्टही प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैविके देत नाहीत, रुग्णास समुपदेशन करतात. काही देशांत तर फार्मसीच्या दुकानातच रुग्णास संसर्ग आहे का याची शहानिशा करायला फार्मासिस्ट्स चाचण्या (पॉइंट ऑफ केअर टेस्टिंग) करतात. उदाहरणच द्यायचे तर सर्वात सामान्य असलेला घशाचा संसर्ग. फार्मासिस्ट यासाठी ‘स्ट्रेप थ्रोट’ चाचणी करतात. संसर्ग आढळल्यास डॉक्टरकडे पाठवतात. अनेक देशांत लेबलवर स्पष्टपणे अमुक औषधात प्रतिजैविके आहेत असे नमूद केलेले असते त्यामुळे ग्राहकांनाही समजणे सोयीचे होते.
पाळीव प्राण्यांतील वाढता वापर
अन्नोत्पादक प्राण्यांमध्ये (गाई, म्हशी, डुकरे, शेळी, मेंढ्या, कोंबड्या वगैरे) प्रतिजैविकांचा वापर प्रचंड वाढत आहे. अंडी, दूध, मांस, मासे या उत्पादनांत जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक पहिल्या पाचांत आहे. प्राण्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजे २३ टक्के प्रतिजैविके चीनमध्ये वापरली जातात, अमेरिका १३ टक्के, ब्राझील ९ टक्के आणि भारत व जर्मनी प्रत्येकी ३ टक्के असे सध्याचे चित्र आहे. जंतुसंसर्ग झाल्यावर, जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून आणि काही ठिकाणी प्राण्यांची वजनवृद्धी व्हावी यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. प्राण्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे फारसे सोयीचे नसणे, डॉक्टरांची कमतरता, आर्थिक नफ्याची गणिते या साऱ्या बाबी आहेतच. प्राणी आणि मनुष्य यांमधील संसर्ग बरेचसे समान असतात. त्यामुळे उपद्रवी जिवाणू आणि वापरण्यात येणारी प्रतिजैविकेही बरीचशी समान असतात. उदा. पेनिसिल, टेट्रासायक्लिन, विविध फ्लोक्सासिन्स, सल्फा. प्राण्यांमध्ये एखाद्या प्रतिजैविकांविरुद्ध बंडखोर जिवाणू निर्माण झाले की ते प्रत्यक्ष संपर्काने किंवा त्यांच्यापासून मिळणाऱ्या अन्नपदार्थांतून मनुष्यात प्रवेशतात. २०१७ साली सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेण्ट या प्रसिद्ध संस्थेने चार राज्यांतील १२ पोल्ट्रीचे सर्वेक्षण केले. ई कोलाय, क्लेबसियाला आणि स्टाफयलोकोकस लेन्टस हे जिवाणू महत्त्वाच्या १६ प्रतिजैविकांना दाद देतात (सेन्सिटिव्हिटी टेस्ट) का ते पाहिले गेले. यापैकी १०० टक्के ई कोलाय, ९२ टक्के क्लेबसियाला आणि ७८ टक्के स्टाफयलोकोकस हे १० ते १२ प्रतिजैविकांना प्रतिरोधक झाले होते. अर्थातच ही बंडखोरी आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही .
पर्यावरणात तर जिथे तिथे प्रतिजैविकांचे अंश असल्याचे पुरावे मिळतात. मातीत, नदीत, तलावात, सांडपाण्यात सर्वत्र प्रतिजैविकांचे अस्तित्व आहे. रुग्णांच्या मलमूत्रातून बाहेर पडणारी औषधे, रुग्णांनी कचऱ्यात फेकलेली मुदतबाह्य किंवा नकोशी प्रतिजैविके; फार्मा उद्योजकांनी नीट प्रक्रिया न करता फेकलेली प्रतिजैविके हे सारे पोटात घेते ते पर्यावरण. आणि या ना त्या रूपात हे प्रतिजैविकांचे अंश अन्नसाखळीतून परत आपल्याकडे येतात आणि वर्तुळ पूर्ण होते.
स्वीडिश एजन्सी सीव्ही, पाणी या विषयावर काम करते, त्यांनी रॅम्प म्हणजेच ‘रिस्पॉन्सिबल अँटिबायोटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ स्थापन केली आहे. यात प्रतिजैविके उत्पादक एकत्र येऊन अधिक जबाबदारीने अँटी-मायक्रोबिल औषधांचे उत्पादन, पर्यावरणात अँटिमायक्रोबिलचे अंश पोहोचून प्रतिरोध वाढू नये यासाठी विचार आणि कृती करण्याचा स्वागतार्ह प्रयत्न आहेत. भारतातील सर्व छोटे-मोठे प्रतिजैविक उद्योजक अधिक जागरूक होतील आणि पर्यावरणस्नेही कृती करतील, अशी अपेक्षा आहे.
प्रतिजैविकांवर आधारित औषधांची विविध मिश्रणे, त्यातही अनेक शास्त्रीयदृष्ट्या अतार्किक असण्याचीच शक्यता, ही भारतात मोठी डोकेदुखी आहे. हा खास ‘ये है इंडिया’ प्रकार आहे. जेव्हा अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये फक्त दोन-चार मिश्रणे असतील तर आपल्याकडे तब्बल ७०-८० असतात. जगात कुठेच असा मिश्रण औषधांचा सुळसुळाट नाही. २०१५ मध्ये ७५ देशांच्या सर्वेक्षणात भारतात सर्वांत जास्त म्हणजे तब्बल ८० प्रतिजैविक मिश्रणे बाजारात होती आणि त्यातही प्रगत देशांत न वापरली जाणारी मिश्रणे सर्वाधिक होती. त्यातील ७५ टक्के औषधे ही आवश्यक औषध यादीतील नव्हती. (मिश्रणात अशा यादीतील एक जरी औषध असेल तर किंमत नियंत्रणाच्या नियमांमधून त्या औषधाची, म्हणजे उत्पादकाची सुटका होते) अशा औषध मिश्रणांचा वापर हेदेखील प्रतिजैविक प्रतिरोध वाढण्यास कारणीभूत होतो.
प्रतिजैविके प्रतिरोधाची समस्या अशी बहुआयामी आहे. शासन, प्रशासन, डॉक्टर्स, औषध कंपन्या, फार्मासिस्ट्स, रुग्ण, रुग्णालये, शेतकरी, अन्नोत्पादक अशा अनेक घटकांनी या गंभीर समस्येसाठी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रतिजैविक धोरण वगैरे अस्तित्वात आले आहे, पण अधिक ठोस उपाय व त्याची परिणामकारक अंमलबजावणी आवश्यक आहे. नवीन प्रतिजैविकांसाठी जोमाने संशोधनाची गरज आहे. प्रतिजैविके प्रतिरोध थोपवण्याचा सर्वांत कमी खर्चीक आणि सोपा उपाय म्हणजे ती कमीत कमी वापरावी अशी परिस्थिती निर्माण करणे, अर्थात संसर्ग होऊ न देण्याचा प्रयत्न करणे हाच होय. सर्वांसाठी पायाभूत सुविधा, लसीकरणही महत्त्वाचे. स्वच्छता, रोगप्रतिकारकशक्ती टिकवणे हे प्रत्येकाने केलेच पाहिजे.
मुद्दाम लक्षात ठेवावे…
• प्रतिजैविके ही शेड्युल एक आणि एच-१ प्रिस्क्रिप्शनने व डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची औषधे आहेत, स्वत:च्या मनाने घेण्याची नाहीत.
• इतर औषधांप्रमाणेच अँटिबायोटिक्सच्या लेबलवर डावीकडे तांबडी रेघ, आरएक्स ही खूण, शेड्युल एच किंवा एच१ असे चौकटीत लिहिलेले असते.
• लवकर बरे व्हायचेय, स्ट्राँग औषध द्या, अँटिबायोटिक्स द्या, असा दबाव डॉक्टरांवर वा औषध दुकानात जाऊन फार्मासिस्टवर आणू नये. फार्मासिस्टनेही प्रिस्क्रिप्शनविना प्रतिजैविके विकणे योग्य नाही. रुग्णांनीही डॉक्टर्स व फार्मासिस्टना सहकार्य करणे आवश्यक आहे.
• डॉक्टरांकडून निघताना प्रिस्क्रिप्शनमध्ये प्रतिजैविक लिहिले आहे का, असल्यास ते कोणते, त्याचा कोर्स किती दिवसांचा हे जाणून घ्यावे, फार्मसीमध्ये फार्मासिस्टलाही याबाबत विचारावे व मार्गदर्शन घ्यावे.
• प्रतिजैविकांचा सांगितलेला कोर्स जरी त्वरित बरे वाटू लागले तरी अर्धवट सोडू नये. ५, ७, १०, १५ दिवस वगैरे जो कालावधी सांगितला आहे तो पूर्ण करावा.
प्रतिजैविक युगाचे जनक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी ‘जपून वापर प्रतिजैविके’ असा इशारा नोबेल पारितोषिक स्वीकारतानाच दिला होता. तो आपण गांभीर्याने घेतला नाही आणि आज प्रतिरोधाचा टाइम बॉम्ब समोर उभा आहे. आपल्याला प्रतिजैविकांचे भान आता तरी येईल का?
लेखिका औषधनिर्माणशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
ईमेल : symghar@yahoo.com

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares