'नवरा दारू पिऊन डांगडिंग करायला गेला तर, म्हणून जमीन माझ्याच नावावर करून घेतली' – BBC

Written by

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
शेतकरी नर्मदा चव्हाण
"मंडळीचं ऐकलं म्हणूनच मी सुखी झालो. नसतं ऐकलं तर जेलात जात राहिलो असतो कच्च्या भाकरी खायला. चोरीचा मनी आणून पोत गळ्यात घालत होतो, ते सोडून दिलं. आता कष्टाचे मनी मिळवत असल्यामुळे मंडळी खुश आहे."
70 वर्षांचे आयजी चव्हाण त्यांच्या मंडळीचे म्हणजेच बायकोचे आभार मानत आहेत. कारण आयजी यांची पत्नी नर्मदा चव्हाण यांनी वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यामुळे, साथीमुळे आयजी यांचं आयुष्य बदललंय. त्यांचा प्रवास गुन्हेगारापासून ते यशस्वी बागायतदार शेतकरी असा झालाय.
नर्मदा आणि आयजी चव्हाण औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडजी गावात राहतात. आम्ही या दाम्पत्यासोबत त्यांच्या मोसंबीच्या बागेत फिरत असताना नर्मदा यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता. नर्मदा यांच्या शेतात 1200 झाडांची मोसंबीची झाडं आहेत.
"आता आनंद वाटतो जीवाला. खूश वाटतं. कुणाच्या शेतात मोसंब्या तोडायला गेलो की लोक म्हणायचे, तुला काय हातपाय नाहीत का कामं-धंदे करायला? आता आपल्याच झाडायला येऊन लोक मोसंबी खायलेत," मोसंबीच्या बागेत फिरताना नर्मदा सांगत होत्या.
याच मोसंबीच्या बागेतून यंदा चव्हाण दाम्पत्यानं चांगली कमाई केली आहे.
"यंदा 17 हजार रुपये टनानं मोसंबी गेली. 12 ते 13 टन इतका माल भरला," आयजी सांगत होते.
आता चव्हाण दाम्पत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी त्यांचा भूतकाळ मात्र तितका सुखकर नव्हता.
वयाच्या चौदाव्या वर्षी नर्मदा यांचं लग्न औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडजी गावातील आयजी चव्हाण यांच्याशी झालं. पण आयजी सोन्याच्या खोट्या अंगठ्या विकत, कोंबड्या चोरत. नर्मदा यांच्याच भाषेत सांगायचं तर आयजी चुकीची कामं करत.
आयजींच्या या कामांमुळे पंचक्रोशीत चोरीची घटना घडली, की संशयाची सुई चव्हाण दाम्पत्याकडे वळत असे.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
चव्हाण दाम्पत्य त्यांच्या ट्रॅक्टरसह.
नर्मदा सांगतात, "कुठे कुणी काहीही केलं तर आयज्यानं केलं म्हणायचे. कुणी खबरी लोक लावायचे. कुणी केलं तर आयज्यानं केलं, असं ते सांगायचे. आयज्यानं केलं नाही केलं, तरी आयज्याच्या कपाळावर चोर लिहिलेलं हायेच."
आयजी यांच्यावर यामुळे गुन्हेगाराचा शिक्का बसला आणि त्यांच्या कुटुंबालाही याची झळ सोसावी लागली. गावात आणि समाजात वावरताना त्यांना याचा अनुभव यायला लागला.
त्या दिवसांबद्दल विचारल्यावर नर्मदा सांगतात, "पहिल्यानं लोक आमच्याकडे टकाटका पाहत होते. हा डाकू आला. इकडंतिकडं काय बघायला लागला ह्यो. लेकराला चांगलं बघत नव्हते. बाया गळे झाकून घ्यायच्या, सोनंनाणं झाकून घ्यायच्या आम्हाला बघून. तो आपल्याकडे पाहतो, तर रात्री येईल आणि घेऊन जाईल असं त्यांना वाटायचं."
आयजी आणि नर्मदा यांना एकूण 9 मुलं. यात 5 मुलं आणि 4 मुली. मुलं मोठी व्हायला लागल्यानंतर मात्र नर्मदा यांनी आयजींना मार्गावर आणण्याचा चंग बांधला. अपमानाचं जगणं सोडून त्यांनी नवऱ्याला शेतीकडे वळवण्याचा निर्धार केला.
"त्यांचा मार्ग बदलण्यासाठी असा विचार केला की, आपले तीन लेकरं हाताखाली आले. काम करायसारखे झाले. त्यामुळे मग हे सारं सोडून देऊन कष्टाला लागावं, असं मालकाला बोलले. सासऱ्यानं जमीन घेऊन ठेवलेली होती. त्यामुळे मग जमीन वहिती करावं असं डोक्यात आलं. आम्ही दोघांनी विचारानं केलं आणि विहीर खोदण्यापासून सुरुवात केली."
नर्मदा आणि आयजी यांच्या शेतातील विहीर पाण्यानं तुडुंब भरलेली आहे. 90 फुटांची ही विहीर आहे. आम्ही विहीरीपाशी पोहोचलो तेव्हा तहान लागल्यानं आयजी आणि नर्मदा याच विहीरीतील पाणी एका बाटलीत भरून घेत होते आणि ते पीत होते.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
नर्मदा यांच्या शेतातील विहीर.
विहीर ही चव्हाण दाम्पत्याच्या परिवर्तनाची सुरुवात होती. त्यानंतर नर्मदा यांनी पतीला ट्रॅक्टर आणि मळणीयंत्र घ्यायला लावलं.
"मराठी लोक जे कष्ट करू राहिलेत ते मी पाहिलं. कशानी काय वर येऊ राहिलेत, कशानी काय नाही वर येऊन राहिलेत, ते पाहिलं. म्हणून ते डोक्यात बसिवलं. मग मालकाला सांगितलं, की बाबा आयजी तू असं डोक्यात धर.
असंच एकदा ट्रॅक्टरवाला नांगराला आणला आम्ही. तर त्यानं विषय काढला की, आयजी मामा तुला एवढी जमीन आहे. एवढा पैसा नांगराटीत घालूस्तर तू एक ट्रॅक्टरच घेऊन टाक ना. मग ट्रॅक्टरचं त्यांच्या डोक्यात घुसवलं. ट्रॅक्टर आणलं. मग मळणीयंत्र घ्यायचं डोकं लावलं."
नर्मदा यांचं घर वडजी गावापासून जवळपास किलोमीटरभर अंतरावर आहे. पत्र्याच्या घरात त्यांची 5 मुलं, 4 मुली आणि जावई असे सगळे एकत्र राहतात. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा लहान मुलं हातात गलोर घेऊन उभी होती.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
मळणीयंत्र.
याच घरासमोर ट्रॅक्टर आणि मळणीयंत्र उभं केलेलं दिसलं. तर घराला लागून कोंबड्यांसाठीचं खुराडं तयार केलेलं दिसलं.
नर्मदा आणि त्यांचं कुटुंब भविष्यात बरकत कशानं येईल, याच्याच विचारात असल्याचं जणू ते द्योतक होतं.
"आता इथून पुढं तुरीचे, गव्हाचे खळे निघतेल. जवारीचे खळे निघतेल. फायद्यानं फायदा वाढत चालला आता. ट्रॅक्टरचा फायदा असा होतो की, नांगरटीचा पैसा निघतो. रोटा मारितो. रोट्याचा पैसा येतो. मोगडा मारलेला तो पैसा येतो. बाराशे रुपये एकर घेतेत. याचा पैसा येतो लेकराबाळाला," नर्मदा सांगतात.
जे नर्मदा आणि आयजी यांनी भोगलं, ते मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी या दाम्पत्यानं घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांना सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा सल्ला दिला.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
नर्मदा यांनी घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत.
"खबरी लोक आमच्याविषयी खोटे गुन्हे करत होतो, म्हणून शीशीटीव्ही बसविली. आता कुठंही काही झालं तर मह्यावाले पाचही लेकं, नवरा, जावई सगळे घरातच हायेत ते बघावं. तिथून पुढं काय करायचं ते तुम्ही करा. शीशीटीव्ही येऊन बघायची, रात्रंदिवस लेकरं घरी कष्टाला हायेत की नाही, घरी झोपलेले हायेत की नाही ही चौकशी करायची आणि मग करा काय करायचं ते."
चव्हाण दाम्पत्याकडे एकूण 15 एकर जमीन असल्याचं आयजी चव्हाण सांगतात. त्यापैकी 4 एकर शेतजमीन नर्मदा यांनी स्वत:च्या नावावर करून घेतलीय.
यामागचं कारण विचारल्यावर त्या सांगतात, "बाईच्या नावावर जमीन असली, तर नवरा पेऊन-खाऊन समजा कुठं डांगडिगी करायला गेला, कुठं जमीन-फिमीन यानं इकून टाकिली, कुठं गहाण ठेवून टाकिली म्हणून असं वाटलं की जमीन आपल्या नावावर करून ठेवली तर आपल्या मुलाबाळाला कामी येईल. आपली मुलंबाळं आपल्यालाही पोसतेन, नवऱ्यालाही पोसतेन.
"नवऱ्याच्या एकट्याच्याच नावावर ठेवली तर आपल्याला कुणी इचारायचं नाही, सुनाबाळा इचारायच्या नाहीती. म्हणून आपल्या नावावर 4 एकर जमीन करून घेतली."
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
चव्हाण कुटुंबीय.
गुन्हेगार ते बागायतदार शेतकरी या प्रवासात पत्नीचा मोठा वाटा असल्याचं आयजी मान्य करतात.
"माझ्यामुळे बायकोलाही वनवास व्हायचा. ती म्हणायची हा धंदा सोड आणि सुखाला लाग. मी कष्ट करते, तूही कष्टाला लाग. याच जन्मात आपल्याला सुख आलं पाहिजे, असं ती म्हणायची," आयजी सांगतात.
"जेल भोगण्यापेक्षा, कष्ट करून सुखी राहणं कधीही चांगलं. आधी जंगलात पळायचो, आता मात्र घरी सुखात झोपतोय," असंही ते पुढे सांगतात.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
गुन्हेगारी सोडून सन्मार्गावर आल्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी चव्हाण दाम्पत्याचा त्यांच्या गावी जाऊन सत्कार केलाय.
सध्या आयजी यांच्या शेतात बाराशे मोसंबीची झाडं आहेत. याशिवाय त्यांनी कापूस, ऊसाची लागवड केलीय. जोडीला ट्रॅक्टर, बैलगाडी, मळणी यंत्र, तीन विहिरी, सालगडी, असं सगळं आहे. आता त्यांना अपेक्षा आहे ती घरकुल आणि रेशन कार्डाची.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares