पिंपरी कार्यालय वर्धापनदिन मावळ २०२२ – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
शहरीकरणाकडे
ऊर्सेची वाटचाल
पुणे-मुंबई महामार्गाजवळील व पुणे शहरापासून अवघ्या ४० किलोमीटरवर तसेच हवेली मुळशी तालुक्याच्या जवळ असलेल्या ऊर्सेत नवनवीन गृहप्रकल्प होत असल्याने या गावाची शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल होत आहे. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल भविष्यासाठी नियोजनपूर्वक बांधकामांसह गरज आहे ती सार्वजनिक सेवा सुविधांची अन्‌ धोरणात्मक निर्णयांची. ऊर्सेगाव मोठी व्यापारी पेठ, औद्योगीकरण यामुळे प्रसिद्ध आहे. ऊर्सेचे ऐतिहासिक महत्त्व देखील मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात येथील दोन मावळ्यांनी आपले मोठे योगदान दिले होते, असे सांगण्यात येते. गाव आज दळणवळणाचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथील ऐतिहासिक तळे  देखील शिवकालीन काळातील आहे. आज गावाचा ज्या पद्धतीने विकास होत आहे तो पाहण्याजोगा आहे.
– संतोष थिटे
संस्कृतीचे जतन
पवन मावळातील अतिशय महत्त्वाचे गाव म्हणून ऊर्सेकडे पाहिले जाते. गेली पंचवीस वर्षांच्या कालावधीत गावाचा ज्या पद्धतीने विकास झाला, तो वाखाणण्याजोगा आहे. ऊर्से गावाचे ग्रामदैवत श्री पद्वावतीदेवी आहे. भव्य असे गावात मधोमध उभे असलेल्या मंदिरात तीन गाभारे असून, यामध्ये मधोमध श्री पद्मावती, जोगेश्वरी व भैरवनाथ अशा मूर्ती आहेत. तर उजवीकडे राम, लक्ष्मण, सीतामाता व डावीकडे विठ्ठल-रखुमाई या मूर्ती आहेत. मंदिरासमोर असलेले शिवकालीन तळे हे गावातील मुख्य आकर्षण असून तालुक्यात मंदिरासमोर एवढे भव्य तळे असलेले एकमेव मंदिर आहे. दरवर्षी नवरात्र व काकड आरती व यात्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला जातो.
गावातील विकास
अकरा सदस्यांची मिळून ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न कोटीच्या पुढे असल्याने आज सर्वांत मोठी असलेली ग्रामपंचायत आहे. पंचवार्षिक होणारी निवडणूक ही पक्षविरहित व विकासाच्या गोष्टींमधून होत असते. यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी व आता नव्या तरुणाने यामध्ये भाग घेतल्याने गावचा विकास व कारभार या दोन्ही वयांमध्ये समन्वय साधून केला जात आहे. विस्तार मोठा असल्याने पाणी, वीज, रस्ते, शालेय सुविधा, स्वच्छता यासाठी प्रामुख्याने लक्ष दिले जाते. गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजारांच्या आसपास आहे. पण औद्योगीकरण असल्याने दहा ते पंधरा हजार परप्रांतीय या ठिकाणी राहत आहे. नव्याने होणारी बांधकामे व निरनिराळ्या क्षेत्रात गाव विकास करीत आहे.
औद्योगीकरणामुळे गावावर झालेला प्रभाव
ऊर्से क्षेत्रात गेली पंचवीस वर्षांत मोठे औद्योगीकरण झाले आहे. त्याचा गावातील विकासात पंच्याहत्तर टक्के वाटा आहे. कंपनीच्या माध्यमातून गावातील अनेक कामे करण्यात आली आहे. अत्याधुनिक असे स्वच्छतागृह, पाणी योजनेसाठी मदत, वृक्षारोपण अशा अनेक माध्यमातून मदत केली जात आहे. आज गावातील बहुतांश तरुण कंपनीत कायमस्वरूपी कामावर आहेत. हजारो तरुण आपला उदरनिर्वाह भागवत आहे. कंपन्यांची कररूपी व गावातील भाडे रूपाने खूप मोठी आर्थिक मदत होत आहे. महिंद्रा सीआई, फिनोलेक्स केबल, जयहिंद या जागतिक दर्जाच्या कंपन्या गावात उभ्या आहेत. कंपन्यांशी संलग्न इतर छोटे व्यावसायिक आपला तग धरून आहे.
नव्याने गृहप्रकल्प
गावातील जमिनींचे भाव गेली पंधरा वर्षांत गगनाला भिडले आहेत. महामार्गाला लागून असल्याने ऊर्सेचा झपाट्याने विकास झाला असून, या शहरीकरणामध्ये स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेले नोकरदार, व्यापारी, कामगार यांनी जागा खरेदी किंवा घर खरेदीला प्राधान्य दिलेले आहे. यामुळे प्लॉटिंगच्या माध्यमातून अनेक बांधकामे गावात सुरू आहेत. पाच ते दहा लाखापर्यंत गुंठ्याचा भाव असल्याने शेतकरी नव्याने आपला विकास साध्य करताना दिसत आहे. ऊर्सेत द्रुतगती महामार्गालगत अडीचशे एकरवर एक मोठा गृहप्रकल्प उभा राहत असल्याने गाव आता शहराकडे वाटचाल करताना दिसत आहे.या गृहप्रकल्पामुळे गावातील जमिनींचा भाव गगनाला भिडल्याने अनेकांना व्यावसायिक होण्यासाठी मोठी संधी तर अनेक जनांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

शेती क्षेत्रात
गावाचा प्रवास शहरीकरणाकडे जरी होत असला, तरी गावातील शेतीही आज उभी आहे.शेतीच्या माध्यमातून अनेक शेतकरी आपली शेती या ठिकाणी करताना दिसत आहे.बागायत क्षेञात अनेकजण मोठी शेती करत आहेत.यापूर्वी गावातील दोन शेतक-यांना कृषी शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.दूध क्षेत्रातही गाव पुढे आहे.गावाचे जवळपास अकराशे हेक्टर क्षेत्र आहे.नवनवीन प्रयोग ,महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यास गाव अग्रेसर आहे.गावातील आठवडा बाजार हा पंचक्रोशीतील सर्वात मोठा आहे.यामुळे स्थानिक शेतक-यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.आठवडे बाजाराबरोबरच जनावरांचा आठवडे बाजारही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.यामुळे तालुक्यातील शेतक-यांना जनावरे खरेदीसाठी परराज्यात न जाता जवळच बाजारपेठ उपलब्ध होईल हा उद्देश आहे.
समस्यांची अंमलबजावणी महत्त्वाची
ऊर्से गावासह परिसरातील गावांचा विकास झपाट्याने होत असल्याने गावचा अजून नियोजनपूर्वक विकास होणार आहे. त्यामुळे शहरातील गर्दीपासून, थोडे लांब परंतु शहराशी संपर्कात असलेल्या ऊर्से गावात नवनवीन गृहप्रकल्प साकारत आहेत. शहरापेक्षा कमी भावात व स्वच्छ वातावरणात शहरी सोईसुविधा मिळत असल्याने त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. याबरोबर बंगलोसाठी दोन ते तीन गुंठ्यांचे प्लाँटिगही मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरीकरणाकडे होत असलेल्या या वाटचालीत विकासाबरोबर अनेक प्रश्न देखील निर्माण होणार आहेत. वाढत्या नागरिकरणामुळे बकालपणा येऊ नये, मोठ्या लोकवस्तीला पुरवण्यासाठी पाण्याचे स्रोत वाढले पाहिजेत. कचरा समस्यांचा कायमस्वरूपी उपाय शोधून त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. वाढत्या वस्त्यांसाठी रस्ते ही झाले पाहिजे. सार्वजनिक उद्यान, सार्वजनिक क्रीडांगण, सुरक्षा साधनांच्या सुविधा या नियोजनपूर्वक होणे आवश्यक आहे.
नियोजनाशिवाय वाढणारे गाव किंवा शहरात बकालपणा येतो. अवैध बांधकामे अरुंद रस्ते सोयी सुविधांचा अभाव, कचरा समस्या, पाणी समस्या निर्माण होतात. याकडे पुढील काळात लक्ष देणे आव्हान ठरणार आहे.
ऊर्से महामार्गाला लागून असल्याने गावचा झपाट्याने विकास झाला असून, स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेले नोकरदार, व्यापारी, कामगार यांनी जागा खरेदी किंवा घर खरेदीला प्राधान्य दिलेले आहे. नियोजनपूर्वक विकासामुळे ऊर्सेचा चेहरामोहरा बदलणार असून, व्यवसाय, उद्योग, रोजगाराच्या नव्या संधी युवकांना मिळणार आहेत. या सर्व बदलाकडे सकारात्मक पाहणे गरजेचे आहे. भविष्यात आपल्या भागाचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी आग्रही राहणे गरजेचे आहे, लोकप्रतिनिधींनी देखील याबाबत भविष्याचा विचार करून कोणतेही प्रकल्प रद्द होणार नाहीत, याची काळजी घेणे हे ऊर्सेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे.
‘‘गावातील विकास व एकात्मता टिकविण्यासाठी गावातील आजपर्यंत सर्व थोर व लहानांनी केलेल्या योगदानामुळे आणि सहकार्यामुळे गाव नक्कीच शहरीकरणाकडे धाव घेत आहे.’’
– भारती गावडे, सरपंच, ऊर्से
1)फोटो नं BBD22BO2164 :
2)फोटो नं BBD22BO2162:
3)फोटो नं BBD22BO213:
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares