बच्चू कडू म्हणतात, 'मी मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार' #5मोठ्याबातम्या – BBC

Written by

फोटो स्रोत, Facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे समर्थक आमदार आणि प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा होती. अखेर काल (16 सप्टेंबर) अमरावतीत बोलताना बच्चू कडूंनी याबाबत मन मोकळं केलं. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"आमच्यासाठी मंत्रिपद हा फार मोठा विषय नाही. आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. तो आमचा अधिकार आहे," असं बच्चू कडू म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही. पण मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही. तो माझ्या आटोक्याबाहेरचा विषय आहे."
यावेळी बच्चू कडूंनी मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षाही बोलून दाखवली. प्रहारचे दहा आमदार असते तर येणारा मुख्यमंत्री आमचा असता, असंही कडू म्हणाले.
"शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी मंत्री झालो नाही, तर जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी मंत्री झालो," अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत बोलताना शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी केली.
फोटो स्रोत, Twitter
यावर केसरकर म्हणाले की, "सभेतील जल्लोष आणि मतदान यात फरक असतो. हा फरक आदित्य ठाकरे यांनी समजून घेतला पाहिजे. नेता हा मंचावरुन वेगवेगळे आरोप करण्यासाठी नसतो. गद्दार, खोके म्हणण्यासाठी नसतो तर नेता हा राज्याचा विकास करण्यासाठी असतो."
"जे नेते विकास करतात ते जल्लोष करत फिरत नाही. जनतेच्या भावना भडकवून त्यांच्यावर राज्य करण्याचा एक काळ होता. मात्र, आता तो काळ उरला नाही, आता जनतेला त्यांचं हित समजतं. त्यामुळे पिढीला भडकावण्याचं काम करु नये," असंही केसरकर म्हणाले.
जनावरांमधील लंपी आजाराचा शिरकाव गुजरात, राजस्थाननंतर महाराष्ट्रातही झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झालंय. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यन्वित झाल्या आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (16 सप्टेंबर) माहिती दिली की, महाराष्ट्रात लंपीग्रस्त जनावरांसाठी विलगीकरण केंद्र निर्माण केले जातील.
फोटो स्रोत, Twitter
"लंपीच्या बाबतीत राज्य शासन अतिशय गंभीर आहे. आमचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची टीम यावर काम करत आहे. सर्व अधिकारी, डॉक्टर, पशुपालन विभागाला सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि लस देखील मोठ्याप्रमाणवर उपलब्ध केलेली आहे. डॉक्टर देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध केले आहेत. कुठेही लशीचा तुटवडा नाही," अशीही माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
दिल्लीच्या अँटी-करप्शन ब्युरोने काल (17 सप्टेंबर) आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. याआधी एसीबीने त्यांच्या घरावर आणि त्याच्या इतर 5 ठिकाणी छापे टाकले. छापेमारीत 12 लाख रुपये आणि एक विना परवाना पिस्तुल जप्त केलं. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणात एसीबीने छापे टाकले आहेत. दिल्ली वक्फ बोर्ड भरतीतील कथित अनियमिततेची चौकशी करत आहे.
काल खान यांच्या घर आणि त्याच्या इतर ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. या छापेमारीत एका ठिकाणाहून 12 लाख रुपये रोख, एक विना परवाना शस्त्र आणि काही काडतुसे जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वक्फ बोर्डाच्या मालमत्तांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठानं प्रसिद्ध यूट्यूबर सवुक्कू शंकर याला 6 महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
शंकर राजकीय विश्लेषण करणारं 'रेड पिक्स' नवाचं यूट्यूब चॅनल चालवतो. या चॅनेलवरील एका व्हीडिओमधून त्यानं न्यायव्यवस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
यानंतर कोर्टानं स्वत: दखल घेत सवुक्कू शंकरला शिक्षा सुनावली.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares