शेतकरी वडिलांचे कर्जाचे हप्ते चुकले, एजंटने गरोदर मुलीला गाडीखाली चिरडलं – BBC

Written by

फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
मोनिका नातेवाईकांसह
22वर्षीय मोनिका दोन महिन्यांची गरोदर होती. पहिल्यावहिल्या बाळंतपणाची ती तयारी करत होती. पण गुरुवारी 15 सप्टेंबरला महेंद्रा फायनान्सच्या रिकव्हरी एजंटने तिच्या अंगावर गाडी घातली. वडिलांनी कर्जावर विकत घेतलेला ट्रॅक्टर घेऊन जायला ती विरोध करत होती म्हणून तिच्या अंगावर गाडी घालण्यात आली.
झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यात इचाक भागातल्या सिझुआ गावातली ही धक्कादायक घटना आहे.
मोनिकाचे वडील मिथिलेश कुमार यांनी सांगितलं की 2018 मध्ये त्यांनी महेंद्र फायनान्सकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला. 44 हफ्ते भरले होते. मिथिलेश म्हणाले उरलेले 6 हप्ते म्हणजे साधारण 1.20 लाख द्यायला गेलो होतो. कंपनीने हे पैसे घ्यायला नकार दिला.
झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यात सिझुआ गावातलं प्रकरण.
दोन महिन्यांच्या गरोदर मोनिकाच्या अंगावर गाडी घातल्याचा कुटुंबाचा आरोप.
मोनिकाच्या वडिलांनी महिंद्रा फायनान्सकडून कर्ज घेतलं होतं.
कंपनीचे 1.20 लाख रुपये देणं बाकी होतं.
रिकव्हरी एजंट कर्जाचे हप्ते भरण्याच्या तारखेआधी त्यांच्या घरी पोहोचले आणि ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागले.
मोनिकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मोनिकाच्या अंगावर गाडी घातली आणि ते पळून गेले.
रिकव्हरी एजंटसह तीन अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीने याप्रकरणी वक्तव्य जारी करून दु:ख व्यक्त केलं आहे.
कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनीही पीडितेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
पण कुटुंबांचं असं म्हणणं आहे की त्यांना आतापर्यंत कोणीही संपर्क केलेला नाही.
मिथिलेश कुमार मेहता यांनी सांगितलं, "कंपनीच्या लोकांचं म्हणणं होतं की 1.30 लाख देणं बाकी आहे. 10,000 रुपये कमी असल्या कारणाने त्यांनी सांगितलेली रक्कम भरू शकलो नाही. यामुळे रिकव्हरी एजंट 15 सप्टेंबरला त्यांच्या घरी आले आणि ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागले."
मिथिलेश आणि त्यांची मुलगी मोनिका यांनी एजंटला विरोध केला. वादावादी झाली आणि एजंटने मोनिकाच्या अंगावर गाडी घातली. मिथिलेश यांच्या बोलण्यानुसार रस्त्यावर पडलेल्या मोनिकाच्या अंगावर मागून पुन्हा एकदा गाडी घातली. त्यानंतर ते पळून गेले.
फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
महिंद्रा फायनान्सचं हजारीबाग इथलं कार्यालय
दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा
भाग
End of पॉडकास्ट
याप्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी एसआय धनंजय सिंह यांनी पीडितेच्या नातेवाईकांना सांगितलं की, 16 सप्टेंबरला यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकालाही अटक करण्यात आलेली नाही.
हे सगळं झाल्यावर मोनिकाच्या सासरी डुमरौन इथे आणि माहेरी म्हणजे सिझुआ येथे भेटायला येणाऱ्या लोकांची रीघ लागली आहे. 17 सप्टेंबरला आम्ही मोनिकाच्या माहेरी सिझुआ गावी पोहोचलो तेव्हा माध्यमकर्मींव्यतिरिक्त अनेक माणसं होती. त्यांची आई रेखादेवी मोठ्याने रडत होत्या. काही वेळानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी येतच राहिलं पण त्यांच्या घशातून आवाज येणं बंद झालं.
मुलगी मनीषा कुमारीला आई सावरत होती. तिला आवरता आवरता त्या स्वत: रडू लागल्या. जवळच मनीषाच्या दोन मावश्या बसल्या होत्या. कधी त्या स्वत:चे अश्रू पुसत होत्या तर कधी बहिणीच्या डोळ्यातले.
मोनिकाचे बाबा मिथिलेश यांनी सांगितलं की, "2018 मध्ये त्यांनी जुना ट्रॅक्टर देऊन नवा ट्रॅक्टर खरेदी केला. पूर्ण पैसे नसल्याने महिंद्रा फायनान्सकडून कर्ज घेतलं. 44 हप्ते मिळून दरमहिना 14,300 देण्याचं कबूल केलं होतं. जवळजवळ सगळे हप्ते भरत आलो. लॉकडाऊन काळात काही हप्ते वेळेवर भरू शकलो नाही. यामुळेच 44 ऐवजी 50 हप्त्यांमध्ये कर्ज चुकवायचं ठरलं".
फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
मोनिका यांचे सासरकडची मंडळी
कंपनीचे लोक सातत्याने त्रास द्यायचे. कंपनीच्या लोकांशी बोलणं झालं होतं. 1.20 लाखात सेटलमेंट झाल्याचा दावा त्यांनी केला.
ही रक्कम घेऊन 18 जुलैला महिंद्रा फायनान्सच्या हजारीबाग इथल्या कार्यालयात गेले होते. पण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की 1.20 नव्हे तर 1.30 लाख रुपये भरावे लागतील.
मिथिलेश सांगतात, "1.20 लाख भरण्यावर संमती झाली होती असं मी विचारलं. मग आता आणखी 10,000 का मागत आहात असं विचारलं. पण तिथल्या लोकांनी याचं काहीही उत्तर दिलं नाही.
दहा हजार रुपये माझ्याकडे तेव्हा नव्हते त्यामुळे मी जे पैसे घेऊन गेलेलो ते घेऊन घरी आलो. 10000 रुपये जमा करू शकलो नाही. शेतीच्या कामांसाठी साठवलेल्या पैशातले काही खर्च झाले होते".
याकारणासाठी कंपनीकडून फोन आले. ते घरीही येऊ लागले. 14 सप्टेंबरला रोशन सिंह नावाचा एजंट मिथिलेश यांच्या घरी आला. 22 सप्टेंबरला पैसे जमा केले जातील असं ठरलं. पण रोशन ठरलेल्या तारखेच्या आधी 15 सप्टेंबरला पुन्हा मिथिलेश यांच्या घरी पोहोचला.
5 एकर शेतजमिनीचे मालक मिथिलेश पुढे सांगतात, "रोशन सिंह आणि त्यांची माणसं ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागले. मी शेतात काम करत होतो. मोनिका घरी होती. तिने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी ऐकलं नाही आणि ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागले.
मोनिका माझ्याकडे आली. ट्रॅक्टर घेऊन जात असल्याचं तिने मला सांगितलं. मी मोनिकाला बाईकवर बसवलं. आम्ही एजंटच्या मागे जाऊ लागलो.
रस्त्यात ते भेटले, आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण ते ओरडू लागले. गाडीत बसलेले लोक म्हणाले, रस्त्यातून बाजूला व्हा नाहीतर गाडी अंगावर चढवू.
मोनिका त्यांचा रस्ता अडवून उभी होती. त्या लोकांनी तिच्या अंगावर गाडी घातली. मी तातडीने मोनिकाला घेऊन हॉस्पिटल गाठलं. तिथल्या डॉक्टरांनी मोनिकाला रांचीतल्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथे भरती होण्यास सांगितलं. आम्ही तिथे पोहोचलो पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं."
फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
मोनिका यांची आई
मोनिकाची आई रेखादेवी यांनी सांगितलं की, "मुलीला मारून टाकलं. ती आमची मोठी मुलगी होती. आम्ही मोठ्या हौसेने तिचं लग्न करून दिलं होतं. लग्नाआधी तीच सगळं सांभाळत होती".
चार भावंडांमध्ये मोनिका सगळ्यांत मोठी. दोन छोटे भाऊ- हिमांशु आणि सुधांशु. मनीषा ही छोटी बहीण.
मोनिका गरोदर होती याचा उल्लेख करताना त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. "आम्ही नात किंवा नातूची वाट पाहत होतो. पण विमा कंपन्यांनी माझ्या मुलीचा जीव घेतला. आम्हाला न्याय हवा आहे", असं त्या म्हणाल्या.
'दोषींना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'
24 मे 2021 रोजी मोनिकाचं लग्न झालं होतं. तिचे पती कुलदीप कुमार ट्रक चालवतात. त्यांनाही बोलणं कठीण झालं. त्यांनी सांगितलं, "हे सगळं घडलं त्यादिवशीही व्हीडिओ कॉलवर बोलणं झालं होतं. कधीपर्यंत माहेरी राहशील असं मी विचारलं होतं. लवकरच घरी येईन असं तिने सांगितलं होतं".
फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
कुलदीप, मोनिका यांचे पती
थोडा वेळ गप्प राहिल्यावर कुलदीप म्हणाले, "आमच्या बाळाबद्दल आम्ही रोज बोलायचो. त्याला रांचीत शिकायला पाठवू असंही आम्ही ठरवलं होतं. त्याला डॉक्टर किंवा इंजिनियर करू."
मोनिकाची सासू गिरिजादेवी यांच्या डोळ्यातले अश्रूही थांबत नाहीत. सासरे झूमन प्रसाद मेहता यांनी सुनेच्या पार्थिवाला अग्नी दिला. झुमन मुलाला आधाराने पकडून रडत होते. ते कधी बायकोला सावरत होते तर कधी मुलगी निर्मला कुमारीला.
फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
मोनिकाच्या सासू गिरिजा देवी
निर्मला स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. तिने सांगितलं, "वहिनी अशा अवस्थेत घरी येईल असं आम्हाला वाटलंच नाही. ती एकटीने सगळं घर सांभाळायची. मी आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या लोकांवर खटला भरेन. त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही."
प्रकरणाचा तपास करणारे आयओ यांच्या मते आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे. पोलीस लवकरच सगळ्या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करेल.
महिंद्रा राईज कंपनीचे एमडी आणि सीईओ डॉ. अनीश शाह यांनी परिपत्रक जारी केलं आहे. ते म्हणतात, "हजारीबाग इथल्या घटनेने आम्ही सगळेच व्यथित आहोत. या घटनेच्या सगळ्या पैलूंचा आम्ही तपास करू. थर्ड पार्टी कलेक्शन एजन्सीच्या वापरासंदर्भात पुनर्विचार करू. तपासयंत्रणांना संपूर्ण सहकार्य करू. या दु:खाच्या क्षणी आम्ही मोनिकाच्या कुटुंबीयांच्या बरोबर आहोत."
मिथिलेश कुमार यांच्या मते कंपनीतर्फे अद्याप कोणीही संपर्क केलेला नाही, भेटायला आलेलं नाही.
महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनीही घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. हजारीबाग इथल्या कंपनीच्या कार्यालयाला टाळं लागलं आहे.
या सगळ्यावर झारखंड न्यायालयातील वकील सोनल तिवारी यांनी सांगितलं, "यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वं आहेत. कर्जाचे हप्ते भरावेत यासाठी शारीरिक दांडगटपणा करणारे रिकव्हरी एजंट पाठवू शकत नाहीत. कर्जाच्या बदल्यात तुम्ही व्यक्तीचं वाहन ताब्यात घेणार असाल तर त्याला आधी नोटीस देणं अनिवार्य आहे".
कृषीतज्ज्ञ देविंदर शर्मा सांगतात, "सरकारने संसदेत सांगितलं आहे की देशभरात 10,000 विलफुल डिफॉल्टर आहेत. ते पैसा देऊ शकतात. पण यापैकी किती लोकांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं आहे? किंवा त्यांच्याकडून पैसा वसूल करण्यात आला आहे?
एखाद्या कॉर्पोरेटने कर्जाचे हप्ते भरले नाही आणि त्याच्या घरी रिकव्हरी एजंट पाठवले असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? सरकारने गेल्या पाच वर्षांत कॉर्पोरेट्सचं 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. शेतकऱ्यांशी असं वागणं का? भेदभावकारी वागण्यामुळे शेती उद्योग संकटात आहे."
कर्जाच्या रिकव्हरीसाठी बळाचा वापर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण मोनिका प्रकरणानंतर शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज आणि त्याबदल्यात होणारं शोषण यासंदर्भात आणखी एक नाव जोडलं गेलं आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares