हे 4 उपाय अवकाळी पावसामुळे होणारं पिक नुकसान टाळू शकतात – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्रात 8 आणि 9 मार्च रोजी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिलीय की, "देशाच्या मध्यवर्ती भागात पूर्वेकडील वाऱ्याच्या संगम व trough in easterlies मुळे 7 ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 व 9 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे."
आता असा अवकाळी पाऊस महाराष्ट्रासाठी नवीन नाही. मुंबई, मराठवाडा आणि विदर्भासाठी अवेळी पाऊस नित्याचाच झालाय, अशी म्हणण्याची वेळ आलीये. काही जण तर याला पावसाचं 'न्यू नॉर्मल' असंही म्हणत आहेत.
पण, हे असं असलं तरी अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. सध्या रब्बी हंगामातली गहू, हरभरा अशी पीकं शेतात उभी आहेत. त्यामुळे पाऊस आल्यास शेतकऱ्यांचं नुकसान व्हायची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी काय करू शकतात, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.
आता अचानक कधीही पाऊस पडणार असं गृहित धरून शेतकरी कशाप्रकारे पिकांचं नियोजन करू शकतात? तसंच हवामान विभागाच्या अंदाजानंतर शेतकरी लगेच कोणत्या गोष्टी करू शकतात? या प्रश्नांची उत्तरं आम्ही काही तज्ज्ञांकडून जाणून घेतली.
मराठवाड्यात प्रामुख्यानं रब्बी हंगामामध्ये हरभरा गहू, ज्वारी, बाजरी तसंच काही शेतकरी तेलवर्गीय पिकांमध्ये करडई, सूर्यफूल, भुईमूग अशी पिकं घेतात. तर काही भाजीपाला, कांदे, फळपिकांमध्ये मोसंबी, डाळिंब यांची लागवड करताना दिसतात.
फोटो स्रोत, AFP
औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक सूर्यकांत पवार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले,
"गेल्या पाच-दहा वर्षांपासून हवामान बदलामुळे कधी कमी तापमान तर कधी जास्त तापमान असतं. काहीवेळा गारपीट, मुसळधार पाऊस यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. आत्ताच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन-तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.
"पारंपारिक पिक यावेळेस नुकसान सहन करत नाही, मात्र दूरदृष्टीने शेती केल्यास नक्कीच अशा अचानक आलेल्या संकटावर शेतकरी मात करू शकतो. जसं की जी कंदवर्गीय पिकं आहेत बटाटे, बीट, गाजर हे पिकं घेतल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. काही शेतकरी मल्चिंग करतात. शेडनेट, पॉलिहाऊस उभारतात. यामुळे गारपीट तसंच अतिवृष्टी आणि त्यांचा परिणाम जवळपास एक महिन्यापर्यंत संभाव्य नुकसान टाळू शकतो".
हवामान बदलाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आता त्याअनुषंगानं पिकांची लागवड करावी, असं कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.
सूर्यकांत पवार सांगतात,"औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री तसंच जालना जिल्ह्यात तुतीचे क्षेत्र वाढत आहेत. रेशीम शेती, बांबू, तीळ, कऱ्हाळा, ओवा, जवस हेसुद्धा बदलत्या हवामानास एक पर्याय आहे.
"पारंपारिक पिकांशिवाय बदलत्या हवामानास जे पिक बळी पडत नाही त्या पिकांचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे."
सध्या रब्बी हंगाम सुरू असून काही ठिकाणची पिकं सध्या काढणीला आली आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी काय करू शकतात, असा प्रश्न आम्ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांना विचारला.
ते म्हणाले, "वेळेवर पेरणी केलेल्या आणि काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास फवारणी करावी. लवकर पेरणी केलेल्या आणि काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामं लवकर उरकावी. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी".
"कंद काढणीपूर्वी संपूर्ण पानं जमिनीलगत कापून घ्यावी. गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांची हार्वेस्टिंग झाली असल्यास ते उघड्यावर ठेवू नये, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. फळवर्गीय पिकांमध्ये केळी पिकांना काठीचा आधार द्यावा जेणेकरून झाडं मोडणार नाहीत. आंब्यांना सध्या मोहोर लागलेला आहे. जर फळगळ होत असेल तर गिब्बरलिक ॲसिडची फवारणी करावी जेणेकरून मोहोर सुरक्षित राहील."
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. सुभाष टाले यांच्या मते, "रब्बी हंगामातील जी पिकॆ काढणीला आलेली नाहीत. त्यामुळे पावसामुळे त्यांचं जास्त नुकसान होणार नाही. अशास्थितीत शेतकऱ्यांनी पिकांना उभं ठेवण्याला प्राधान्य द्यावं.
"शेडनेट धारकांनी शेडचे कापड व्यवस्थित ढवळून घ्यावं. शेडच्या बाजूला असलेल्या नाल्या व्यवस्थित उकरून घ्याव्यात. जेणेकरून जोरात पाऊस आलाच, तर त्याचा तडाखा शेडला जास्त बसणार नाही आणि पाण्याचा बाहेरच्या बाहेर व्यवस्थित निचरा होऊन जाईल."
मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याचं प्रमाण वाढल्याचं गेल्या काही वर्षापांसून आपण पाहत आहोत.
पण, यामागचे कारण काय, हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
हवामान तज्ज्ञ प्राध्यापक किरणकुमार जोहरे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं,
"मान्सूनच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बाष्पीभवनाच्या स्तरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन वातावरणामध्ये भोवरे तयार होतात आणि त्या भोवऱ्यामध्ये बाष्प अडकतात. वेगवेगळ्या ठिकाणचं कमी जास्त तापमान आणि वायूदाब यामुळे वारे वाहू लागतात.
"बाष्पीभवन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे ऊर्ध्व दिशेने, पाणी धारण करणारा, तसंच पाणी धारण करणारा पण मसाला डोसा सारखा पसरट अशा पद्धतीचे ढग तयार होऊन पाऊस पडतो.
"महाराष्ट्रात आपण साधारणतः 7 जून ते 30 सप्टेंबर असे चार महिने ऑफिशियली पावसाळा धरायचो. पण मान्सून पॅटर्न बदलामुळे चक्रीवादळ, गारपीट, ढगफुटी यांच्याही अनियमित बदलामुळे मराठवाडा हा ढगफुटीचा प्रदेश बनला की काय, अशी शंका येते."
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares