देवगडमध्ये वीजबिल समस्यांचा सूर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
64465
जामसंडे ः येथे महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
देवगडमध्ये वीजबिल समस्यांचा सूर
ग्राहक मेळाव्यात अनेक तक्रारी; अधिकाऱ्यांकडून सकारात्मक मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ ः ग्राहकांना वीज बिले वेळेवर येत नाहीत, रखडलेली बिले भरण्याबाबत आगावू सूचना न देता वीज जोडणी तोडली जाते, लेखी मागणी करूनही कार्यालयाकडून अपेक्षित हालचाली न होणे आदी तक्रारी आज जामसंडे येथे झालेल्या महावितरणच्या वीज ग्राहक मेळाव्यात मांडण्यात आल्या. बिलांच्या समस्यांच्या तक्रारीचा सूर अधिक होता.
महावितरणच्या येथील कार्यालयातर्फे आणि जिल्हा व्यापारी महासंघ तसेच देवगड तालुका व्यापारी संघाच्या सहकार्याने जामसंडे येथे वीज ग्राहक मेळावा आयोजित केला होता. तालुक्यातील शेतकरी, व्यावसायिक, औद्योगिक आणि घरगुती ग्राहकांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता (कणकवली) बाळासाहेब मोहिते, वरिष्ठ व्यवस्थापक (रत्नागिरी परिमंडळ) अप्पासाहेब पाटील, नितीन तायशेट्ये (मालवण), येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नाझिम शेख, ग्राहक पंचायत देवगड अध्यक्ष लक्ष्मण पाताडे, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, मधुकर नलावडे आदी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले. ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत त्यांनी माहिती दिली. वीज बिले ग्राहकांना वेळेत मिळत नसल्याने बिल भरणा करण्यासाठी कमी अवधी मिळतो. पर्यायाने बिल भरण्यास विलंब होऊन वीज जोडणी तोडण्याची नामुष्की ग्राहकांवर ओढवते याकडे ग्राहकांनी लक्ष वेधले. चिरेखाण व्यावसायासाठी वीज जोडण्या घेतलेल्या असताना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याची तक्रार मांडण्यात आली; मात्र, बिले भरण्यास विलंब झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा बिल भरण्यास अवधी न देता तातडीने जोडणी तोडण्यासाठी धाव घेतली जाते असे संयुक्तिक नाही. याबाबत वरिष्ठांनी संबधितांना सूचना देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कोरोना कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिली होती. मात्र, त्यावेळी ग्राहकांना बिल भरण्यास वेळेची सवलत दिली होती, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
……………………………….
चौकट
अधिकारी, जनमित्र कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
येथील महावितरणचे अधिकारी तसेच जनमित्र कर्मचाऱ्यांचे तालुका व्यापारी संघाच्यावतीने गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांना आगामी काळात कामामध्ये बळ येण्यास मदत होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares