मेळावा: जाफराबाद तालुक्यातील उसाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी कटिबद्ध – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
तालुक्यात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणत होत असून तालुक्याला लागून असलेले स्थानिक कारखाने मात्र शेतकऱ्यांचा ऊस घेवून जात नसल्याने मोठा प्रश्न निर्माण होत आहे. बारामती साखर कारखाना सुमारे ११० ते १३० किमी अंतराहुन जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस घेवून जातो मात्र स्थानिक कारखाना हा फक्त २० किमी अंतराहुन देखील ऊस घेवून जात नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी कटिबध्द असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
जाफराबाद येथे आयोजित ऊस उत्पादक शेतकरी व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, पक्ष निरीक्षक संजय वाकचौरे, सुभाष गुळवे, पंकज बोराडे, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सुरेखा लहाने, युवा नेते सुधाकर दानवे, तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, रमेश सपकाळ, एकनाथ शेवत्रे, संतोष माने, अंकुश जाधव, पठाण आदींची उपस्थिती होती. स्थानिक कारखाना आणि बारामती, कन्नड कारखान्याच्या भावात तब्बल पाचशे रुपयांहुन अधिकचा भाव आहे. या तालुक्यातील गरीब शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा ऊस प्राधान्याने घेतला जाईल व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू. शिंदे फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी आहे, महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहे, जाती जातीत तेढ निर्माण करून सतत महापुरुषांची बदनामी करणारे हे सरकार आहे.
शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती हे सरकार करत आहे, ओला दुष्काळ जाहीर करण्याच्याही फक्त घोषणा असून अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे हे सरकार फक्त बदल्याची भावना मनात ठेवून निर्माण झाले असल्याचेही रोहित पवार म्हणाले. गरीब शेतकरी, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता व कारखाना अडचणीत असतांना मदत करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी शहराध्यक्ष साबेद चाऊस, शेख मुजीब, अॅड. विष्णू शिंदे, विनोद खेडेकर, गणेश बापु चव्हाण, बाबासाहेब जाधव, फईमखा पठाण, शेख सऊद, शेख तालेब, शेख मुश्ताक, दत्तू अंभोरे, संतोष अंभोरे, भगवान गीरणारे, प्रभाकर गायकवाड, प्रभाकर चव्हाण, विजय मिरकर, शिवाजी शेवत्रे, उमेश कडाळे यांच्यासह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊसउत्पादक शेतकरी, कार्यकर्त्यांच्या मांडल्या समस्या
यावेळी एकनाथ शेवत्रे, रामधन कळंबे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या मांडल्या. त्याचबरोबर तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी तालुक्यातील टेंभुर्णी येथील नऊशे घरांच्या अतिक्रमणाबाबत प्रश्न मांडला असता त्यावर मुख्यमंत्र्याची भेट घेवुन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. रोहित पवार यांच्या कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील ऊसाचा प्रश्न मिटवु त्याचबरोबर तालुक्यातील जास्तीत जास्त ऊस कसा घेवून जाता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares