शेती: महाराष्ट्रातले हे शेतकरी विनामशागतीची शेती का करत आहेत? – BBC

Written by

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
शेतकरी गणेश गव्हाणे
"जुन्या लोकांची म्हण आहे, तण देई धन. तणाचे मूळ कुजून ते आपल्या जमिनीत रुजवल्या गेले, तिथंच ते सडले, तर सेंद्रिय कर्ब तयार होतो आणि तो आपल्या पिकास उपयुक्त ठरतो."
38 वर्षीय शेतकरी गणेश गव्हाणे सांगत होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात बोदवड या गावात ते राहतात.
गणेश 2019 पासून एसआरटी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक (एसआरटी) वापरून शेती करत आहे.
यालाच विनामशागतीची शेती, शून्य मशागतीची शेती किंवा विनानांगरणीची शेती असंही म्हणतात.
विनामशागतीची शेती हे शेती करण्याचं असं तंत्र आहे, ज्यात शून्य मशागत असते. म्हणजे नांगरणी, निंदणी, वखरणी, कोळपणी असं काहीही करावं लागत नाही.
याउलट पारंपरिक शेती पद्धतीत जमिनीची नांगरणी किंवा पूर्वमशागतीची कामे केली जातात.
गणेश यांनी 2019 साली एसआरटी तंत्र वापरून शेती करायचं ठरवलं. त्यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या शेतीशाळेमुळे त्यांना या तंत्राची माहिती मिळाली आणि त्यांनी दोन एकरच्या प्लॉटवर याप्रकारच्या शेतीसाठीचा प्रयोग सुरू केला.
आम्ही त्यांच्या शेतात पोहचलो तेव्हा त्यांनी प्रयोगाविषयी सांगताना म्हटलं, "2019 मध्ये एक एकरवर एसआरटी आणि एक एकरवर नॉन एसआरटी पद्धतीनं कपाशीचं लागवड केली. उत्पादन खर्चापासून ते माल विकण्यापर्यंत तंतोतंत हिशोब ठेवला. एसआरटीमध्ये मला 75 हजार रुपये बेनिफिट मिळाला आणि नॉन एसआरटीमध्ये खर्च होऊन त्यात फक्त 2900 रुपये नफा मिळाला. एसआरटीमध्ये कापूस एकरी 13 क्विंटल निघाला आणि नॉन एसआरटीमध्ये 7 क्विंटल निघाला."
विनामशागतीच्या शेतीतून उत्पन्न वाढतंय असं दिसल्यावर गणेश यांनी यंदा 9 एकर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीनं कपाशी आणि मका या पिकांची लागवड केलीय. आम्ही त्यांच्या शेतात फिरत असताना कपाशीच्या शेतात तण वाढलेलं दिसून आलं. याशिवाय जमीनही भूसभुशीत दिसून आली. याचं श्रेय गणेश एसआरटी तंत्राला देत होते.
विनामशागतीची शेती सामान्यपणे तीन तत्त्वांवर केली जाते. सगळ्यात पहिले पिकांची लागवड करण्यासाठी बेड पाडावे लागतात म्हणजे गादी वाफे तयार करावे लागतात.
गणेश सांगतात, "सुरुवातीला ट्रॅक्टरचं लेझर वापरून बेड पाडून घ्यायचे. चार बाय दीड फुटाचं बेड पाडायचं आहे. त्या बेडवर टोकन पद्धतीनं कपाशी लागवड करायची आहे. कपाशी, सोयाबीन, मका या पीकांची टोकन पद्धतीनं लागवड करायची आहे."
विनामशागतीची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला भेटलात का?
बेड पाडून कपाशीची लागवड केल्यामुळे त्याचे इतरही फायदे होत असल्याचं गणेश सांगतात.
"पाऊस कमी झाला तर तो बेडमध्ये थांबवून ठेवला जातो आणि जास्त झाला तर चरावाटी बाहेर निघून जातो. पावसाचा खंड पडला तर पाणी साचून राहिलेलं असतं. ते पिकाला 15 ते 20 दिवस तग धरून ठेवतं."
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
शेतात वाढलेलं तण दाखवताना गणेश गव्हाणे.
पण, मग शेतात तण वाढल्यास करायचं काय असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर तणांचं योग्य व्यवस्थापन हे दुसरं तत्त्व.
शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी तणनाशकांचा वापर करावा लागतो. कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या तणनाशकांचा उपयोग करून तणांचा बिमोड करता येतो.
गणेश सांगतात, "विनामशागतीची शेती करताना तणाकडे लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणात तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं असतं. पाच ते सहा पानावर तण असलं आणि त्यावेळी तणनाशक मारलं तर ते कमी प्रमाणात लागतं."
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
विनामशागतीच्या शेतीत जशी लागवडीची एक विशेष पद्धत आहे, तशीच पीकाच्या काढणीचीसुद्धा आहे. इथं पीकं कापून काढायची आहेत, ना ही पूर्णपणे उपटून काढायची आहे. एसआरटी पद्धतीचं हे तिसरं तत्त्व आहे.
याविषयी शेतातल्या कपाशीचं झाड हातात धरून गणेश सांगतात, "यंदा माझा कापूस निघल्यावर मी ही कपाशी मूळापासून उपटणार नाही तर ती मूळापासून चार बोट अंतरावर कट करणार आहे. तिथून कट केल्यानंतर जो वरचा भाग आहे तो शेताच्या बाहेर नेऊन टाकणार. आणि याची मूळं जी आहे ती इथंच या जमिनीत कुजवणार."
पण हे असं का? यावर गणेश सांगतात, "कपाशी, सोयाबीन यांची मूळं तिथंच कुजली पाहिजेत. मुळं तिथं कुजले म्हणजे आपल्या जमिनीतला कर्ब वाढतो. होणारं बाष्पीभवन ते थांबवून ठेवतं. सेंद्रिय खत, कर्ब जमिनीत तयार होतो. मुळाच्या शोषणाद्वारे हवा जमिनीत जाते आणि बेड भूसभुशीत राहतो."
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
गेल्या वर्षीचे कपाशीची मूळं तशीच ठेवून गणेश यांनी यंदा शेतात मक्याची लागवड केलीय.
गणेश यांनी गेल्यावर्षी ज्या शेतात एसआरटी तंत्र वापरून कपाशीची लागवड केली होती, त्याच दोन एकरच्या क्षेत्रावर त्यांनी यंदा मक्याची लागवड केली आहे.
ते सांगतात, "मागच्या वर्षीच्या कपाशीच्या खुंट्यासुद्धा आजवर जमिनीत तशाच आहेत. पूर्ण दोन एकर क्षेत्रात खुणट्या जशाच्या तशा आहेत. यंदा मका पिकाची जी लागवड केलीय, तर बेडवरची मका बघा तुम्ही किती भरगच्च कणीस, शेंड्यापर्यंत कणीस भरलेलं आहे."
2019 मध्ये गणेश यांनी विनामशागतीचं तंत्र वापरून शेतीस सुरुवात केली तेव्हा त्यांच्या या प्रयोगावर अनेकांना हसू आलं. पण, आज गणेश यांची बदललेली परिस्थिती पाहून त्यांच्या गावातच जवळपास 125 एकरवर विनामशागतीचं तंत्र वापरून शेती केली जातेय.
याच गावातील रामेश्वर गव्हाणे यांनी यंदा पहिल्यांदाच 7 एकर क्षेत्रावर कपाशी आणि मका पीकाची लागवड एसआरटी तंत्र वापरून केली आहे.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
शेतकरी रामेश्वर गव्हाणे
ते सांगतात, "एसआरटी तंत्र वापरून शेती केल्याचा फायदा होतो, हे आम्ही गणेश गव्हाणे यांच्या शेतात पाहिलं. त्यामुळे मी यंदा 7 एकरावर एसआरटी पद्धतीनं लागवड केली आहे."
या पद्धतीचा फायदा काय जाणवला असं विचारल्यावर रामेश्वर सांगतात, "एकदाच बेड काढावे लागतात. एकदाच सारं काही करायचं आहे. नांगरणीचा खर्च वाचतो. यंदा कपाशीच्या झाडाला आलेल्या बोंडांची संख्याही जास्त आहे."
विनामशागतीच्या शेतीचे प्रमुख 4 फायदे असल्याचं शेतकरी आणि तज्ञांच्या बोलण्यातून समोर येतं.
कमी उत्पादन खर्च हा आहे पहिला फायदा.
गणेश गव्हाणे सांगतात, "पारंपरिक पद्धतीनं शेती करायची म्हटलं तर मशागतीसाठी निंदणी, कोळपणी, नांगरणी करावी लागते. याचा एकरी खर्च 8 ते 9 हजार रुपये आहे. याउलट एसआरटीमध्ये एकदाच बेड पाडायचे आहेत. त्यामुळे मशागतीचा खर्च वाचतो. परिणामी उत्पादन खर्च कमी लागतो."
मराठवाड्यासारख्या भागात आज मोठ्या प्रमाणावर मजुरांची टंचाई जाणवत आहे. पण, एसआरटी तंत्रामुळे मजुरांवरचं अवलंबित्व कमी होत असल्याचा दुसरा फायदा शेतकरी सांगतात.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
गणेश गव्हाणे यांच्या शेतातील कपाशी.
गणेश यांच्या मते, "आधी माझ्याकडे 2 माणसं कंटिन्यू कामाला होते. पण ज्या दिवसापासून मी एसआरटी पद्धतीनं शेती करतोय तर माझ्याकडे एक माणूसुद्धा नाहीये. एसआरटीमध्ये मशागत करावी लागत नाही, त्यामुळे मजुरावर अवलंबून राहायचं काम नाही."
उत्पादनात वाढ हा तिसरा फायदा. पण, विनामशागतीच्या शेतीतून उत्पन्न का वाढतं?
महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच 'पोकरा'नं विनामशागतीच्या शेतीचं तंत्र राज्यभर राबवण्याचं धोरण स्वीकारलंय.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
पोकराचे कृषीविद्यावेत्ता विजय कोळेकर सांगतात, "सेंद्रिय कर्ब वाढला तर त्याठिकाणी सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. मग साहजिकच आहे की हे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये असणारे अन्नपोषण पिकाला उपलब्ध करून देतात. हे उत्पादन वाढण्याचं पहिलं कारण आहे.
"दुसरं कारण, या पद्धतीमध्ये जमिनीची वरची बाजू सच्छिद्र बनते. मातीच्या कणाची रचना सुधारते आणि यामुळे पाणी झिरपण्याचं प्रमाण वाढतं, पाणी मुरण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे जेवढा काही पाऊस पडतो, त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकतो. मुळाभोवती ओलावा वाढल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते आहे.
"अन्नपोषण आणि ओलावा वाढला, की पिकांची वाढ चांगली होते. यामुळे पिकांमध्ये काटकपणा येतो. सेंद्रिय पदार्थ वाढल्यामुळे पीके काटक बनतात आणि काटक पिकांवरील रोग आणि किडीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे नुकसान कमी होतं. हे उत्पादन वाढीचं तिसरं कारण आहे."
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
भुसभूशीत झालेली जमीन.
विनामशागतीच्या शेतीमुळे जमिनीची धूप कमी होते, हा या शेतीचा चौथा फायदा.
"दरवर्षी पाऊस पडल्यानंतर काही हजारो टन माती वाहून जाते. त्यामुळे जमिनीचा कस बिघडतो. पोत कमी होतो. सुपीकता कमी होते. एसआरटीमुळे जमिनीची धूप थांबते. आमच्या गेल्या 3 वर्षांतील अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, विनामशागतीच्या शेतीमुळे जमिनीतील माती वाहून जाण्याचं प्रमाण जवळजवळ 80% थांबलं आहे," विजय कोळेकर सांगतात.
नांगरणीविना शेती होऊ शकते, हा विचार आपल्याकडे सर्वप्रथम शेती तज्ज्ञ प्रताप चिपळूणकर यांनी नव्वदच्या दशकात मांडला. त्यावर त्यांनी यावर मोठ्या प्रमाणावर लिखाण केलं. त्यानंतर कोकणातील कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी भात शेतीत विनानांगरणीच्या शेतीचं तंत्र अंमलात आणलं.
यासाठी त्यांनी रागयड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सगुणा बागेत काही वर्षांपूर्वी चिखलणीशिवाय (मशागतीशिवाय) भातशेती करता येईल का, यावर प्रयोग सुरू केले.
त्यावेळी चिखलणी न करता गादीवाफे करून त्यावर भाताचे टोकन करू शकतो आणि टोकन केलेल्या भाताचं पीक चांगलं येतं, असं त्यांच्या लक्षात आलं.
फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
चंद्रशेखर भडसावळे यांच्या शेतात एसआरटी पद्धतीनं भात लागवड केली जाते.
2014-15 च्या दरम्यान, या प्रयोगाबद्दल चांगले निष्कर्ष मिळाल्यानंतर कृषी विभागानं हे तंत्र राज्यभरात भात पीकामध्ये विस्तारण्यासाठी सुरुवात केली. त्यानंतर भात पीकाची कोकण आणि पूर्व विदर्भात एसआरटी पद्धतीनं लागवड करण्याची सुरुवात झाली.
भातामध्ये विकसित केलेला हा शून्य मशागतीच्या शेतीचा प्रयोग 2019 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनं प्रकल्पानं (पोकरा) इतर पिकांच्या लागवडीमध्ये करुन पाहण्यास सुरुवात केली.
यामध्ये कापूस, सोयाबीन, मका या पीकांची शून्य मशागतीचं तंत्र वापरून लागवड करण्यात आली.
फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
चंद्रशेखर भडसावळे यांच्या शेतातील तांदूळ.
ही पद्धत इतर पिकांसाठीही उपयुक्त ठरते आहे आणि यामुळे उत्पादन खर्चात बचत होत आहे, शिवाय उत्पन्नही वाढत असल्याचा निष्कर्ष समोर आल्यानंतर 'पोकरा'नं आता विनामशागतीच्या शेतीचं तंत्र राज्यभर राबवण्याचं धोरण स्वीकारलंय.
विनामशागतीचं तंत्र वापरून यंदा राज्यातील 6 हजार एकर क्षेत्रावर भात, कापूस, सोयाबीन, मका, हरभरा, गहू, झेंडू अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्यात आली आहे.
दीपक जोशी हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील देवगावचे प्रयोगशील शेतकरी आहेत. ते गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बिनानांगरणीचं तंत्र वापरून कापूस, तूर या पिकांची लागवड करत आहेत.
ते सांगतात, "जवळपास 6 एकरावर माझा हा प्रयोग सुरू आहे. केवळ तणांचं व्यवस्थापन करून मी ही शेती करतोय. गेल्या हंगामातील पिकांचं अवशेष कुजवून नवीन हंगामातील पिकांची लागवड करतोय."
"कोरडवाहू जमिनीत प्रती एकर 5 ते 6 क्विंटल इतका कापूस निघतो. बिनानांगरणीमुळे माझा उत्पन्नाचा आकडा वाढला नसला तरी पारंपरिक शेतीपेक्षा 10 ते 15 हजार रुपयांनी उत्पादन खर्च कमी झाला आहे. याशिवाय गेल्या 4 वर्षांत जो बायोमास शेतात जिरवला त्याची किंमत तुम्ही कशी काढणार?" जोशी पुढे सांगतात.
फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी यांच्या शेतातील एसआरटीचा प्रयोग पाहण्यासाठी इतर गावांहून शेतकरी येत असतात.
विनामशगातीच्या शेतीचं हे तंत्र आता केवळ कोकणापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. ते मराठवाडा आणि विदर्भातही पसरलं आहे.
शेतकरी विवेक पोटे विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बळेगावमध्ये राहतात. त्यांनी गेल्या 2 वर्षांपासून बिनामशागतीच्या शेतीचा प्रयोग सुरू केला आहे.
सोशल मीडियावर त्यांनी तंत्रासंदर्भातले व्हीडिओ पाहिले आणि मग एसआरटी पद्धतीनं शेती करायचं ठरवलं.
ते सांगतात, "गेल्या वर्षी आणि यावर्षी मी शेतात आंतरमशागत केलेली नाहीये. माझं सोयाबीनचं पीक सध्या उत्तम स्थितीत आहे. आता उत्पन्न वाढतं की कमी होतं, ते सोयाबीन काढल्यानंतरच कळेल."
विवेक यांनी त्यांच्या 52 एकर क्षेत्रावर आंतरमशागत बंद केलीय. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पेरणीसाठी मात्र त्यांना ट्रॅक्टर वापरावा लागत असल्याचं ते सांगतात.
भारतीय शेतीसमोर सध्या सगळ्यांत मोठं आव्हान हवामान बदलाचं असल्याचं सांगितलं जात आहे. अवेळी पडणारा पाऊस, दुष्काळ यांमुळे शेतीचं नुकसान होत आलं आहे.
अशावेळी हवामान बदलाला तोंड देऊ शकेल, अशाप्रकारची पीक पद्धती अवलंबवणं गरजेचं असल्याचं मत शेती क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात.
फोटो स्रोत, Sharad badhe/bbc
शेती तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे
शेती तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांच्या मते, "हवामान बदलाला तोंड देऊ शकेल, अशाप्रकारची पीक पद्धती असणं आवश्यक आहे. त्याचं साधं आणि सोपं उत्तर म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं. जिथं शेतकऱ्याचा खर्चच मूळात कमी आहे, अशापद्धतीनं जमीन पिकवणं आता काळाची गरज आहे. खर्च कमी झाला तर भविष्यात हवामान बदलामुळे होणारं नुकसानंही कमी होणार आहे. या गोष्टी विनामशागतीच्या शेतीतून साध्य करता येतात."
"अवकाळी पाऊस, वादळ आलं आणि नुकसान झालं तर त्याच शेतात पुन्हा पुढच्या दोन दिवसांत नवीन पिकाची लागवड करण्याची क्षमता विनामशागतीच्या शेती तंत्रात आहे. हवामान बदलास अनुकूल असं हे तंत्रज्ञान आहे," भडसावळे पुढे सांगतात.
फोटो स्रोत, vijay kolekar
एसआरटी पद्धतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पोकराचे कृषीविद्यावेत्ता विजय कोळेकर.
पोकराचे कृषीविद्यावेत्ता विजय कोळेकर यांच्या मते, "हवामान बदलत आहे, तापमान वाढ होत आहे. हवेमध्ये कार्बन डाय-ऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. या सगळ्या गोष्टीचा वाईट परिणाम शेतीवर होत आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी विनामशागतीची शेती उपयुक्त ठरत आहे.
"कारण या पद्धतीमध्ये दरवर्षी हवेतील कार्बन डाय-ऑक्साईड शोषून घेऊन जमिनीमध्ये तो ग्रहण करता येतो. यामुळे जमिनीतला कर्ब वाढतो आणि हवेतला कर्ब कमी होतो. म्हणून हवामान बदलावर विनामशागतीची शेती हा उपयुक्त आणि परिणामकारक उपाय ठरणार आहे."
जगभरात 1960 सालापासून शेतीतील मशागत थांबवण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे, पॅराग्वे आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नांगरणी थांबवण्यात येत आहे.
आज 11 ते 12 कोटी हेक्टर जमिनीवर नांगर चालवला जात नाहीये. यातलं जवळपास 50 % क्षेत्र दक्षिण अमेरिकेतील आहे.
भारतात जवळपास 15 ते 20 लाख लाख हेक्टरवर गहू पिकाची लागवड विनामशागतीचं तंत्र वापरून करण्यात येत आहे.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares