शेती: व्होडका, तीही मेंढीच्या दुधापासून; शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल – BBC

Written by

ब्रायन पेरी यांनी मेंढीच्या दुधापासून व्होडका तयार केलीय.
मुलाखत सुरू होती आणि मधूनच एक ट्रॅक्टर गेला. मला वाटलं ऐकण्यात माझी चूक झाली असावी.
"तुम्ही व्होडका तयार करता…मेंढीच्या दुधापासून?" शेवटी मी विचारलंच.
पण मी चुकीचं ऐकलं नव्हतं. ब्रिटनमधल्या हॅवरफर्डवेस्टमधले शेतकरी ब्रायन पेरी यांना अनेक पुरस्कार मिळालेत. चीज वापरताना उरलेल्या Whey (पनीर तयार करताना उरलेलं पाणी) पासून ब्रायन यांनी व्होडका तयार करण्याची पद्धत शोधलीय.
दुधापासून केलेली व्होडका….हे ऐकल्यावरच मनात प्रश्न येत असतानाच ब्रायन त्यांची ही मेंढीच्या दुधापासूनची व्होडका (Ewe Whey Vodka) अतिशय छान असल्याचं सांगत होते.
यासाठीची प्रक्रिया 'Milk Stout' करण्यासारखीच असल्याचं ते सांगतात. Whey (व्हे) मध्ये असणारी शर्करा आंबवून एकप्रकारची बिअर तयार केली जाते. ती डिस्टिल करून त्यापासून व्होडका तयार करतात.
हे पेय म्हणजे 'मोठ्यांसाठीचा मिल्कशेक' अजिबातच नसल्याचं ब्रायन आणि त्यांची पार्टनर रिबेका मोरिस सांगतात.
"मेंढीच्या दुधाच्या व्हेपासून व्होडका केली असल्याचं सांगितलं की लगेचच हे म्हणजे एखादं दुधाळ, डेअरी पेय असल्याचं लोकांना वाटतं, " ते सांगतात.
"खरंतर ही नॉर्मल व्होडकासारखीच लागते, किंवा त्यापेक्षाही स्मूद…"
चीज तयार करून झाल्यानंतर उरलेलं अनेक गॅलन व्हे (Whey) ओतून देणं त्यांच्या जीवावर येई आणि त्याचवेळी त्यांना या व्होडकाची कल्पना सुचली.
"शेतीतून उत्पादित झालेल्या गोष्टी पर्यावरणाच्या, आर्थिक आणि तत्वं म्हणूनही फुकट घालवणं मला अयोग्य वाटतं. हा प्रकल्प सुरू केल्यापासून आम्ही मेंढीच्या दुधापासूनच 5 वेगवेगळ्या प्रकारची चीज तयार करतो, पण दररोज आम्ही गोळा केलेल्या दुधापैकी अर्धं फेकून देत असू."
चीज तयार करण्यासाठी दुधातलं पनीर वेगळं केलं की उरणाऱ्या पाण्याला Whey म्हणतात. हे व्हे (Whey) जवळच्या डिस्टिलरीमध्ये प्रक्रियेसाठी नेलं जातं.
ब्रायन यांनी ही प्रक्रिया नक्की करण्यासाठी जवळपास वर्षभर वेगवेगळ्या रेसिपी वापरल्या. यानंतर ब्रायन यांना शेतीतल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ब्रिनले विल्यम्स मेमोरियर पुरस्काराने युकेमध्ये गौरवण्यात आलं.
फोटो स्रोत, BRYN PERRY
"आम्ही सध्या डच मेंढ्या वापरतो कारण त्या चांगलं दूध देतात. पण आम्ही त्यांचं स्थानिक वेल्श मेंढ्यासोबत क्रॉस ब्रीडिंग करण्याचा प्रयत्न करतोय."
अशाप्रकारे व्हेपासून अल्कोहोल तयार करणारे आपण युकेमधले पहिलेच असल्याचा दावा ब्रायन आणि रिबेका करतात.
"न्यूझीलंडमधल्या एका व्यक्तीवरून मला ही कल्पना सुचली. मला वाटतं त्यावेळी असं करणारी ती जगातली पहिली व्यक्ती होती."
एरवी फेकून देणारी बाय प्रॉडक्टस फेकून न देता ती वापरण्याचे प्रयत्न सध्या केले जातायत. ही व्होडका त्या प्रयत्नांपैकीच एक आहे.
अॅपल सायडर तयार करताना उरलेल्या सफरचंदाच्या चोथ्याचा वापर 'रेडी टू ईट' जेवणांमध्ये करण्याचा प्रयत्न ब्रिटनमधलीच पेनोटेक नावाची आणखी एक कंपनी करत आहे. तर सीफूड प्रोसेसिंगमधून उरलेल्या शिंपल्यांचा वापर स्विमिंग पूल आणि हायड्रोथेरपीसाठी लागणाऱ्या पाणी फिल्टर करणाऱ्या यंत्रणांमध्ये करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
ब्रायन आणि रिबेकाच्या फार्ममध्ये तयार करण्यात आलेली ही व्होडका सध्या थेट त्यांच्याकडून विकत घेता येते किंवा फार्मर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पण पुढच्या काही महिन्यांत या मेंढीच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या व्होडकाची ऑनलाईन विक्रीही ते सुरू करणार आहेत.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares