शेती कायदे : कृषी कायदे मागे घेणं हा अहंकाराचा पराभव- सामनातून खरमरीत टीका #5मोठ्याबातम्या – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला होता
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
"शेतकरी लढत राहिले, शहीद झाले व शेवटी जिंकले. तिन्ही कृषी कायदे मागे घेणं केंद्र सरकारला भाग पडलं आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. मागे हटणार नाही असे सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला पण आताही अंध भक्त बोलतील- काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक", अशी टीका 'सामनाच्या अग्रलेखातून' करण्यात आली आहे.
"शेतकरी खलिस्तानीवादी होते मग पंतप्रधान मोदी यांनी पांढरे निशाण का फडकावले? लखीमपूर खिरी इथे आंदोलक शेतकऱ्यांना भाजपच्या मंत्रिपुत्राने चिरडले. जालियनवाला बागसारख्या हत्याकांडाविरोधात सार्वत्रिक बंद पुकारणारे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं".
"न्याय, सत्य आणि राष्ट्रवादाच्या लढाईत महाराष्ट्राने नेहमीच निर्भय भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांचे वीज पाणी बंद करण्यात आलं. दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पाठवल्या. तरीही शेतकरी जागचे हलले नाहीत. 550 शेतकऱ्यांनी बलिदान दिलं. शेतकरी मागे हटणार नाहीत आणि पंजाब तसंच उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपचा पराभव होईल", असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.
"मनमानी चालणार नाही हे यातून स्पष्ट झालं आहे. देश लोकशाहीच्या प्रक्रियेतून खासगीकरणाच्या जोखडात जात आहे. स्वातंत्र्याचे संपूर्ण खाजगीकरण आणि लोकशाहीचे मालकीकरण असा अध्याय लिहिला जात आहे. चार दोन लोकांच्या अहंकारातून देशाची प्रतिष्ठा रसातळाला जात आहे".
"मी बहुजन असल्याने मला संपवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे", असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. एसटी संपासंदर्भात 10 दिवस ते मुंबईतल्या आझाद मैदानात ठाण मांडून बसले होते. शुक्रवारी संध्याकाळी पुण्यात आले असताना ते बोलत होते.
"जिल्हा सत्र न्यायालयाने माझा जामीन अर्ज फेटाळला आहे. पण माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला तर मी स्वतः हजर होणार माझ्या गाडीवर हल्ला झाला. तीन डंपर दगड भरुन आणले होते", असं पडळकर म्हणाले. 'लोकमतन्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
गोपीचंद पडळकर
"एसटी आंदोलनात मानवतेच्या भावनेतून सहभागी झालो आहे. सरकार वेडेपिसे झाले आहे. त्यांना सुचायचे बंद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पवारांची मोठी मान्यताप्राप्त संघटना आहे. पवारांनी आजवर मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरुन कर्मचाऱ्यांवर अन्याय केला. पण कर्मचाऱ्यांना आता अन्यायाची जाणीव झाली आहे. जर प्रश्न मिटला तर पवारांच्या संघटनेचं दुकान बंद होईल. त्यामुळे निर्णय घ्यायला अडचण आहे", असं पडळकर म्हणाले.
"मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने मागे घेतलेल्या तीन कृषी कायद्यांवर लगेच प्रतिक्रिया दिली. मात्र 38 मराठी कर्मचारी आत्महत्या करतात, त्यांच्या पत्नी विधवा झाल्या. त्यावर सांत्वनाचे दोन शब्द नाहीत", अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्यात आले याचं स्वागत करताना आता काश्मीरात कलम 370 लागू करावं अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.
फोटो स्रोत, AFP
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला
"कृषी कायदे रद्द झाले याचं आम्ही स्वागत करतो. मात्र हे कायदे संसदेत रद्द होत नाहीत तोवर शेतकऱ्यांनी मागे हटू नये आणि आंदोलनस्थळही सोडू नये", असं अब्दुल्ला म्हणाले. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
याच धर्तीवर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 लागू करावं. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेतलं कलम 370 रद्द केलं होतं.
विधानपरिषदेसाठी पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे. त्यांच्यासोबत कोल्हापुरातून अमल महाडीक यांची नावं जाहीर झाली आहेत.
अमल महाडिकांना टक्कर देण्यासाठी सतेज पाटील असणार आहेत. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
फोटो स्रोत, @CBAWANKULE
चंद्रशेखर बावनकुळे
अनेक दिवसांपासून विधानपरिषदेसाठी मुंबईतून चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती. वाघ यांना यंदा परिषदेसाठी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण भाजपने राजहंस सिंह यांचं नाव पक्कं केलं आहे.
पंकजा मुंडे यांचं नावही चर्चेत होतं. ओबीसी समाजाच्या मतांचा विचार करून बावनकुळेंना पसंती देण्यात आली.
शिस्तबद्ध गोलंदाजी आणि त्यानंतर रोहित शर्मा-लोकेश राहुल जोडीच्या दमदार सलामीच्या बळावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यात 7 विकेट्सनी विजय मिळवला.
या विजयासह भारतीय संघाने तीन ट्वेन्टी20 सामन्यांची मालिका जिंकली. मालिकेतला शेवटचा आणि अंतिम सामना कोलकाता इथे रविवारी होणार आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या 10 षटकात 90 धावांपर्यंत मजल मारत आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत न्यूझीलंडला 153 धावातच रोखलं.
पदार्पणवीर हर्षल पटेलनं 2 तर भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. न्यूझीलंडतर्फे ग्लेन फिलीप्सने सर्वाधिक 34 धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित-राहुल जोडीने 117 धावांची सलामी दिली. राहुलने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 65 तर रोहितने 1 चौकार आणि 5 षटकारांसह 55 धावांची खेळी केली.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares