Prahlad Singh Patel : राज्यपालांबाबतची नाराजी पक्षश्रेष्ठींना कळविणार; प्रल्हाद सिंह पटेल – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कोश्‍यारी यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्याविषयी जनतेमध्ये निर्माण झालेल्या भावना भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येतील, असे केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया व उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी गुरुवारी (ता.२४) पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांनी गुरुवारी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार योगेश टिळेकर, ॲड. धर्मेंद्र खांडरे उपस्थित होते. पटेल यांनी यावेळी कोश्यारी यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे या पदाला फार महत्त्व आहे. अशा महत्त्वाच्या पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा नेत्याने महापुरुषांचा अवमान होईल, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या या चुकीचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यामुळे आपण या विषयावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलणार नाही. परंतु याबाबतच्या लोकभावना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नक्कीच पोचवू.’’
कॉंग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. याबाबत प्रश्‍न विचारला असता, त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. या पदयात्रेच्या माध्यमातून व्यक्तीविरोधी विचार पेरून समाज तोडण्याचे काम केले जात आहे, असे ते म्हणाले. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कांदा आणि बटाटा पिकाचे अधिक उत्पादन घेत आहेत. या भागात फिरत असताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर कांद्याची साठवण ही प्रमुख समस्या असल्याचे दिसून आले आहे. कांदा काढणीपासून पुढे किमान वर्षभर कसा टिकेल, याकडे केंद्र सरकार लक्ष देत आहे. खेड तालुक्यात बटाट्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, त्याला विम्याचे संरक्षण नाही. याचा विचार करून विशेष बाब म्हणून या पिकाचा विमा योजनेत समावेश करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
‘डॉ. अमोल कोल्हे यांचे भाजपत स्वागत’
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मतदारसंघात काहीच विकासकामे केली नसल्याचे या मतदारसंघात फिरल्यानंतर निदर्शनास आले आहे. कोल्हे हे केवळ पूर्वीच्या खासदाराने केलेल्या कामाच्या श्रेय घेत आहेत. ते निष्क्रिय खासदार आहेत, अशी टीका पटेल यांनी केली. मात्र कोल्हे यांनी भाजपत प्रवेश केल्यास, त्यांचे स्वागत केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत त्यांनी मत व्यक्त करण्यास नकार दिला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares