तरुणाईने वहावी गावच्या सुशासनाची पालखी – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
64602
इंद्रजित देशमुख

सुशासनासाठी
तरुणाईची ऊर्जा
लीड…
ग्रामीण भागातील तरुणाई एका बाजूला फॅशन, व्यसन, शोषणाच्या विळख्यातही अडकली आहे आणि एका बाजूला उत्तुंग भरारी घेऊन स्वत: तरून इतरांनाही तारते आहे. खेड्यातील विकासाच्या दिशा निश्‍चित करून त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भरपूर वाव आहे. त्यासाठी जाणकारांनी तरुणाईवर यथार्थ काम करणे आवश्यक आहे. त्यांना जीवनकौशल्ये देण्यासाठी, त्यांच्या आयुष्यातील कलात्मकता प्रकट होण्यासाठी, शिक्षणाच्या अनेक क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटवण्यासाठी व्यवस्था निर्माण करून त्यात कालानुरूप बदल करत भविष्यकाळ सुखरूप करण्यासाठी तरुणाईची जीवन ऊर्जा निश्‍चित उपयोगी पडेल. तरुणाईचे तेज, तरुणाईचे तप आणि तरुणाईची तत्परता ही त्यांची बलस्थाने आहेत. या बलस्थानांना प्रकाशाच्या वाटेवर आणून नवनिर्मितीसाठी योगदान देण्यास तयार करण्याचे काम समजदार लोकांना करावे लागेल असे वाटते.
– इंद्रजित देशमुख
——————
‘काल हे गाव संतांचे होते, आज का बकाल झाले’ या कवीच्या ओळीप्रमाणे किंवा बकाल खेडी आणि सुजलेली शहरे यामध्ये चेहरा हरवलेला माणूस याप्रमाणे आज खेड्यांची अवस्था झाली आहे. काहींच्या मते स्वातंत्र्यापूर्वी देश पारतंत्र्यात होता; पण खेडी स्वतंत्र होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर……… देश स्वतंत्र झाला; पण खेडी पारतंत्र्यात गेली, अशी अवस्था वर्णन केली जाते. गावगाडा चालवणारे कारभारी बदलले आणि गावाचे प्रशासन बदलले. एक काळ असा होता, गावचा कारभारी संपूर्ण गाव जेवल्याशिवाय स्वत: जेवायचा नाही. ज्या घरात चूल पेटली नाही तिथे स्वत: शिधा द्यायचा आणि ते घर जेवल्यानंतर स्वत: जेवायचा. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक असे सूत्र होते. गावच्या गरजा गावातच भागायच्या; पण सामाजिक विषमता होती. गावची शेती मशागतीवर आणि शेणखतावर चालायची. सर्व व्यवहार एकमेकावर अवलंबून असायचे. निसर्ग बऱ्‍याच वेळा नियमित असायचा. २७ पैकी ९ नक्षत्रे हमखास पडायची. मृग नक्षत्रात पेरण्या व्हायच्या, आषाढात पंढरीच्या वारीचे वेध लागायचे. सर्व सण, उत्सव, शेतीवर पिकणाऱ्या धान्यानुसार साजरे व्हायचे. करमणुकीसाठी गावदेवाच्या जत्रा, यात्रा असायच्या. शिक्षण व्यवस्था तोकडी असायची. काही जणांच्या वाट्याला शाळा यायची. प्रामाणिकपणे जीव तोडून शिकवणारे शिक्षक असायचे. शिवारात पोटापुरते पिकायचे. दारात जनावरं असायची. आरोग्याचे प्रश्‍न गंभीर असायचे. गावकी आणि भावकीत सामुदायिक कार्यक्रम पार पडायचे.
काळ बदलला, गावे बदलली, शिक्षणाचा प्रसार झाला. गावाने सर्वार्थाने आपली कूस बदलली. कात टाकली. मशागतीची शेती जाऊन रासायनिक शेती सुरू झाली. ज्वारी, बाजरीची हायब्रीड बियाणे आली. ऊस, सहकार या माध्यमातून आर्थिक बाजू बदलत निघाली. गावात स्वयंचलित वाहने आणि मशागतीसाठी ट्रॅक्टर आले. माणसाचे श्रम थोडेफार कमी होऊ लागले. गावातले प्रशासन बदलले. ग्रामपंचायती गावचा कारभार करू लागल्या. लोकशाही शेवटच्या टप्प्यात पोहोचली आणि गावात निवडणुकींचा धुरळा उडू लागला. ईर्षा, चुरस यातून गावातली घालमेल वाढू लागली. गावकी, भावकीतसुद्धा चुळबूळ सुरू झाली. यांनी गावातील वातावरण ढवळू लागले. शिकणारी तरुणाई पुढचा टप्पा गाठत शहराकडे वळली आणि शिकू न शकलेली गावातच थांबली आणि गावात थांबलेल्या तरुणाईच्या दोन दिशा झाल्या.
जे तरुण श्रमापासून दूर राहिले, ज्यांना चमकोगिरी, ईर्षा याचे आकर्षण आहे ते राज्यकर्त्याकडून वापरले जाऊ लागले. निवडणूक जवळ आली की, यांचे दलाल बनून गावातील मतांची आघाडी देण्यासाठी स्वत: व्यसनी होऊन इतर सवंगड्यांनाही व्यसनी बनवून अधोगतीच्या मार्गाकडे धावू लागले. यांचे वाढदिवस चौकात साजरे होतात. एकाच्या वाढदिवसाला २५ हजारांवर खर्च होतात. डॉल्बी नाचच्या तालावर या युवकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्थानिक नेत्यांची मुले हजर असतात. एका बाजूला वडिलांची परिस्थिती नाही आणि हा ऋण काढून सण साजरा करण्याकडे ओढा आहे. फॅशन, व्यसन आणि शोषणाच्या विळख्यात ही तरुणाई अडकली आहे. ब्रॅन्डेड कपडे, ब्रॅन्डेड शूज, ब्रॅन्डेड मोबाईल यावर गरज नसताना दिखाव्यासाठी खर्च. बाप कर्जाने दबून गेलाय अशी स्थिती. गणेश उत्सव, नवरात्र, ३१ डिसेंबर या कार्यक्रमात नशा, धिंगाणा, डॉल्बी याची एक चुरसच गावात निर्माण झाली आहे. या नशांचाच वापर धोरणी राजकारणी करत आहेत. या समज नसलेल्या तरुणाईचा वापर करून त्यांचे शोषण करून त्यांची ऊर्जा संपेपर्यंत खोटे प्रेम दाखवत आयुष्य अंधारात घालवत आहेत. यांच्यासाठी भविष्यकाळ अंधाराचा आहे. कोणतेही ध्येय नाही, विचार नाही असे आयुष्य ही पिढी जगत आहे. बाप पिढी हताश आहे. शेती अस्मानी, सुलतानीच्या संकटाने बेभरवशाची. त्यात खर्चाची होत नसलेली जुळणी, सोसायटी, बँकांच्या हप्त्याखाली दबलेला शेतकरी बाप आणि बापाचे दु:ख, कष्ट न समजू शकणारी त्यांची लेकरे.
दुसऱ्या बाजूला शिक्षणाचे महत्त्व समजलेली तरुणाई शहरात जाऊन कमीत कमी खर्च करून शिक्षण पूर्ण करत आहे. गावातील काही तरुण अभियंते होऊन परदेशात झोकात आयुष्य जगत आहेत. स्वत: जगून गावाकडील आईवडिलांना सुखी करत आहेत. पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन काही कौशल्ये प्राप्त करून स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे राहत आहेत. आई वडिलांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करत आहेत. काही मोजके तरुण ज्यांना वास्तवतेचे भान आहे आणि स्वयंसेवी संस्थांचे जाळे विणणे
आवश्यक आहे, यासाठी लागणारे ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या संस्था यांची माहिती आणि प्रेरणा पेरणे महत्त्वाचे आहे. नकारात्मक, ईर्षेचे राजकारण, व्यसनाधीन आणि दिशाहीन तरुणाईला रस्त्यावर आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी लागेल.
अनेक गावांतील व्यवस्था परिपक्वता असलेल्या तरुण नेतृत्वाकडे आल्यामुळे सगळा गावच बदलत आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी चैताराम पवार नावाच्या तरुण सरपंचाने गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. गावातील नैसर्गिक संसाधने आणि मानव संसाधने यांचा मिलाफ करून एक दिशादर्शक गाव तयार केले आहे. या गावाच्या भोवतालच्या जंगलात शेकडो रानभाज्या आहेत. या रानभाज्यांचा महोत्सव भरवून आर्थिक दिशा मिळवली आहे. गावच्या परिसरात अनेक भातांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्याचे जतन, संवर्धन करूनही विकास साधत आहे. शिक्षण आणि व्यसनमुक्तीवर भर देऊन गावाचा एकोपा टिकवून, तरुणाईच्या ऊर्जेला चुचकारत गाव उभे राहत आहे.
गावच्या विकासाला नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी आणि श्रमदान या सूत्रावर भर देऊन सकारात्मक तरुण नेतृत्वाने ग्रामपंचायत आणि शासनाच्या विविध योजनांतून गावाचे सर्वांगीण संवर्धन करून यश मिळणारी हिवरे बाझार, किकवारी यांसारख्या गावांचा आदर्श घेऊन अनेक गावे त्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. अनेक विस्कटलेली गावे राजकारणाच्या ईर्षेने रसातळाला गेली आहेत. राजकीय, सामाजिक समज असणारी खूप थोडी गावे आहेत. भारत आणि इंडियातील गावातील फरक खूप मोठा आहे. इंडियातील गावात गुळगुळीत रस्ते आहेत. शिक्षणाची व्यवस्था आहे. आर्थिक संस्थांचे जाळे आहे. दूध डेअरी, छोटे उद्योग यांची रेलचेल आहे; पण माणूस माणसात नाही. आर्थिक संपन्नता वरून दिसत असली तरी आतून पोखरलेला आहे. कर्जाचा भार डोक्यावर घेऊन वाटचाल करीत आहे.
भारतातील अजून कित्येक खेड्यांत शिक्षणाचे हाल आहेत. रस्त्यांचे जाळे नाही. आर्थिक संस्थांचे जाळे नाही. स्त्री शिक्षणाची तर दुरवस्था आहे. मुलगी १८ वर्षांची झाली की, तिचे लग्न आहे आणि १९ व्या वर्षी पदरात बाळ आहे. स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्‍न गंभीर आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या बाबतीत दुरवस्था आहे. या गावातील तरुणाई जीवन ऊर्जाच पोटाची खळगी भरण्यासाठी खर्च पडत असल्यामुळे अर्धपोटी, व्यसनी बनलेली आहे. भारतातील खेडी इंडियाच्या व्यवस्थेला जोडण्यासाठी खूप राजकीय इच्छाशक्ती आणि संवेदनशील स्वयंसेवी संस्थांचे योगदान आवश्यक आहे. अभय बंग, राणी बंग यांसारख्या द्रष्ट्या समाजसेवकांच्या पठडीतील त्यांच्या संस्थेतील ‘निर्माण’ सारख्या शिबिरातून घडलेली तरुणाई भारतातील या मागास खेड्यात जाऊन काम करू लागली आहे; परंतु हे प्रयत्न खूप अपुरे आहेत.
एकूणच विकास हा दोन अर्थांनी होणे अपेक्षित आहे. एक जीवनमानाचा दर्जा सुधारणे आणि राहणीमानाचा दर्जा सुधारणे. जीवनमानाचा दर्जा म्हणजे मानवी जीवनमूल्ये घरात आणि दारात जपली जातात का? मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर, स्त्रियांना सन्मानाने वागणूक. गाव म्हणून एकत्र आल्यानंतर तेथील सांस्कृतिक कार्यक्रमाचा दर्जा, गुणवत्ता या गोष्टी अजूनही अनेक गावांत टिकून आहेत. एकत्र कुटुंबे तुरळक का होईना शिल्लक आहेत. तीनही पिढ्या एकत्र समाधानाने नांदत आहेत. खेड्यातील वृध्द अजूनही वृध्दाश्रमात राहायला गेलाय असे उदाहरण नाही. कुटुंब व्यवस्था अजून तरी बळकट आहे. भावा-बहिणींचे नाते, शेजार धर्माची जपणूक, सार्वजनिक कार्यक्रमात मनापासून झटून काम करणारी तरुणाई ही जमेची बाजू अजूनही शिल्लक आहे.
आर्थिक उन्नतीसाठी शेती, शेतीवर आधारित उद्योग, उपजीविका यामध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. सध्याचे शेती उद्योगाचे स्वरूप काय आहे? जिथे पिकते आहे तिथे विकले जात नाही आणि जेव्हा पिकते तेव्हा विकत नाही. तरुणाई शेतीकडे किंवा शेती उद्योगाकडे सकारात्मकतेने पाहत असेल तर शेतीमाल जिथे पिकत नाही त्या जागी नेणे किंवा जेव्हा माल पिकत नाही त्यावेळी तो उपलब्ध करून देणे. माल एका जागेहून हवा तिथे हलवला तर त्याची किंमत वाढते. एका काळातून दुसऱ्या योग्य काळी उपलब्ध केला तर त्याला किंमत मिळते आणि शेतीमाल निसर्गदत्त स्वरूपापेक्षा उपयुक्त स्वरूपात माल बाजारपेठेत नेला तर त्यालाही मोल मिळते. यासाठी बारकाईने अभ्यास करून बाजारपेठ, साठवणूक यांची सांगड घालून शेती उद्योगाला चांगले दिवस आणणे ही शेतीची क्षमता आहे. ती अनेक तरुण साध्य करीत आहेत. नाशिक येथे मोहाडी गावी ‘सह्याद्री फार्म्स’ या कंपनीच्या माध्यमातून हजारो शेतकरी सुखी होताहेत. हजारो हातांना काम मिळत आहे. हे एका विकास शिंदे नावाच्या कर्तृत्ववान तरुणाने सिद्ध केले आहे; पण ही विकासाची बेटे ज्या तरुणाईने विकसित केली आहेत त्याचे प्रमाण वाढवण्याचे आव्हान जिद्दी तरुणाईपुढे आहे. अनेक क्षेत्रांतील मोक्याची पोकळी शोधून ती पोकळी भरून काढण्याचे काम काही प्रमाणात घडते आहे, ही आशादायक बाब आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares