बोलून बातमी शोधा
सातासमुद्राच्या पलीकडून आपल्या देशात येऊन इथल्या जनतेवर जुलूम करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिवीर भावांना मायेची शिदोरी देणारी नानुबाई आणि तिच्या लोकसाहित्याचा अनमोल ठेवाही आज उपलब्ध नाही.
सातासमुद्राच्या पलीकडून आपल्या देशात येऊन इथल्या जनतेवर जुलूम करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिवीर भावांना मायेची शिदोरी देणारी नानुबाई आणि तिच्या लोकसाहित्याचा अनमोल ठेवाही आज उपलब्ध नाही. आहेत तिच्या आठवणी. मी ऐकलेल्या लोककथा, म्हणी आणि वाक्प्रचार, सोबत तिची स्वतःची भाषा… बाकी आता विट्याकडे जाताना नानुमावशीचे घर दिसते. तिथून जाताना मला तिचा आवाज आल्याचा भास होतो, पण तो भासच असतो…
सांगली जिल्ह्यात भाळवणी नावाचं गाव आहे. काही वर्षांपूर्वी तिथे एकास गरुडाचे पिलू सापडले. ते बघायला दुरून लोक यायचे. गर्दी व्हायची. या गावावरून जाणाऱ्या एसटी बसचे कंडक्टर गमतीनं या गावाला गरुड भाळवणी म्हणायचे. तो गरुड आणि त्याच्या आठवणी आजही जुने लोक सांगतात.
याच गावात नानूबाई खेराडे राहत होती. शेतकरी कुटुंबातील स्त्री. रानात राबणारी, स्वतःचा संसार प्रामाणिकपणे करणारी. कधीही शाळेत गेली नव्हती. तिचा मुळाक्षरे आणि बाराखडीशी कसलाही संबंध आला नव्हता; पण तिचं शब्दांवर भारी प्रभुत्व होतं. तिचं बोलणं म्हणजे मराठी विषयाच्या तज्ज्ञ अभ्यासकालाही विचार करायला लावणार होतं. नानुबाई औपचारिकदृष्ट्या भले निरक्षर होती, पण तिच्याकडे ज्ञान होतं. व्यावहारिक ज्ञान होतं तसंच भाषेचं ज्ञान होतं. तिच्याकडं लोकसाहित्याचा अफाट साठा होता. तिच्या बोलण्याची सुरुवात म्हणीने व्हायची, मुद्दा पटवून सांगायचा असेल तर ती छोटी लघुकथा सांगायची. स्वतःचा मुद्दा पटवून द्यायला ती लोकसाहित्याच्या गुहेत शिरून पटेल अशा म्हणी सांगायची. किती म्हणी तिच्याकडे असतील याची दाद नाही. जात्यावरची शेकडो गाणी तिला ज्ञात होती. या गाण्याचं निरूपण मी तिच्याच ग्रामीण शब्दात ऐकलं आहे. त्यातील अनेक शब्द जुने होते. मला समजणारे नव्हते. काहीशे वर्षांपूर्वी ते शब्द त्या गाण्यात होते. त्याचा अचूक अर्थ ती सांगत होती. गोष्टीवेल्हाळ होती ती. तेच तिचे बलस्थान होते.
नानुबाई नात्याने माझी पणजी होती. मी तिला अधूनमधून भेटायचो. विट्याला जाताना वाटेवरच तिचं घर होतं. घरी गेलो की ती भरभरून बोलायची. शेळीच्या दुधाचा चहा करायची. तिच्यासोबत बोलताना लय भारी वाटायचं.
एका बैठकीत पाच-सहा गोष्टी सांगितल्या तिने. गोष्टीतील प्रसंग असे उभे केले की, जणू माझ्यासमोरच ती गोष्ट घडत होती. प्रभावी कथनशैली तिच्याकडं होती. कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे मला तिथं शिकता आलं. ज्या काळात मी तिला भेटायचो, त्या काळात माझा साहित्याचा फारसा संबंध नव्हता. मी मराठी साहित्य अभ्यासायला लागलो, तेव्हा मात्र मला नानुबाई आणि तिचं लोकसाहित्यावरचं प्रभुत्व आठवत होतं; पण तोवर ती गेलेली.
नंतर वाटत राहिलं तिच्याकडच्या म्हणी, वाक्प्रचार, जात्यावरची गाणी हे सगळं रेकॉर्ड करून घ्यायला हवं होतं; पण आमच्या गावात तेव्हा साधे टेपरेकॉर्डर आठ-दहा लोकांच्याकडे होते. रेकॉर्ड करण्याची सामग्री कोठून आणणार? आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे, हवं ते रेकॉर्ड करता येतं, व्हिडीओ बनवता येतो. याच आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर कितीतरी कलावंत समाजाच्या समोर आले, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं; पण त्या काळात असे तंत्रज्ञान नसल्याने नानुबाईचे लोकसाहित्य तिच्या मरणासोबत गेले. नानुबाई आता असती, तर तिला साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर बोलायला लावलं असतं तिच्या खास शैलीत; पण आज नानुमावशी आपल्यात नाहीत.
लोकसाहित्य, शब्दावरची हुकमत ही नानुमावशीची एक बाजू. दुसरं म्हणजे नानुबाईच्या काळात संत गाडगेबाबा गावोगावी जाऊन कीर्तनातून लोकांचे प्रबोधन करायचे. त्यातील एक कीर्तन तिनं ऐकलं होतं. ती आठवण ती आयुष्यभर सांगायची. गाडगेबाबा यांना पाहिल्याचा आणि ऐकल्याचा आनंद तिच्या बोलण्यातून व्यक्त व्हायचा.
इंग्रजी राजवट असताना सातारा जिल्ह्यातील ६५० गावांत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार उभारलं होतं. गावोगावच्या शेकडो लोकांनी या सरकारला पाठिंबा दिला होता. गावोगावचे लोक ब्रिटिश सरकारच्या विरोधात पेटून उठले होते. याच लोकांच्या बळावर प्रतिसरकार इंग्रजी राजवटीला नाकारत होते. आमच्या भागात आमचं सरकार असं सांगत होते, प्रतिसरकारचा प्रभाव असलेल्या गावात ब्रिटीश सरकारला कोणतेही सहकार्य करायचे नाही, जेवढा करता येईल तेवढा विरोध करायचा.
ब्रिटिशांची न्यायव्यवस्था, प्रशासन नाकारायचे, त्यांच्या कोणत्याही गोष्टी मान्य करायच्या नाहीत. प्रतिसरकारने स्वतःची न्यायव्यवस्था निर्माण केली. ब्रिटिश सरकारकडून ज्यांना न्याय मिळाला नव्हता, अशा शेकडो लोकांना प्रतिसरकारच्या न्यायनिवाड्यात न्याय मिळाला. गावोगावी काही लोक इंग्रजी सत्तेचे हस्तक म्हणून काम करत होते. अशा फितूरांना प्रतिसरकारने अद्दल घडवली. इंग्रजांची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी क्रांतिवीर लढत होते. सातारा जिल्ह्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भूमिगत राहून लढणाऱ्या आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात जनमत निर्माण केलेल्या या क्रांतिकारकांना पकडण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत होते; पण गावोगावच्या लोकांनी, आया-बहिणींनी पत्रीसरकारच्या चळवळीतील अनेक भूमिगत सैनिकांना आई-बहिणीचं प्रेम दिलं. त्यांचा पोटच्या पोराप्रमाणे आणि सख्ख्या भावाप्रमाणं सांभाळ केला. या भूमिगत क्रांतिकारकासाठी जे जेवण जायचं त्यातील काही भाकरी नानुबाई यांनीही दिल्या होत्या, याची इतिहासात नोंद नाही; पण या सगळ्या गोष्टी नानुमावशीनं मला सांगितल्या होत्या.
गावोगावी अशा माऊल्या होत्या, त्यांनी या प्रतिसरकारसाठी योगदान दिलं होतं. या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवण्याची क्षमता इतिहासकारांच्यात नाही आणि तिथवर संशोधक, अभ्यासक पोहोचलेही नाहीत. सातासमुद्राच्या पलीकडून आपल्या देशात येऊन इथल्या जनतेवर जुलूम करणाऱ्या इंग्रजाच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिवीर भावांना मायेची शिदोरी देणारी नानुबाई आज आपल्यात नाही आणि तिच्या लोकसाहित्याचा अनमोल ठेवाही आज नाही. आहेत तिच्या आठवणी. मी ऐकलेल्या लोककथा, म्हणी आणि वाक्प्रचार, सोबत तिची स्वतःची भाषा.. बाकी आता विट्याकडे जाताना नानुमावशीचे घर दिसते. तिथून जाताना मला तिचा आवाज आल्याचा भास होतो; पण तो भासच असतो…
(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news