एकाचवेळी 13 दारे उघडण्यात येत असल्याने पेच: शेतकऱ्यांनी शेतिपिकांसह फळपिकेही गमावली; SDO कार्यालयावर शेतकऱ्… – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या अप्पर वर्धाच्या व्यवस्थापनाविरोधात गेल्या पंधरा वर्षापासून संघर्ष करीत असलेले शेतकरी उद्या, मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता एसडीओ कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन करणार आहेत. मोर्शी येथे होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व भूमीहिन शेतकरी तसेच धरणग्रस्तांचे नेते प्रा. साहेबराव विधळ व किसान सभेचे प्रदेश सचिव अशोक सोनारकर करणार आहे.
मोर्शी तालुक्यातील सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणाचे तेराही दरवाजे एकच वेळी उघडल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. 2007 पासून त्यांचा हा संघर्ष सुरू आहे. परंतु शासनाने अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. धरणालगत सिम्भोरा, भाम्बोरा, येवती आदी गावे आहेत. या गावातील शेतकऱ्यांची 100 एकराहून अधिक शेती दरवर्षी धरणाच्या पाण्याखाली येऊन शेतीचे बांध, वहिवाटीचे मार्ग, विहीर, मोटार पंप तसेच कापूस, सोयाबीन, संत्रा, मोसंबी या फळपिकांचे पूर्णतः नुकसान होते.
पाणी साचून राहिल्याने जमीन नापीक झाली असून रानटी तण तसेच गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याबाबत शेतकऱ्यांचा संघर्ष मागील 15 वर्षांपासून सुरू आहे. अनेक अधिकारी बदलले. त्यांच्याशी वेळोवेळी चर्चाही झाली. परंतु संबधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. धरणाचे दरवाजे उघडणे ही घटना नैसर्गिक आहे, असे सांगून शेतकऱ्यांची नेहमी बोळवण करण्यात आली. धरण मानव निर्मित व धरणाचे दरवाजे उघडणे ही घटना मानव निर्मित असतानाही नुकसान होणे नैसर्गिक कसे? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी सदर घटना नैसर्गिक नसल्याचे पत्र देऊनसुद्धा धरणाचे अधिकारी याबाबत कार्यवाही करीत नाही. कधी नाल्याचे खोलीकरण तर कधी संरक्षक भिंत, कधी त्रिसदस्यीय समिती स्थापण्याचे आश्वासन देऊन प्रशासन शेतकऱ्यांना चक्रव्यूहात अडकवित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील 15 वर्षापासूनची नुकसान भरपाई आणि जमिनीचे भूसंपादन करून द्यावे अशी मागणी पुढे आली आहे. त्यासाठीच उद्या, 29 नोव्हेंबर रोजी म. रा. किसान सभेच्या नेतृत्वात लक्षवेधी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची नोटीस फार पूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु अद्यापही उपाययोजना करण्यात आली नाही, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संजय आपकाजे, मिलिंद उमरकर, प्रफुल्ल उमरकर, पुरुषोत्तम देवताळे, वैशाली आपकाजे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares