बोलून बातमी शोधा
उतेखोल/माणगाव, ता. १३ (बातमीदार) ः माणगाव तालुक्यातील शेतीला काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात साधारणतः १५ तारखेनंतर सोडले जाते. कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ, दगड, शेवाळ तसेच झाडेझुडपे वाढली आहेत. हे लवकरात लवकर पाणी सोडण्याआधी स्वच्छ करावे अशी मागणी जनतेकडून केली जाते. कालवा सफाईला यंदाही दिरंगाई होणार कि काय? असा सवालही जनतेकडून विचारला जात आहे. डिसेंबरचा पंधरवडा संपत आला तरीही साफसफाई करण्यात आलेली नाही. निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या, कचऱ्याचा खच संपूर्ण शहरातील कालव्यात साचला आहे. रब्बी हंगामातील पीक घेणारे शेतकरी कालव्याला पाणी कधी सुटणार याच प्रतिक्षेत आहेत.
या कालव्याचे दुरवस्था झाली आहे. कचरा, बाटल्या, निर्माल्य, जुने कपडे नागरिकांकडून वाहत्या पाण्यात सोडले जात आहे. त्यामुळे कालवा प्रदुषित होत आहे. तसेच, यंत्राच्या सहाय्याने सफाई करताना कालव्याच्या तळाची माती उघडली गेली आहे. त्यामुळे पाणी गळतीची समस्या सुद्धा उद्भवली आहे. काटान म्हणजे कडधान्याच्या शेतातही पाणी शिरत आहे. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी कालव्याच्या आतून व्यवस्थित बांधकाम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. हेच कालव्यातील पाणी पुढे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना नदीत सोडले जाते व ते पिण्यासाठी वापरतात.
कालव्याच्या स्वच्छते संदर्भात माणगावकरांना वारंवार सांगून देखिल बेजबाबदारपणे कालव्यात कचरा टाकला जात असल्याने येथील नगरपंचायत स्वच्छता सेवक नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत माणगाव पाटबंधारे कार्यालयातील उपविभागीय अधिकारी श्रीकांत महामुनी यांच्याकडून माहिती घेतली असता, यांत्रिक विभागाकडून कालवा सफाईसाठी २ मशीनच्या सहाय्याने धरणाची वाडी येथे सफाई सुरू आहे. लवकरच माणगाव शहरात देखिल कालवा स्वच्छतेचे काम सुरू होऊन डिसेंबर अखेरपर्यंत कालव्याला पाणी सोडले जाईल, असे त्यांनी सांगितले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news