गोनवडी पुलावरून प्रवास ठरतोय जीवघेणा – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
आंबेठाण, ता. १३ : गोनवडी आणि पिंपरी बुद्रुक (ता. खेड) या दोन गावादरम्यान नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दोन्ही गावांच्यामध्ये असणाऱ्या भामा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरवस्था झाली असून तुटलेले लोखंडी कठडे आणि बंधाऱ्याचा सिमेंटचा निखळलेला भाग यामुळे हा बंधारा कम पूल प्रवासास धोकादायक ठरत आहे.
पिंपरी बुद्रुक हे गाव जरी पुणे-नाशिक महामार्गापासून जवळ आणि गोनवडी हे गाव चाकण एमआयडीसीलगत असले तरी दोन्ही गावांमध्ये असणारी दळणवळणाची समस्या पिढ्यानपिढ्या कायम आहे. साधारणपणे २० ते २२ वर्षांपूर्वी या दोन्ही गावादरम्यान हा बंधारा उभारण्यात आला असून ३४ गाळ्यांचा हा बंधारा आहे. याची उंची ४.५ मीटर असून रुंदी १.५ मीटर आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांच्यासाठी हा बंधारा महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या बंधाऱ्यावरून प्रवास करताना एका बाजूला बंधाऱ्यातील पाणी आणि दुसऱ्या बाजूला खोल नदीपात्र अशी धोकादायक परिस्थिती आहे. यापूर्वी या ठिकाणी काही शाळकरी मुलांचे आणि शेतकऱ्यांचे अपघात झाले आहे.
बोरदरा, पिंपरी खुर्द, गोनवडी या गावातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पिंपरी बुद्रुक येथील सुमंत विद्यालयात तर राजगुरुनगर येथे महाविद्यालयात शिक्षणासाठी ये-जा करतात. तर पिंपरी बुद्रुक आणि परिसरातून अनेक तरुण रोजगाराच्या निमित्ताने चाकण एमआयडीसीत येतात. जास्तीत जास्त एक दुचाकी यावरून प्रवास करू शकते.
विद्यार्थी दररोज ये-जा करीत असल्याने काही वर्षांपूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन लोखंडी कठडे बसविले होते परंतु, काळानुसार ते देखील तुटत चालले आहेत.
एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या हा बंधारा प्रवासासाठी धोकादायक ठरत असल्याने त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी, अशी मागणी संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिनेश मोहिते पाटील, गोनवडीचे सरपंच संदीप मोहिते पाटील, पिंपरी बुद्रुकचे माजी सरपंच विकास ठाकूर यांनी केली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares