बोलून बातमी शोधा
निवडणूक यंत्रणा
लांज्यात सज्ज
लांजाः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुका निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, तहसील कार्यालयामध्ये मशिन सिलिंग कार्यक्रम पार पडला. दरम्यान १८ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे. लांजा तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या त्या त्या प्रभागात उभे असणारे उमेदवार, त्यांची चिन्हे, नावे तसेच त्या प्रभागातील मतदार आणि तसेच सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवार आदी सर्व प्रकारची माहिती मशीन सिलिंग कार्यक्रमांतर्गत फीड करण्यात आली. दरम्यान या निवडणुकीमध्ये सालपे, आरगाव, कोट, कुर्णे, पुनस, तळवडे, कुरचुंब आदी ग्रामपंचायतींमध्ये कडवी लढत पाहावयास मिळणार आहे. या ठिकाणी अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व असून सध्या भाजपविरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना गट यांच्यात कडवी लढत पाहावयास मिळणारा असून येथील दिग्गज राजकीय पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व हे पणाला लागले आहे. १९ ग्रामपंचायतीच्या ५२ सदस्यांसाठी १०३ तर सरपंचपदाच्या १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत चुरशीची होणार आहे.
———–
साखरपा परिसरात
मध्यम पाऊस
साखरपाः साखरपा गाव आणि परिसरात सोमवारी पहाटे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामस्थ आणि बागायतदारांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. रविवारी या परिसरात मोठ्या प्रमाणावर मळभ होते. सध्या सर्वत्र गावात कापणी जोरात सुरू असल्यामुळे कापलेले गवत घरी आणण्यात शेतकरी व्यस्त होते. सोमवारी (ता. १० ) पहाटे तीनच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाली. सुमारे पंधरा मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरात पडला. साखरपा गाव तसेच कोंडगाव, मेढे, दाभोळे, कनकाडी या गावांमध्ये हा पाऊस पडला. या परिसरात काजूला चांगला मोहोर आला असून आंबा नुकताच मोहोरू लागला आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे या मोहोरावर काय परिणाम होईल या चिंतेत बागायतदार आहेत.
——————————
वेळास समुद्रकिनारी
कासव संवर्धन मोहीम
मंडणगडः रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धन मोहीम यशस्वी पार पाडली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून २८० कासवांची अंडी वनविभाग आणि कासवामित्र यांनी संरक्षित केली आहेत. निसर्गात होत असलेल्या बदलामुळे कासवांच्या विणीच्या हंगामापुढे देखील काही समस्या निर्माण होत आहेत; पण अशावेळी देखील सध्या कोकणात कासव संवर्धन मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.
—————————
पाली ते आंबा
रस्ता दुरुस्ती
रत्नागिरीः पाली ते आंबादरम्यानचे खड्डे भरण्याच्या कामाला पुन्हा प्रारंभ झाला आहे. हे काम सुरू होऊन थांबल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा ते पाली या सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील खड्डे भरण्याचे काम स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले होते. साखरपा गावच्या दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे भरूनही झाले होते; पण त्याच्यापुढील काम मात्र सध्या थांबले होते. साखरपा गाव आणि मेढेएवढ्याच दरम्यानचे खड्डे भरण्यात आले आहेत. तिथून पुढे पालीपर्यंतचे काम पूर्णतः थांबले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
—————
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

Article Tags:
news