भोर-वेल्हे तहसील कार्यालयात विशेष शिबिर – Sakal

Written by

बोलून बातमी शोधा
भोर, ता. १४ ः महसूल विभागाच्या भोर उपविभागातील भोर व वेल्हा तालुक्यात १४ ते २८ डिसेंबर २०२२ या कालावधीत सर्व मंडल अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय भोर व वेल्हा, उपविभागीय अधिकारी कार्यालय भोर आदी ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४४ अन्वये जमिनीचे एका प्रयोजनातून दुसऱ्या प्रयोजनात रूपांतर करण्याबाबत नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी व प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल अधिनियमचे कलम ४२-ड अन्वये सध्या गावाच्या प्रचलित गावठाणाच्या हद्दीपासून बाहेर २०० मीटरच्या आत असलेली कोणतीही जमीन प्रचलित नियमांच्या अधीन राहून मानीव पद्धतीने निवासी प्रयोजनासाठी अकृषक झाली असल्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जमीन गावठाण हद्दीपासून २०० मीटरच्या आत असलेल्या नागरिक अथवा शेतकरी खातेदारांना भोर व वेल्हा तहसिल कार्यालयामार्फत स्वत:हून रुपांतरण कर व जमिनीची अकृषक आकारणीबाबत नोटीस पाठविण्यात येत आहे. पात्र खातेदारांनी नोटिशीच्या अनुषंगाने कराचा भरणा केल्यानंतर जमीन मालकांना याबाबतची मानीव अकृषक सनद तत्काळ दिली जाईल. याबाबत जमीन भोगवटदार वर्ग २ (देवस्थान व महार वतन वगळून) असेल याबाबतीत सक्षम अधिकारी यांच्याकडून प्रचलित कायद्याखाली आवश्यक रक्कम भरून पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.
भोर व वेल्हा तालुका हा दुर्गम स्वरूपाचा आहे. त्यामुळे बहुतांश खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर पोटखराबा अ क्षेत्राची नोंद असल्याने भूसंपादन, पीक कर्ज, विविध स्वरूपाचे शासकीय योजनांचे लाभ आदींमध्ये अडचण येत आहे. सदर पोटखराबा अ क्षेत्रचे लागवड योग्य क्षेत्रामध्ये आदेश होऊन त्याचा अंमल ७/१२ उताऱ्यावर करण्यासाठीदेखील या शिबिरामध्ये अर्ज घेतले जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे नि:शुल्क असून या विशेष मोहिमेत सर्व संबंधित शेतकरी खातेदार यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, भोर तहसीलदार सचिन पाटील आणि वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares