‘कोणी निंदो वा वंदो’ – Loksatta

Written by

Loksatta

|| शेषराव मोरे
माझ्या जीवनातील पहिली समाधानाची गोष्ट म्हणजे एक मोठी घटनाच आहे. मुखेड तालुक्यातील जांब या माझ्या जन्मगावात १९४९ला स्थापन झालेली मॅट्रिकपर्यंतची ‘नीती निकेतन’ नावाची संस्थेची शाळा होती. अभिमान वाटावे असे शिक्षक होते. माझे वडील गावचे वतनदार पोलीस पाटील. त्यांचा धाक नि मार एवढा होता की, त्यातून वाचण्यासाठी आणि शिक्षणासाठी मी मॅट्रिकच्या अगदी सुरुवातीलाच वडीलभावाच्या आणि गुरुजींच्या मदतीने गाव सोडून पळून गेलो.
देगलूर या तालुक्याच्या गावी एका खोलीत राहून अभ्यास केला. जेवणासाठी खाणावळ आणि पुस्तके आणण्यासाठी वाचनालयात जाण्याशिवाय मी घराबाहेर पडतच नसे. तेव्हापासून सोळा तास अभ्यास करायची जी सवय लागली ती नंतर सुटली नाही. नांदेड जिल्ह्य़ातून दुसरा क्रमांक आल्याचा निकाल आल्यावर शाळेतील गुरुजींना आणि जांबकरांना किती आनंद झाला म्हणून सांगावा! पण बातमी ऐकून वडिलांच्या रागात मात्र किंचितही फरक पडला नव्हता.
गणित हा माझा हातखंडा विषय असला तरी माझा ओढा सामाजिकशास्त्रांकडे होता. नववीत असताना नरहर कुरुंदकरांचे भाषण ऐकले होते. मॅट्रिकनंतर माझी इच्छा, ते प्राध्यापक असलेल्या, नांदेड येथील पीपल्स कॉलेजात प्रवेश घेऊन इतिहास आणि समाजशास्त्र विषय घेण्याची होती. परंतु शिक्षणाची सोय होण्यासाठी मला नांदेड येथीलच यशवंत महाविद्यालयात आणि विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा लागला. त्या कॉलेजचे प्राचार्य गो. रा. म्हैसकर (नंतर ते कुलगुरू आणि राज्यसभेचे खासदार झाले.) यांनी राहण्या-खाण्यापासून शिक्षणाची व्यवस्था लावून दिली. त्यानंतर माझे औरंगाबाद येथील अभियांत्रिकीचे चार वर्षांचं शिक्षणही त्यांच्याच मदतीने पूर्ण झाले. आर्थिक परिस्थितीमुळे हे सर्व शिक्षण मनाविरुद्ध घ्यावे लागले.
शाळेत असतानाच प्रचंड व्यासंग असणाऱ्या वैजनाथ उप्पे गुरुजींनी आम्हाला इतिहास आणि देशभक्तांच्या अभ्यासाची गोडी लावली होती. देशभक्तांपैकी विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी त्यांना विलक्षण आकर्षण वाटे. त्यांचे क्रांतीकार्य, त्याग, राष्ट्रवाद, धर्मग्रंथांना कालबाह्य़ ठरविणारा बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठा, जात्युच्छेदक समाजक्रांतीचे विचार यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडलेला होता. त्यांच्या प्रेरणांमुळेच इतिहास आणि देशभक्तांची चरित्रे माझ्या अभ्यासक्रमाचा भाग बनला. मी सावरकरांचा अभ्यास करावा हे गुरुजी वगळता अन्य कोणालाही आवडत नसे. सभोवतालचा सारा परिसर काँग्रेसचा बालेकिल्ला. मित्र, आप्त, सगे-सोयरे, शिक्षक-प्राध्यापक- एकूण सर्व समाज सावरकरांविरोधी बोलत असे. सावरकर हे ब्राह्मणवादी आणि हिंदुत्ववादी होते हा तर सर्वाचा समान मुद्दा असे. माझ्या मागे कोणीतरी आरएसएसवाला असला पाहिजे असे काही जण मानत. वस्तुत: वयाच्या विसाव्या वर्षांपर्यंतही आरएसएसवाला ‘दिसतो’ तरी कसा हेसुद्धा डोळ्यांनी पाहिले नव्हते. नंतर जेव्हा त्यांच्यापैकी काहींच्या भेटी होऊ लागल्या तेव्हा सावरकरांचे विचार कोणते आहेत हे त्यांनाच सांगण्याचे काम मला करावे लागे. मान्यता पावलेले सावरकरवादी तर मला कुरुंदकरवादी आणि सावरकरांच्या विचारांचा विपर्यास करणारा ‘बुद्धिवेडा’ (म्हणजे अतिरेकी बुद्धिवादी) म्हणत असत. (एकाने तर माझ्यावर टीका करणारे तसे पुस्तकच ‘हिंदुत्व: दशा आणि दिशा’ लिहिले आहे. इतरांनी सावरकरांविरुद्ध आक्षेप आणि प्रश्न उपस्थित करावेत आणि त्यांच्या उत्तरांसाठी मी अधिकाधिक खोलवर सावरकरांचा अभ्यास करीत राहावे असे घडत गेले. सावरकरांविरुद्धचे आक्षेपांचे ढीग पाहून आणि गुरुजींशिवाय कोणीही मदत करण्यास तयार नसल्याचे पाहून, कोणीही सावरकरांच्या अभ्यासाला दूर सारून मित्रमंडळींचा, सग्यासोयऱ्यांचा आणि समाजातील मान्यवरांचा पक्ष धरला असला असता आणि अधिक सुखाच्या आणि लाभाच्या मार्गाने गेला असता. परंतु कोणत्या भौतिक वा व्यावहारिक लाभापायी वा समाजाकडून निंदानालस्ती टाळण्यासाठी तसे करण्याचा बौद्धिक अप्रामाणिकपणा मी कधी केला नाही, ही माझ्या जीवनातील मोठी समाधानाची बाब आहे.
लग्न झाले तेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागात साहाय्यक अभियंता होतो. मुख्यालय ठाण्याला, तर मी राहायला उल्हासनगरला. दौरे करून दोन दिवसांत आठवडय़ाचे काम केले की पाच दिवस अभ्यासासाठी मोकळे असे कामाचे स्वरूप. तो वेळ मी दादर येथील सावरकर सदनातील हजारो पत्रांचा आणि १९२३ पासूनच्या वृत्तपत्रीय कात्रणांचा अभ्यास करण्यासाठी वापरला. शिवाय मुंबई येथील समृद्ध ग्रंथालयातील ग्रंथ इतर अभ्यासासाठी मिळत असत. प्रश्न केवळ सावरकरांच्या अभ्यासाचाही नव्हता, तर एकूण धार्मिक, सामाजिक आणि राजकीय वास्तव समजून घेण्याचा आणि राष्ट्रीय नेत्यांच्या अभ्यासाचाही होता. त्यासाठी स्थिर नोकरी पाहिजे होती. साडेचार वर्षांनंतर मी अभियंत्यांची नोकरी सोडून दिली. सप्टेंबर १९७६ला तंत्रशिक्षण विभागात अधिव्याख्याता म्हणून नांदेड येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये रुजू झालो.
एकूण अभ्यास केल्यानंतर सावरकरांवर ग्रंथ लिहिण्याची आवश्यकता वाटू लागली. १९८५ पर्यंत ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ हा ५६० पृष्ठांचा ग्रंथ लिहून झाला होता. नांदेडचाच प्रकाशक तयार होता. पण लेखक म्हणून कोणाचे नाव टाकावे हा प्रश्न निर्माण झाला. महाराष्ट्र नागरी सेवानियमांनुसार शासकीय नोकरीत असताना कोणतेही लेखन करता येत नाही – लेखनाची संहिता शासनाकडे पाठवून पूर्वपरवानगी घ्यावी लागते. सावरकरांवर ग्रंथ म्हटल्यावर तर ती परवानगी सरकारकडून मिळणे शक्य नव्हते. नोकरी जाणार हे गृहीत धरूनच मी आधी बाहेरून शासनाच्या पूर्वपरवानगीने एलएलबी करून घेतले. हेतू हा की, नोकरी गेली तर वकिली करता यावी. शेवटी ग्रंथ प्रकाशित करायचे ठरले, पण ते केशवराव मोरे या टोपण नावाने. याच नावाने पुण्याच्या ‘सोबत’ साप्ताहिकात ग्रंथाची पूर्वनोंदणी जाहिरात देण्यात आली. ग्रंथाला ‘सोबत’कार ग. वा. बेहेरे प्रस्तावना लिहिणार होते. त्यांच्या आग्रहामुळे ग्रंथावर खरे नाव टाकायचे ठरले. त्यासाठी मी वकिली डोके लढवून ग्रंथातच ‘प्रकाशनाच्या निवेदना’त असे लिहायला लावले की, ‘शेषराव मोरे हे नाव खरे आहे का टोपण, हे मी तूर्त सांगणार नाही.’ ग्रंथावर माझ्या वडिलांचे नाव नाही, घरचा पत्ता नाही. शासनाकडून कारवाईची नोटीस आलीच तर ‘तो मी नव्हेच’ यासाठी ही तयारी करून ठेवली होती. ग. वा. बेहरे यांनी असाही प्रस्ताव मांडला की, या ग्रंथाचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबईला शिवसेना भवनात झाले पाहिजे. माझे मित्र असलेले नांदेडचे प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी ते कबूल करूनही टाकले. मी घाबरून गेलो. ग्रंथ लिहून चूक केली असे वाटू लागले. पण आता सुटका नव्हती. २८ मे १९८८ रोजी शिवसेना भवनात बाळासाहेबांच्या हस्ते मोठय़ा थाटामाटात ग्रंथाचे प्रकाशन झाले. मी भाषण केले नाही, पण व्यासपीठावर बाळासाहेबांच्या शेजारी बसण्यास मला भाग पाडण्यात आले. जीवनातील पहिलीच पण जन्मभर विसरू नये अशी घटना; पण चेहऱ्यावर आनंद नव्हता. मला भीतीमुक्त आनंद मिळाला तो त्याच्या पुढच्या वर्षी, जेव्हा त्या ग्रंथाला राज्यशासनाचा ग्रंथ पुरस्कार मिळाला. मग मी उघडपणे भाषणे देत फिरू लागलो.
वादग्रस्त विषयावर आणि मुक्तपणे ग्रंथलेखन करायचे तर नोकरीतून मुक्त होणे आवश्यक होते. मिळतील तेवढे निवृत्तिवेतन घेऊन १९९४ला म्हणजे वयाच्या ४५व्या वर्षी सेवेतून मुक्त झालो. १५०० रुपये निवृत्तिवेतन मिळू लागले. दोन मुले आणि एक मुलगी शिकत  होती. वडिलोपार्जित मळ्याची शेतजमीन आणि वाडा विकून टाकला. त्यातून नांदेडला एक घर बांधलं आणि उर्वरित पैशातून ग्रंथ खरेदी आणि काही वर्षांची चरितार्थाची व्यवस्था करून ठेवली – अर्थात नोकरी सोडताना आणि शेत विकताना पत्नीसहित कोणालाही विचारलं नाही
मी लेखक म्हणून भाग्यवान असा की, ‘राजहंस’सारखा गुणग्राहक प्रकाशक मला मिळाला. त्यांनी माझा दुसऱ्या क्रमांकाचा ‘सावरकरांचे समाजकारण..’ हा ७०० पृष्ठांचा ग्रंथ १९९२ मध्ये प्रकाशित केल्यानंतरच नोकरी आणि शेतीमुक्त होण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. त्यांच्यामुळेच मला नावलौकिक मिळाला, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
पण मला ग्रंथलेखनातील सर्वाधिक आनंद दिला तो ‘मुस्लीम मनाचा शोध’ या ग्रंथाने. सर्वाधिक शारीरिक, बौद्धिक आणि मुख्य म्हणजे मानसिक शक्ती खर्च झाली ती या ग्रंथासाठी. इस्लामची मूळ शिकवण सांगणारा ७८४ पृष्ठांचा हा ग्रंथ. विषय नाजूक. अभ्यास म्हणून कोणाही हिंदूने अद्याप हाती न घेतलेला विषय. सावधगिरी म्हणून अगोदर विक्रीसाठी नसणारी अभिप्राय आवृत्ती स्वखर्चाने काढली. मुस्लीम पंडितांना ती इतकी पसंत पडली की, ‘जमाते इस्लामी’ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह पाच पंडितांनी ६१ पृष्ठांचा ‘अभिप्राय’ लिहून ग्रंथ सर्वासाठी प्रसिद्ध करण्याचा आग्रह धरला. शंभर प्रतींची माझ्याकडे आगाऊ नोंदणीही केली. त्यानतंर त्या संपूर्ण ‘अभिप्राया’सह ग्रंथ सर्वासाठी प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘‘एका बिगर-मुस्लीम व्यक्तीने अथक परिश्रम करून, इस्लामवरील शेकडो गं्रथ विकत घेऊन वाचून हा अभ्यासपूर्ण ग्रंथ सादर केलेला आहे, त्याचा आदर करावा. मुस्लीम विचारवंतांना आणि विद्वानांनाही इस्लामचा अधिक खोलवर आणि चिकित्सक अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ कारणीभूत ठरावा. बिगर- मुस्लिमांनी इस्लामचा अभ्यास करावा अशी आपली इच्छा असेल तर अशा अभ्यासू ग्रंथाचे आपण स्वागत आणि कौतुक करून त्यांना उत्तेजन दिले पाहिजे.’’ या ग्रंथाला नंतर महाराष्ट्र शासनाचा ग्रंथ पुरस्कार मिळाला आणि त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध झाले. मुस्लीम पंडितांचा हा अभिप्राय माझ्या जीवनातला मोठय़ा आनंदाचा भाग आहे. पण या आनंदाबरोबरच दु:खही माझ्या वाटय़ाला आले. अनेक हिंदूंकडून आणि विशेषत: हिंदुत्वनिष्ठां कडून माझी ‘मौलवी’ वगैरे म्हणून लेखी आणि तोंडी संभावना करण्यात आली. काहींनी पाने फाडून ग्रंथ परत केले मात्र नंतर पश्चाताप होण्यासाठी त्यांना पूर्ण ग्रंथ वाचण्याची वेळ आली!
सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचून आठ-नवव्या वर्गापासूनच मी बुद्धिवादी बनत चाललो होतो. वडिलांच्या भीतीमुळे घरातून पळून गेल्यावर तर मी देव-धर्माचे बंध पूर्ण तोडून टाकले. सर्वच धर्मग्रंथ कालबाह्य़ झाले असे मानत आणि उघडपणे सांगत आलो. कायद्याच्या गरजेपलीकडचा कोणताच विधी माझ्या लग्नात करू दिला नाही. लग्नानंतर जेवण झाल्यावर मी एकटाच एस.टी. बसने लातूरहून जांबला निघून आलो आणि घरी अभ्यास करीत बसलो. नवरी आणि वऱ्हाड नंतर आले. घराची वास्तुपूजा केली नाही, आई-वडिलांचे श्राद्ध केले नाही.
शेती होती तोवर ‘शेतकरी’ मासिक समोर ठेवून आणि प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवून शेती केली. त्या भागात मी शेतकऱ्यांचा मार्गदर्शकच होतो. नांगर सोडून शेतीची सर्व कामे केली आहेत.  घर बांधण्यापलीकडे गेल्या किमान तीस वर्षांत घरातील कोणतेच काम मी केले नाही. सर्व जबाबदारी पत्नीची. आमच्या दोन मुलांची आणि एका मुलीचे लग्न झाले. मोठय़ा मुलाच्या लग्नात लग्नपत्रिका वाटण्याशिवाय अन्य काम केले नाही. मुलीच्या लग्नसमारंभाची जबाबदारी आमच्याकडे होती. पत्नीने तिच्या लातूरच्या भावाला सांगून लातूरलाच कार्यक्रम करून सर्व जबाबदारी पार पाडायला लावली. मी एखाद्या पाहुण्यासारखा तेथे गेलो होतो.
तिन्ही मुलांना शाळेत आणि कॉलेजमध्ये प्रवेश देताना मी सोबत गेलो, पण पुन्हा तिकडे कधीही फिरकलो नाही. मुलीची मॅट्रिकची परीक्षा सुरू होऊन दोन पेपर झाल्यावर मला तिची परीक्षा चालू असल्याचे कळले. तिला विचारता ती म्हणाली की, ‘‘रोज परीक्षेला जाताना मी तुमच्या पाया पडण्यासाठी येते. तुम्ही लिहितच टेबलाच्या बाजूला पाय करता. मी पाया पडते. तुम्ही माझे बोलणे पूर्ण ऐकूनच घेत नाही.’’ आनंदाची गोष्ट अशी की, असला बाप असतानाही वडील मुलगा न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), लहान मुलगा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक, मुलगी (आणि जावईही) न्यायाधीश (सध्या दोघेही साहाय्यक धर्मादाय आयुक्त) आहेत. दोन्ही मुलांना प्रत्येकी एक मुलगा, एक मुलगी तर मुलीला दोन मुली आहेत. दृष्ट लागावा असा जीवनप्रवास चालू आहे.
सप्टेंबर २०१५ मध्ये अंदमान येथे अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली.  पुणेकरांनी बालगंधर्व मंदिरात माझा भव्य सत्कार घडवून आणला. नांदेडकरांनीही भव्य सत्कार घडवून आणलाच, पण त्यांतही मला भारावून टाकणारी गोष्ट म्हणजे दोनशेपेक्षा अधिक नांदेडकर बंधू माझ्या पाठीवर थाप मारायला साक्षात अंदमानला आले होते. माझ्या जांब या जन्मगावाने केलेला सत्कार स्वप्नात घडावा असा झाला.
नरहर कुरुंदकरांप्रमाणेच डॉ. ना. य. डोळे यांनाही मी गुरूस्थानी मानीत आलो. शेवटच्या काळात डोळेसरांनी पत्रात आणि नंतर उदगीरच्या भेटीत सांगितले होते की, ‘शेषराव तुम्ही एवढे बुद्धिवादी, पुरोगामी, डावे; परंतु तुम्ही एक फार मोठी चूक केली आहे. तुम्ही सावरकरांची बाजू घेण्याच्या प्रयत्नांत महाराष्ट्रातील अनेक श्रेष्ठ आणि मान्यवर बुद्धिवादी आणि समाजवादी विचारवंतांवर कठोर टीका केली आहे. ते आता कायम तुमच्याविरोधी झाले आहेत. तुम्हाला मान्यता, प्रसिद्धी वा पुरस्कार पुरोगामी विद्वानांकडूनच मिळू शकले असते. तुमच्या लेखनाने अप्रत्यक्षपणे उजव्या विचारसरणीला पाठबळ मिळाले आहे. उजव्यांना तर तुमचे विचार पटणारच नाहीत. तुम्ही मोठे नुकसान करून घेतलेले आहे.’ असे ते म्हणाले होते. ‘मुस्लीम मनाचा शोध’ ग्रंथ वाचून सर्वात आधी त्यांनी माझे मन:पूर्वक अभिनंदन केले होते (ते पत्र ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत छापले आहे.). उदगीरला त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘काश्मीर’ विषयावर माझे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दोघांनीही काश्मीरवर ग्रंथ लिहिले होते. पण त्यांतील निष्कर्ष मुळीच जुळणारे नव्हते. ‘सर, माझे कान तुमच्या हातात दिले आहेत, चुकले असेल तर गुरू म्हणून आता सांगा,’ असे म्हणून मी व्याख्यान संपविले. यावर सर म्हणाले की, ‘‘तुम्ही जे मांडलेले आहे ते सत्य आहे. पण मी अधिक पावसाळे पाहिले आहेत. तेव्हा एवढे सत्य उघडपणे सांगणे बरोबर नसते.’’ (ही आठवण‘काश्मीर’ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत नमूद केली आहे.)
पुरोगामी विचारवंतांवर मी टीका केल्यासंबंधात डोळेसर म्हणतात ते खरे आहे. पण माझी भूमिका कोणाकडून मान्यता वा कोणते पुरस्कार मिळावेत ही नव्हतीच. बुद्धीला प्रामाणिकपणे सत्य वाटेल ते मांडावे या शुद्ध हेतूने मला सावरकरांवर ग्रंथ लिहावे लागले आणि अपरिहार्यपणे त्यांच्या विचारांचा विपर्यास करणाऱ्यांवर नावे घेऊन टीका करावी लागली. हे खरे आहे की, काही मोठय़ा माणसांच्या (मग ते राजकारणी असोत की साहित्यिक) आपल्यावर वरदहस्त असावा. त्याची कृपा असावी असे मला कधी वाटलेच नाही. ते माझ्या स्वभावातच नाही. महाराष्ट्रात पुरोगामी-प्रतिगामी, डावे-उजवे अशा दोन छावण्या आहेत याचा लेखन करताना मी कधी विचारसुद्धा केला नाही. ग्रंथ न वाचताच शिक्के मारले जातात, हे मला खूप उशिरा कळले. अनेक जण म्हणतात की, मी पहिला ग्रंथ सावरकरांवर लिहायला नको होता. माझ्या विचारांना सावरकरांचे नाव चिकटले आणि सारा ब्रह्मघोटाळा झाला!  सावरकरांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मी पुढे आलो नि त्या प्रयत्नांत मीही गैरसमजाचा शिकार बनलो. पण जीवनात श्रेयस्कर काय? डावी वा उजवी झापडबंद टोपी घालून पोथीनिष्ठ विचारवंत बनणे, का ‘कोणी वंदो वा निंदो’ असे म्हणत आपल्याला सत्य आणि राष्ट्रहिताचे वाटणारे विचार मुक्तपणे मांडत राहणे? तेच करीत आलो आहे आणि त्यासाठीच परमसुखी आहे.
माझ्या जीवनातील श्रेयस आणि प्रेयस हे असे आहे!
chaturang@expressindia.com
मराठीतील सर्व श्रेयस आणि प्रेयस ( Shreyas-ani-preyas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares