परतवारीचे हृद्य अनुभवकथन – Loksatta

Written by

Loksatta

पंढरीच्या वारीनंतर माघारी येणाऱ्या परतवारीतील अनुभव कथन करणारे ‘परतवारी’ हे सुधीर महाबळ लिखित पुस्तक. मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकास अरुण साधू यांनी लिहिलेली ही प्रस्तावना..
आळंदी-देहू येथून (व महाराष्ट्रातील आणखी काही संतांच्या स्थानांहून) ज्ञानोबा-तुकोबा व त्या- त्या ठिकाणच्या संतांच्या पालख्या घेऊन वीस-बावीस दिवस पायी चालत या वाऱ्या आषाढी एकादशीच्या आदले दिवशी पंढरपुरास पोचतात. तीन दिवसांनी गुरुपौर्णिमेस त्या परत निघून आल्या मार्गाने आळंदी-देहूस केवळ दहा दिवसांनी पोहोचतात. आषाढी एकादशीस पांडुरंगाचे दर्शन घेऊन हजारो-लाखो वारकरी लगबगीने मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी रवाना होतात. पालख्या मात्र पायवारी करीतच परत निघतात. मार्ग तोच, पण परतीचे मुक्काम कमी. काही मुक्कामाची गावं वेगळी. म्हणजे जाणाऱ्या वारीपेक्षा परतवारीची चाल खूपच वेगवान असते. दोन मुक्कामांमधील अंतर जास्त असते. महाबळ म्हणतात, ‘‘लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात जाणाऱ्या पालख्या पाहताना जी ऐश्वर्यवारी वाटते तीच परतताना मात्र जेमतेम काही शेकडा वारकऱ्यांच्या साथीनं येताना वैराग्यवारी वाटते. जेवणाखाण्याची, झोपण्याची आणि एकूणच जशी सोय जाताना होते, तशी परतताना जवळजवळ नसतेच. जसे जमेल तसे वारकऱ्यांनी राहावे.’’ महाबळांनी एक वर्ष ऐश्वर्यवारी केल्यावर त्यांना परतवारीची चूस लागली. गेली दहा वष्रे ते आपले सारे व्याप सांभाळून नियमाने वैराग्यवारी- म्हणजे परतवारी करीत असतात.
या पुस्तकात सुधीरने मुख्यत्वे २००६ च्या परतवारीचे अनुभव नोंदविले आहेत. म्हणजे ही तारीखवार कोरडी डायरी नव्हे. लेखकाच्या कोणत्याही प्रदीर्घ अशा मन:पूर्वक लिखाणातून- मग ते वर्तमान राजकारण असो की इतिहास-तत्त्वज्ञान, की अर्थव्यवहार- वण्र्य विषयाबरोबर बऱ्याच प्रमाणात त्याचे व्यक्तिमत्त्वही वाचकांसमोर उभे राहतेच. ती त्या लेखनाच्या प्रामाणिकपणाची कसोटी मानायला हवी. स्वत:चे अनुभव किंवा आत्मचरित्रात्मक असे काही असेल तर ते अध्याहृत समजावे लागेल. सुधीर महाबळ या कसोटीला पुरेपूर उतरतात, ही वाचकांना समाधान देणारी गोष्ट. वारकरी विठ्ठलाला नवसाचा देव मानत नाहीत. विठ्ठलाला काही मागायचे म्हणून त्यांची ही खडतर तपश्चर्या नसतेच. किंबहुना, वारकरी कोणालाच काहीही मागत नसतात. राग, लोभ, वासना, इच्छा, चिंता काहीही मनात न ठेवता केवळ शून्य अशा आनंदाच्या निर्विकल्प अवस्थेत त्यांना विठूमाऊलीच्या चरणांवर मस्तक ठेवायचे असते. ते न जमले तर निदान दुरून मुखदर्शन किंवा कळसदर्शन तरी. कट्टर निरीश्वरवाद्यानेही हेलावून जावे अशी अनाकलनीय भावावस्था. अशा या शेतकऱ्यांचे प्रभुत्व असलेल्या लक्षावधी निरिच्छ सश्रद्धांच्या वारीसोहळ्याचा अनुभव घेताना महाबळ लीनपणे वारकऱ्यांच्या अनाम श्रद्धेला समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतातच. त्याचबरोबर यासंदर्भात ठायी ठायी ते स्वत:चा शोध घेण्याचा, स्वत:ला समजून घेण्याचा मनस्वी प्रयत्न करताना दिसतात. स्वत:च्या श्रद्धेची जातकुळी तपासताना दिसतात. या अवस्थेत पाखंडी, निरीश्वरवादी, सश्रद्ध, ईश्वरवादी हे भेद गळून पडतात. श्रद्धा व वैज्ञानिक तर्कवाद यांमधील कुंपणावर रेंगाळणारी संभ्रमित अवस्था विरून जाऊन त्या क्षणी इंजिनीअर महाबळ व टिळे लावून हाती पताका घेऊन टाळांच्या साथीने विठूनामाचा गजर करीत पायवारी करणारा अशिक्षित शेतकरी वारकरी यांच्यातही भेद उरत नाही.
हा जो परतवारीच्या अनुभवांवर मन:पूर्वक ग्रंथ लिहिला आहे तो वाचून बहुतेकांना वाटू शकेल, की त्याच्या या वारीप्रेमाचा स्रोत अंत:करणातील गाढ श्रद्धेतच आहे. सुधीरने वारकऱ्याची माळ गळ्यात घातलेली नाही. तसे सगळेच वारकरी माळ घालून, टिळा लावून, पताकेची काठी हाती धरून वारी करतात व आयुष्यभर माळकऱ्याचे यमनियम पाळत राहतात असेही नाही. हजारो लोक नुसतेच िदडय़ांमध्ये सामील होऊन हरिनामाचा गजर करीत श्रद्धेने वाऱ्या करतात. सुधीर ठाम निरीश्वरवादी नाही. पण पुस्तकात तो बऱ्याच ठिकाणी ज्ञानोबांच्या ओळी उत्स्फूर्तपणे उद्धृत करतो. आणि त्याच्या एकंदरच अनुभवकथनावरून वाटते की, ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील जो विश्वात्मक देव आहे तोच विज्ञानाधिष्ठित असा सुधीरचाही. सर्व प्राणिजातांसाठी, जीवांसाठी मत्र निर्माण करणारा देव. मनुष्यमात्रातील दुष्टावा नष्ट करून सर्वत्र प्रेमाची पाखर करणारा असा निराकार किंवा विश्वाकार देव. हा ज्ञानेश्वरांचा मानवतावाद किंवा वैश्विक जीववाद म्हणावे, हवे तर. कित्येक शिक्षित किंवा निरक्षर वारकऱ्यांना हाच देव मनोमन उमजलेला असतो व हे अव्यक्त रहस्य ते हृदयात जपून ठेवतात. कारण त्यांना स्पष्टोच्चारण नसते. विठूमाऊली हे केवळ त्याचे प्रतीक. आणि मूर्तीचे दर्शन ही दुय्यम गोष्ट. म्हणून तर मूर्तीच्या पायावर डोके ठेवता नाही आले, किंवा मुखदर्शन नाही झाले तरी काही बिघडत नाही. कळसदर्शनावर त्यांचे समाधान होते. कित्येक वारकऱ्यांशी अनौपचारिक गप्पा करताना त्यांची विलक्षण अशी गाढ निरिच्छ वृत्ती सुधीरने नोंदविली आहे. वर लिहिल्याप्रमाणे, कोणाकडेही काहीच मागायचे नाही. देवाकडेही नाही. तहान-भुकेपुरते मिळाले तर आनंद. नाही मिळाले तर दु:खही नाही.
सुधीरने कायमवारी करण्याच्या आश्चर्यकारक प्रथेबद्दल लिहिले आहे. त्यालाही आधी हे माहीत नव्हते. कायमवारी करणे म्हणजे कुटुंब, संसार, प्रपंच सारे सारे त्यागून त्यांचे काहीही बंधन न मानता फक्त आळंदी-पंढरपूर व पंढरपूर-आळंदी वाऱ्या तिथीनुरूप करीत राहणे. (असेच देहू-पंढरपूर ही कायमवारी करणारेही आहेत.) शिवाय वारकऱ्याची पथ्ये पाळताना (भिक्षा मागायची नाही, वगरे) गळ्यात कायम तुळशीमाळ ठेवायची. या गळ्यातील तुळशीमाळेला कायम-वारकऱ्यांच्या दृष्टीने एक विशेष सांकेतिक अर्थ आहे. मृत व्यक्तीच्या देहावर तुळशीपत्र ठेवतात. त्याचप्रमाणे संपत्तीचे दान करताना ‘इदं न मम्’ (हे माझे नाही) असे म्हणत त्यावरही तुळशीपत्र ठेवून पाणी सोडतात. असे हे कायम-वारकऱ्याने आपल्या संसारावर व देहावर तुळशीपत्र ठेवलेले असते. शरीराच्या घामाने त्यावर पाणी सोडण्याचा सोपस्कार पूर्ण होतो. असा हा आयुष्यात आता काहीच ईप्सित वा इच्छा न ठेवणारा विलक्षण कायम-वारकरी. देहत्याग वज्र्य असल्याने शून्यवत जगणारा. लंबकासारखा निरुद्देश फेऱ्या मारणारा. तो तर आधीच मनाने त्या विश्वदेवाशी विलीन झालेला आहे. सुधीरने या कायम-वारकऱ्यांचे मोठे भेदक वर्णन केले आहे.
वारकरी संप्रदायाच्या काही तात्त्विक धारणा व त्याचे मूर्तिरूपी परमेश्वराविषयीचे औदासीन्य, तसेच निराकार, निर्गुण अशा परमेश्वराची आधुनिक भौतिकशास्त्रालाही पचू शकेल अशी संप्रदायाने अव्यक्त ठेवलेली संकल्पना यासंबंधी काही निष्कर्ष वर काढले आहेत. ते सुधीरला न विचारता स्वतंत्रपणे त्याच्या या अनुभवकथनातून काढता येतात. आत्मकथन इतके प्रांजळ आणि मनाच्या तळातल्या निष्कलंक घुसळणीतून आले आहे, की वाचकाच्या निष्कर्षांला लेखकाच्या पुष्टीची गरज नाही. एखाद्या चांगल्या कवितेचा संवेदनशील वाचकाला मन:पूर्वक भावतो तोच खरा अर्थ. कवीने नाकारला तरी. असो. ना. ग. गोरे हे तर्ककठोर निरीश्वरवादी. मित्राबरोबर पंढरीला गेले असताना विठोबापुढे माथा टेकताना डोळ्यांतून अश्रू पाझरू लागले. मित्राने छेडले तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्या एका लेखात पुष्कळ वर्षांपूर्वी वाचलेले आठवते. त्याचा मथितार्थ असा की, हजार वर्षांत कोटय़वधी वारकऱ्यांनी तीन-चारशे मलांची पायपीट केली ती या दगडाच्या मूर्तीसमोर क्षणभर माथा टेकवण्यासाठी. त्या अफाट श्रद्धेचा हा मूलस्रोत. त्यासमोर नतमस्तक होताना कोणीही हेलावून जाणे हे माणूसपणाचे लक्षण नव्हे काय? त्याचाच विस्तार करून असेही म्हणता येईल की, या अब्जावधी भक्तांनी विठोबाच्या पायाशी वाहिलेल्या ऊर्जेचे तरंग इथे येणाऱ्या कोणासही- ज्याला वारीसंस्कृतीची आणि तिच्या केंद्रस्थानी असलेल्या विठ्ठल या संकल्पनेची अंतस्थ जाण आहे व जो या संस्कृतीशी सन्मुख अथवा अनुरूप किंवा कम्पॅटिबल (compatible) आहे, त्याला- भारावून टाकल्याशिवाय राहणार नाही.
सुधीर या लिखाणात नुसतीच वारीत, परतवारीत भेटलेल्या भाबडय़ा, बेरक्या, हसऱ्या, अफलातून, पण सश्रद्ध अशा वारकऱ्यांची हृदयस्पर्शी व्यक्तिचित्रे पेश करतो, काही चटका लावणाऱ्या प्रसंगांचे मनाला भिडणारे वर्णन करतो, असेच केवळ नव्हे; किंवा कधी वाटेत दिसणाऱ्या निसर्गाच्या विविध विभ्रमांची अप्रतिम जादू भारावून जाऊन कसलेल्या लेखकाप्रमाणे वाचकांसमोर खुली करतो असेही फक्त नव्हे. तर हे सर्व करताना तो स्वत:शीच बोलत असतो असा सतत भास होतो. या स्व-संवादाचा साराच तपशील वाचकांना लिखाणातून ऐकू येतो असे नव्हे. पण या अव्यक्त अभिव्यक्तीमधूनच तर या संवेदनशील, जिज्ञासू इंजिनीअरच्या कविहृदयाचे व सश्रद्ध अंत:करणाचे वाचकांना दर्शन घडते. म्हणून पुन:पुन्हा या विषयावर यावे लागते. पुस्तकाच्या ‘पूर्वरंग’मध्ये लेखक लिहितो, ‘‘..वारीतून चालत असताना खूपदा असं वाटे की, मी हे का करतोय? कुणीतरी सांगितलं म्हणून? माझी शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमता सिद्ध करण्यासाठी? उत्तर मिळेल की नाही.. मला हे कुणालाच सिद्ध करून दाखवायचं नाही. पण यातून एक अवर्णनीय आनंद मिळतो आहे, हे खरं.. मग हा स्व-संवाद वेगवेगळी वळणे घेत राही..’’ या आनंददायी स्व-संवादाचे तसेच वारकरी, वाटेतील गावकरी, निसर्ग, प्राणी आणि खुद्द माऊलीच्या रूपातील परमेश्वर यांच्याशी लेखकाने साधलेल्या संवादाचं सुंदर संकलन म्हणजे हे पुस्तक असंही म्हणता येईल.
भारतातील पुष्कळ विज्ञाननिष्ठांची अशीच द्विधा मन:स्थिती असावी. आणि तेही फार आश्चर्याचे नाही. भारताबाहेरदेखील असेच दिसेल. अणुऊर्जा आयोगातील कित्येक शास्त्रज्ञ घरी पूजा आटोपून कपाळावर भस्माचे पट्टे ओढून आपल्या प्रयोगशाळेत जातात, हे सर्वज्ञात आहे. घरी नवी कार किंवा स्कूटर आणली की तिला आधी हार, उदबत्ती वाहून नारळ फोडल्याशिवाय भारतीय माणूस तिला वापरात काढत नाही. नव्या फॅक्टरीची यंत्रणा सुरू करण्यापूर्वीही हाच प्रकार. छोटे-मोठे चमत्कार तर आपण रोजच ऐकतो. या विश्वाचा निर्माता म्हणून कोणती तरी परमेश्वरासारखी अंतिम शक्ती असणारच, यावर पुष्कळांचा विश्वास असतो. अवघ्या विश्वाला एकाच सोप्या समीकरणाच्या कवेत घेण्याची आकांक्षा धरणारे आइनस्टाईनदेखील थोडेसे याच वर्गातले. पण एवढय़ा दूर जायला नको. आपला लेखकही त्यांच्याच वर्गातला असे म्हणावयास काय हरकत आहे? तो अंधश्रद्ध नाही, हे नक्की. ज्ञानेश्वरांनी ज्याचा पाया घातला आहे अशा, ज्ञानाचे महत्त्व कमी न करता निखळ कामनाविरहित डोळस श्रद्धेला (भक्तीला) आपल्या जीवनात स्थान देणाऱ्या संप्रदायाचा तो आधुनिक पाईक आहे, असे हे पुस्तक वाचल्यानंतर म्हणायला काही हरकत नाही. कठोर तर्कवादासह कडवा निरीश्वरवाद एका बाजूला व दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा व अंधभक्ती यांच्या मधला मार्ग काढणारा डिजिटल पिढीचा तो विज्ञाननिष्ठ प्रतिनिधी आहे असेही म्हणता येईल.
महाराष्ट्रातील पुष्कळ विद्वान (त्यात काही सश्रद्ध धर्माभिमानीही आहेत!) वारीच्या प्रथेवर सडकून टीका करतात. शेतीच्या ऐन मोसमात घरदार सोडून रिकामटेकडय़ांसारखे टाळ कुटत जत्रा करणारे, समाजाला भार ठरणारे निरुद्योगी, बेजबाबदार लोक अशी त्यांची संभावना करतात. हे पुस्तक वाचल्यावर निदान आमच्यासारख्या फुटकळ, पण कडव्या नास्तिकांची तरी पुन्हा असे म्हणण्यास जीभ धजावणार नाही. या वारीतही विश्वरूपदर्शनासारखे अगम्य, अतक्र्य, अदृश्य असे काहीतरी मिळते- की ज्यामुळे तुम्हा-आम्हालाही त्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटेल.
मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares