पाऊस झाला दुप्पट, सव्वा पाच लाख शेतकऱ्यांचे नुकसान – Lokmat

Written by

Latest Marathi News | लोकमत / Lokmat Marathi newspaper | Live Marathi Batmya | ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com
हिंदी | English
शुक्रवार १६ डिसेंबर २०२२
FOLLOW US :

शहरं
मनोरंजन
व्हिडीओ
सखी
आणखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 11:10 AM2022-08-05T11:10:13+5:302022-08-05T11:15:09+5:30
 नागपूर : नागपूर विभागात जुलै महिन्यात सरासरी ३६०.१० मिलीमीटर पाऊस पडतो. यावर्षी प्रत्यक्षात ६८४.२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे ५ हजार ४३५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली. तब्बल सव्वा पाच लाख शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. ७३ व्यक्तींचा मृत्यू झाला, असा नुकसानीचा आढावा विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केंद्रीय पथकासमोर मांडला.
केंद्रीय पथकाने विभागातील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन या नुकसानीसंदर्भात पाहणी केली. यासंदर्भात गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हानिहाय नुकसानीचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला. या पथकामध्ये नॅशनल इंटेलिजन्स ग्रीडचे सहसचिव राजीव शर्मा, जलशक्ती विभागातील संचालक हरिश उंबरजे, ऊर्जा मंत्रालयाच्या संचालिका मीना हुडा, ग्रामविकास विभागातील संचालक माणिक चंद्र पंडित, वित्त विभागातील उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागातील संचालक ए. एल. वाघमारे, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागातील देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता.
मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला (नागपूर), अजय गुल्हाने (चंद्रपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), संदीप कदम (भंडारा), संजय मीना (गडचिरोली) या जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (नागपूर), डॉ. सचिन ओम्बासे (वर्धा), विनय मून (भंडारा), अनिल पाटील (गोंदिया), कुमार आशीर्वाद (गडचिरोली) उपस्थित होते.
असे झाले नुकसान
– विभागातील सहाही जिल्ह्यातील ६२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे ५ लाख २५ हजार ७५९ शेतकऱ्यांच्या ४ लाख ७७ हजार ६४ हेक्टर क्षेत्रांवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर यासह इतर खरीप पिकांचा समावेश आहे.
– ५ हजार ४३५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातील पिकांची तुलनेने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
– १८६ पाणीपुरवठा योजना, रस्ते, आरोग्य सुविधा आदींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
केंद्राने तत्काळ मदत करावी : प्रधान सचिव
– अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांना दुबार पेरणी, खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीसाठी केंद्राने तत्काळ मदत करावी, अशी मागणी प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी केली.
केंद्राला अहवाल सादर करणार : राजीव शर्मा
– शेतपिकांसह घरे, रस्ते, सिंचन प्रकल्प आदी विविध पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय पथकाने नुकसानीसंदर्भात आढावा घेतला असून केंद्र सरकारला सविस्तर अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा सहसचिव राजीव शर्मा यांनी यावेळी दिली.
FOLLOW US :

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares