आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये १४४. १२ लक्ष लसी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वासिम, जालना, नंदुरबार, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील सुमारे १३९.४२ लाख जनावरांना मोफत लसीकरण केलेले आहे, अशी माहिती नाशिक पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डाॅ. बी. आर. नरवाडे यांनी दिली. गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर जनावरांच्या समस्या व त्यावरील उपाय या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बाेलत हाेते.
यावेळी अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, हेस्टर बायोसायन्सेस कंपनीचे सहयोगी संचालक राज रुघवाणी, विभागीय विक्री व्यवस्थापक अमित हरिश्चंद्रे, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक राजेंद्र रोकडे, कोपरगांव येथील पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गोदावरी दूध संघ परिवार व दूध उत्पादकांच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले.
लस मिळवण्यासाठी यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेत मोफत लस उपलब्ध करून दिली. डॉ. नरवाडे म्हणाले, राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तीक पशुपालकांनी करुन घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शंभर टक्के लसीकरण झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अर्थात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. कार्यक्रमासाठी गोदावरी दूध संघाचे संचालक, दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्थांचे प्रतिनिधी, बायफ संस्थेचे अधिकारी, पशु चिकित्सक उपस्थित होते. अनेकांनी आपल्या समस्या मांडून शंकांचे निरसन करुन घेतले. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

Article Tags:
news