प्राणी पाळण्याचे हे 10 फायदे असतात… – BBC

Written by

फोटो स्रोत, Getty Images
कुत्रे पाळा, आजार टाळा
एखाद्या घराच्या प्रवेशद्वारावर 'कुत्र्यापासून सावधान' अशी पाटी वाचली की अनेकांना त्या घरात जाण्याआधीच धडकी भरते.
कोणाच्या घरी मांजर पाळलेलं असलं की घरी आलेल्या पाहुणे मंडळींचं अर्ध लक्ष ते मांजर जवळ तर येत नाही ना, याकडेच असते. एकूण काय तर प्राणी पाळायचा म्हटलं की अनेकजण नाकं मुरडतात. मात्र हेच प्राणी निरोगी असं दीर्घायुष्य देऊ शकतात, असं सांगितलं तर… 
आता हे सिद्ध झालं आहे की आपल्या घरात पाळलेला प्राणी आपलं आयुष्य तणावमुक्त बनवतो. प्राणी पाळण्याचे आणखी काय काय फायदे आहेत, बघूया…
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की पाळीव प्राण्यासोबत खेळताना आपल्या शरीरात ऑक्सीटोसीन तयार होत असतं. हे हॉर्मोन मेंदू शांत होण्यास मदत करतं. त्यामुळे चिंता आणि ताण कमी होतो.
फोटो स्रोत, Getty Images
इतकंच नाही तर शरीरात ऑक्सिटोसीन तयार होत असल्याचं प्राण्यांनाही जाणवतं. त्यामुळे मनुष्य आणि प्राणी यांच्यात घट्ट नातं तयार होण्यास मदत होते. 
प्राणी पाळणाऱ्यांमध्ये कॉर्टीसॉल या स्ट्रेस हॉर्मोन्सची पातळी कमी असल्याचंही अभ्यासात आढळलं आहे. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता कमी होते.
प्राणी म्हटलं की त्याला जेऊ घालणे, त्याचं संगोपन करणे, त्याच्यावर माया करणे हे आलंच. या सर्वांसाठी पाळणाऱ्याला त्याच्याबरोबर बराच वेळ घालवावा लागतो.
यामुळे आपोआपच क्वचितच एकटेपणा जाणवतो. अनेकांनी तर सांगितलं आहे की घरी असलेल्या प्राण्याबरोबर त्यांचं मैत्रीचं घट्ट नातं तयार होतं. सहचर्याची भावना वाढते. आनंदी वाटतं आणि त्यांच्या हालचालीचं कुतूहल वाटतं.
प्राण्यांच्या सहवासात आपण आनंदी का असतो, याचा आता वैज्ञानिक पुरावादेखील आहे. प्राण्यांसोबत चांगला वेळ घालवल्याने मन प्रफुल्लीत करणारे सेरॉटॉनीन आणि डोपॅमाईन हे हॉर्मोन्स तयार होतात. 
फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेत हत्तीला आंघोळ घालणारा मुलगा
हे सर्व बघता प्राणी पाळणाऱ्यांना नैराश्य येण्याची शक्यता कमी असते, असं म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको. 
सतत प्राण्यांची देखभाल करणाऱ्यांमध्ये भावनांवर नियंत्रण राहण्याबरोबरच, सामाजिक भान आणि स्वाभिमान या भावना वृद्धिंगत होतात. 
सजीव प्राण्याशी जबाबदारीने वागल्याने लहान मुलांवरही चांगले संस्कार होतात. ते अधिक जबाबदार बनतात. त्यांना शिस्त आणि चांगल्या सवयी लागतात.
आपण थकलेलो असू किंवा आपली इच्छा नसेल, मात्र घरी प्राणी आहे आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी आपल्यावर असेल तर मग आपण अधिक कनवाळू बनतो. त्यावेळी आपण 'मला काय हवं', याचा विचार करत नाही.
फोटो स्रोत, Getty Images
मुलांना प्राण्यांची काळजी घ्यायला सांगा. त्यांच्या आरोग्यासाठीही ते बरं आहे
बाळ मोठं होताना अॅलर्जी होऊ शकेल अशा वातावरणात वाढलं तर दमा होण्याची आणि नाक गळणे, शिंका येणे, घशात खवखव अशा प्रकारच्या अॅलर्जी होण्याची शक्यता कमी होत असल्याचं आता सिद्ध झालं आहे. 
त्यामुळे प्राण्यांसोबत बालपण घालवणं केवळ उत्तम मानसिकच नव्हे, तर उत्तम शारीरिक आरोग्यासाठीही हितकारक आहे.
फोटो स्रोत, Getty Images
कुत्र्याला फेरफटका मारायला न्या
पाळीव प्राण्याचा सांभाळ करणं मेहनतीचं काम असलं तरी त्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं. 
कुत्र्याला किंवा मांजराला फिरायला नेणं असो, मेंढ्यांना चरायला नेणं असो किंवा हत्तीला आंघोळ घालणं असो, प्राणी आपलं शरीर सक्रीय ठेवण्यास मदत करतात.
ज्यांच्या घरी कुत्रा आहे आणि जे त्याची रोज काळजी घेतात, त्यांचं शरीर सक्रीय असतं आणि कुत्रा नसलेल्या लोकांपेक्षा त्यांचा बांधा चांगला असतो, असं अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका अभ्यासात आढळलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
उंटाची काळजी कशी घ्यायची?
बाळाची काळजी घेणं, त्याचं संगोपन ही केवळ स्त्रीची जबाबदारी असल्याचा समज आहे. मात्र घरातील, शेतातील किंवा व्यावसायिक कामासाठीच्या प्राण्यांची काळजी ही बरेचदा पुरूषच घेतात. त्यामुळे त्यांना एकप्रकारे पालकत्वाचा आनंद मिळतो. 
फोटो स्रोत, Getty Images
तुमचा पेट अनेकदा तुम्हाला एकटेपणा घालवण्यात मदत करतो
कुत्र्यांची घ्राणेंद्रीय क्षमता मानवापेक्षा दहा हजार पट अधिक असते. म्हणजेच जे वास आपल्याला येत नाहीत, असे अतिसूक्ष्म वासही त्यांना येतात. त्यामुळेच ब्रिटीश ऑर्गनायशेझन मेडिकल डिटेक्शन डॉग्ज ही संस्था कुत्र्यांना कर्करोगासारख्या मानवी आजारांचा गंध ओळखण्याचं प्रशिक्षण देते. 
त्यामुळेच रुग्णाच्या शरीरातून येणारा वास बदलला की कुत्र्याला ते लगेच कळतं. शिवाय एखाद्याला कर्करोग आहे की नाही, हेसुद्धा तो ओळखू शकतो. त्यामुळे आजाराचं वेळेत निदान होऊन रुग्णाला योग्य उपचार मिळू शकतात. 
एखाद्याला फिट येणार असेल, तर तेही कुत्र्याला आधीच कळतं. इतकंच नाही तर मधुमेह आहे की नाही, हेसुद्धा कुत्र्याला समजतं. 
फोटो स्रोत, Getty Images
हत्तींना अनेकदा धोक्याची चाहूल आधीच लागते
कुत्रा म्हणजे राखणदार… घर असो की शेत अनोळखी व्यक्ती दिसली की कुत्रा सर्वात आधी सावध करतो. भारतात अनेक खेड्यांमध्ये साप, उंदीर आणि इतर कीटक शेत खराब करू नये, म्हणून मुंगूसही पाळले जातात. 
आफ्रिका ते अमेरिकेपर्यंत असे कितीतरी प्रसंग घडलेत, जेव्हा घरी पाळलेल्या सापाने किंवा पोपटाने मध्यरात्री मालकाला उठवून घराला आग लागल्याची सूचना दिली आहे. 
जंगली प्राणीसुद्धा हजारो वर्षांपासून संकटांची सूचना देत आहेत. अचानक पक्ष्यांचे थवेच्या थवे गोंगाट करत उडत असतील तर ही भूकंप किंवा त्सुनामीची चाहूल समजायची. जंगली डुक्करं किंवा हरणांचा कळप सैरावैरा पळायला लागले तर समजावं की कुठेतरी वणवा पेटला आहे.
फोटो स्रोत, Getty Images
कुठल्याही प्राण्याचा लाड केल्याशिवाय तुम्ही कसे राहू शकता?
पाळीव प्राणी असेल तर समाजात तुम्ही एकटे पडण्याची शक्यता खूप कमी होते, असं संशोधनात आढळलं आहे. कारण तुमच्याजवळ प्राणी असेल तर इतर लोक तुमच्याशी अधिक बोलतात आणि तुमचा संवाद वाढतो. 
प्राण्याला फिरायला घेऊन गेल्यावर अनेक अनोळखी आणि प्राणी पाळणारे इतर माणसंही उत्स्फूर्तपणे बोलतात, असं कुणीही सांगेल. 
तसंच शेतकरी किंवा व्यावसायिक उपयोगासाठीच्या प्राण्यांचे मालक आपल्या प्राण्याच्या आरोग्यासाठी नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहतात. 
फोटो स्रोत, Getty Images
प्राण्यांशी मैत्री राहिली की आणखी मित्र बनवता येतात
प्राण्यांना बोलता येत नाही. मात्र तरीही ते संवाद साधतात. फक्त आपल्याला त्यांचे संकेत आणि देहबोली समजायला हवी. एकदा का आपल्याला हे जमलं की मग माणसांशीही नेमका संवाद साधण्यास मदत होईल.
शब्देविण संवादाचं हे कौशल्य आपल्याला वाटतं त्याहून खूप जास्त उपयोगाचं आहे. शब्दांशिवायच्या संवादाचे तज्ज्ञ डॉ. अलबर्ट मेहराबियन सांगतात की, "आपण रोज 60% ते 90% संवाद न बोलता साधत असतो." म्हणजे विचार करा, हे संवाद कौशल्य तुम्ही आत्मसात करू शकलात तर तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात याचा किती उपयोग होऊ शकतो. 
10. प्राण्यांबद्दल संवेदनशील रहा
फोटो स्रोत, Getty Images
प्राण्यामुळे निसर्गाशी तुम्ही एक संवेदनशील नातं जपू शकता.
शेवटी काय तर प्राणी आपल्यासाठी काय करू शकतात यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, हे जास्त महत्त्वाचं. एखादा प्राणी विकत घ्यायचा तुमचा विचार असेल तर तुम्ही त्याला उत्तम आयुष्य जगण्याची दुसरी संधी देत आहात. 
शेतीतील किंवा व्यावसायिक वापरातील प्राण्यांबद्दल आपल्या मनात आदर असेल तर त्यांची देखभाल उत्तम प्रकारे होते. शिवाय त्यातून समाधानही मिळतं.
जंगली प्राण्यांचं म्हणाल तर पर्यावरणाची काळजी घेणं हाच त्यांच्या सुरक्षेसाठीचा सर्वात योग्य मार्ग आहे. 
आपल्या या प्रयत्नातून हे जग अधिक सुंदर होईल, यात शंका नाही. 
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares