राज्यात रासायनिक खतांचा वाढता वापर – Loksatta

Written by

Loksatta

राज्यात रासायनिक खतांच्या वापरात गेल्या दोन वषार्ंत तब्बल २१ लाख टनाने वाढ झाली असून, प्रतिहेक्टरी वापरही मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१४-१५ या वर्षांत राज्यात रासायनिक खतांचा वापर सुमारे ७६.५ लाख टन, तर प्रतिहेक्टरी वापर १४७.६ किलोग्रॅम इतका होता. २०१३-१४ मध्ये राज्यात विविध पिकांसाठी ५९.९ लाख टन रासायनिक खत वापरले गेले, त्या वर्षांत हेक्टरी वापर ११९ किलोपर्यंत मर्यादित होता. रासायनिक खतांच्या किमती आधीच आवाक्याबाहेर गेल्या आहेत, त्यातच पावसाच्या अनियमिततेमुळे रासायनिक खतांच्या वापराकडे कल वाढला आहे.
शेतकरी पूर्वी शेणखताचा वापर करून खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेत असत. शेणखतासाठी घरच्या गोठय़ात बैलजोडीसोबतच गायी-गुरे सुद्धा पाळत असत, मात्र यांत्रिकीकरणामुळे जनावरांची उपयुक्तता कमी झाली, तसा शेणखताचा वापरही कमी झाला. रासायनिक खतांचा पर्याय पुढे आल्यानंतर ही खते टाकण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धाच सुरू झाली. परिणामी राज्यातील सर्वच भागात रासायनिक खतांची मागणी भरमसाठ वाढली. रासायनिक खतांच्या बेसुमार वापराचे दुष्परिणाम जाणवू लागले असून, अनेक भागात जमिनीचा पोत बिघडत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बी.टी. तंत्रज्ञान, संकरित वाणांच्या विविध पिकांना तुलनेने अधिक रासायनिक खतांची गरज भासत आहे.
नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी वापर नियोजन विभागाच्या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे हजारो हेक्टर शेतजमीन ही नापीक झ
ाल्याचे आढळले. राज्यात कीटकनाशकांचा वापरही मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. २०१४-१५ या वर्षांत १२ हजार ६३४ टन कीटकनाशकांची फवारणी झाली. गेल्या काही वर्षांंत रासायनिक कीटकनाशकांसोबतच जैविक कीटकनाशकांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असला, तरी रासायनिक कीटकनाशकांचे प्राबल्य दिसून आले आहे. २०१०-११ या वर्षांत राज्यात ८ हजार ३१७ टन रासायनिक कीटकनाशके वापरण्यात आली होती, तर २२०० टन जैविक खतांचा उपयोग करण्यात आला होता.
२०१४-१५ मध्ये जैविक खतांचा वापर ३ हजार ८७५ टनापर्यंत पोहचला, पण त्यासोबतच रासायनिक कीटकनाशकांचा वापरही अधिक प्रमाणात झाला.
किंमतीत भरमसाठ वाढ
रासायनिक खतांचा वापर वाढल्यापासून प्रमुख खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या किमती भरमसाठ वाढवल्या. नफेखोरीचे प्रमाणही वाढले. युरियाच्या टंचाईच्या काळात पुरवठादारांनी वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला. पण, याचा फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने भूजलाचे प्रदूषणही वाढले आहे. त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. कृषी नियोजनात खते आणि कीटकनाशकांच्या वापराविषयी स्पष्ट धोरण नसल्याने शेतकरी मार्गदर्शनाअभावी दिशाहीन पद्धतीने रासायनिक खतांच्या वापराच्या स्पध्रेत सामील झाल्याचे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares