लाल महालातील लावणी आणि जात संघटनांची पुरुषसत्ताकता – The Wire

Written by

लाल महालातील लावणी आणि जात संघटनांची पुरुषसत्ताकता
‘कला ही श्रेष्ठ वा कनिष्ठ नसते. नृत्य हा कलाप्रकारही कमीजास्त तोलामोलाचा नसतो. लावणीऐवजी भरतनाट्यम, कथ्थक सादरीकरणाचे शुटींग झाले असते, तर एवढा गदारोळ माजला असता का?
पुण्यातील लाल महालात वैष्णवी पाटील या नृत्यांगनेने रिल्ससाठी एक व्हिडीओ शूट केला. तो व्हिडिओ एका लावणीनृत्याचा होता. या व्हिडिओला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला.. त्यानंतर गोमूत्र शिंपडून लालमहालाचं शुद्धीकरण करण्यात आलं. रिल्स बनविणाऱ्या वैष्णवी पाटील हिला माफी मागण्याइतपत धारेवर धरण्यात आलं.
लाल महाल, हे अतिशय आदरचे ठिकाण आहे. अत्यंत दैदीप्यमान इतिहास असलेल्या लाल महालाचा सर्वांनाच अभिमान आहे. मात्र काही प्रश्न महत्त्वाचे आहेत.
या प्रकरणातून सोशल मीडिया आणि वृत्तपत्रीय बातम्यांची मांडणी कशा विचित्र पद्धतीने केली जाते, हेही प्रकर्षाने जाणवलं. जसं की “लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने तमाशातल्या गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.”  “सिने दिग्दर्शक सुनील बापट आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील यांनी हे कृत्य केलं आहे.”
या बातमीवरून असं दिसतं की, एखाद्या ठिकाणी कुठल्यातरी निमित्ताने प्रवेश करून नंतर चोरी, दरोडा, खूनासारखं किंवा तत्सम भयंकर काहीतरी दृष्कृत्य केलं गेलंय.
सिने दिग्दर्शक सुनील बापट आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील यांनी लालमहालात लावणीनृत्याचं शुटींग केलं. खरंतर हे इतकं भयंकर, धक्कादायक कृत्य आहे का?
कोणत्याही नृत्यप्रकारात ठुमके, अंगविक्षेप, अभिनय असतोच. तसा तो लावणीतही आहे. मग ती तमाशातील लावणी असो वा बैठकीतील लावणी. पन्नास-पाऊणशे वर्षांखाली बैठकीतही गायिका ख्याल, ठुमऱ्या उभ्यानेच गात असत आणि गाताना पायांत चाळ बांधून काहीशा नाचतही असत. ‘गीतं वाद्यं तथा नृत्यं त्रयं सङ्गीतसंज्ञकम्’ या संगीताच्या व्याख्येवरून पूर्वीच्या काळी संगीतात वाद्याच्या साथीएवढेच नृत्यही आवश्यक मानले जात होते हे स्पष्ट आहे. या नृत्यात हाव भावांचाही समावेश होत असे, हे संगीतशास्त्रात नृत्त व नृत्य यांत जो भेद मानला आहे, त्यावरून स्पष्ट होते. नृत्त म्हणजे शुद्ध नाच. ‘रसभावविहीनं तु नृत्तमित्यभिधीयते.’  नृत्य म्हणजे हावभावयुक्त नाच. लावणी वा तत्सम नृत्य हा एक कलाप्रकारच आहे. त्यात शुद्ध अशुद्ध असं काही मानण्याचं कारण नाही.
हेमा मालिनी, बिरजू महाराज, चित्रेश दास, वैजयंतीमाला अशा भरतनाट्यम- कुचीपुडी-कथ्थक नृत्यांगनांचं नृत्य आयोजित केलं असतं, तर त्याला तिकिट लावून प्रेक्षक बोलावले असते. तेव्हाही महाल बाटला असता का?
‘कला ही कधीही उच्च वा नीच नसते. नृत्य हा कलाप्रकारही कमीजास्त तोलामोलाचा नसतो. लावणीऐवजी भरतनाट्यम, कथ्थक सादरीकरणाचे शुटींग झाले असते, तर एवढा गदारोळ माजला असता का?
खरं तर, आजकालच्या तरुण तरुणींचा या कलाप्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी निर्लेप आहे. भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी असो वा महाराष्ट्रातील लावणी असो. हल्ली सोशल मीडियावर तरुण मुलीच नाही तर मुलंसुद्धा एकापेक्षा एक सरस लावणी नृत्याचे व्हीडिओ त्यांच्या क्लासच्या जाहिरातीसाठी प्रसारीत करत असतात. तरुण मुलांची चपळाई आणि लिंगसापेक्षता ही खरं तर आनंद आणि समाधान देणारी बाब आहे.
 लावणी एक कलाविष्कार
“महाराष्ट्राच्या लोकगीतांचा किंवा शाहिरीचा लावणी हा ग्रामीण शृंगारिक काव्याचा प्रकार म्हणून ओळखला जातो. लावणीचा एक अर्थ सौंदर्य असा आहे. म्हणूनच, आदर्श, सौंदर्य, भव्यता यांचा एकत्रितपणे मिलाफ म्हणजे स्वतःची एक वेगळी ओळख असलेली शास्त्रीय लोकनृत्य लावणी. परंतु, सामंतशाही, पेशवाई आणि चित्रपटांमधून लावणी हा काव्य आणि नृत्यप्रकार बदनाम केला गेला आहे.
लावणी, गण, गौळण, पोवाडे, अभंग हे सगळे काव्यप्रकार जात-वर्ग-वर्ण-लिंगभावात विभागले गेलेले आहेत. अभंगांची रचना देवाचं नामस्मरण करणाऱ्या संतांनी केली. भजन किर्तनात नामस्मरण आहे, जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान आहे, विरक्ती आहे म्हणून ते श्रेष्ठ. पोवाडे वीररसाची निर्मिती करतात, पुरुषार्थाला आव्हान देतात म्हणून ते श्रेष्ठ आणि लावणी ही शृंगारिक, उत्तान, मनोरंजक म्हणून ती कनिष्ठ असे समजायचे का?
इतिहास आणि वास्तव
पुरुषांचं मन रिझवण्यासाठी, त्याच्या रंजनासाठी शृंगारी लावणीचा उपयोग केला जाऊ लागला आणि कनिष्ठवर्गीय जसे महार, कोल्हाटी, कुंभार, मातंग जातीतील स्त्रिया नाचवल्या जाऊ लागल्या. त्यातही बैठकीची लावणी, फडावरची लावणी कमी-जास्त दर्जाची ठरवली गेली. पुढे पुढे तर लावणी आणि तमाशाला घर, कुटुंब उध्वस्त करणारा असा हीन दर्जा आणि ते करणाऱ्या कलावंताकडे पाहण्याचा हिणकस दृष्टिकोन तयार झाला. यामुळे लावणी नृत्यांगनांची वाताहत झाली; तर गण-गौळण सादर करणाऱ्या नाच्यांचीही अवहेलना झाली.
१९ व्या शतकात म्हणजे अगदी अलिकडच्या काळात तामिळनाडूतील मंदिरांमध्ये देवदासींची भरतनाट्यम् ही नृत्यकला ब्राह्मण / उच्चजातीय स्त्रियांनी आत्मसात करून शास्त्रीय पद्धतीने त्याचे सादरीकरण करण्यात येऊ लागले. त्या स्टेज शोजमध्ये आज लाखो रुपयांची उलाढाल होते आणि मंदिरातल्या देवदासी मात्र हिणवल्या गेल्या आहेत.
मुळात नृत्य, नाटक, अभिनय हाच कनिष्ठवर्गियांनी उच्चवर्णियांच्या मनोरंजनासाठी करण्याचा प्रकार आहे, अशी धारणा कित्येक काळ समाजात होती. पूर्वी ब्राह्मण स्त्रियांनी या क्षेत्रात येणे, तोंडाला रंग फासणे, नाटक सिनेमात काम करणे अप्रतिष्ठेचे समजले जाई. म्हणूनच तर बालगंधर्वांना स्त्रीपात्र साकारावे लागले.
कनिष्ठ जातीतल्या काही अभिनेत्रींनी चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमात अभिनय, नृत्य गाणी या माध्यमातून प्रवेश करुन महाराष्ट्राची ओळख निर्माण केली आणि पुढे इतर जातींतील स्त्रियांचा मार्ग मोकळा केला. पुढे उच्च म्हणवल्या जाणाऱ्या जातीतल्या स्त्रिया चित्रपट, नाटक, दूरदर्शन आणि मनोरंजक क्षेत्राकडे वळल्या. आणि पाहता पाहता उच्चवर्णीय समाजाने या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ते एकाचवेळी पुरुषसत्ताक आणि वर्ण-वर्गभेदी होते.
लावणी तमाशाचा इतिहास
साधारणत: सतराव्या शतकाच्या सुमारास लावणी हा काव्यप्रकार आढळतो. या लावण्या भक्तीरसपर असलेल्या दिसतात. कामुकतेचे उघड प्रदर्शन करणाऱ्या शृंगारिक लावण्या पेशवाईच्या उत्तरार्धात दिसून येतात. त्याचे मूळ पहिल्या ते सातव्या शतकातील प्राकृत रचनांचे संकलन केलेल्या “गाथासप्तशती”मध्ये दिसून येते. या रचनांमध्ये प्राकृत जनांच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन आढळते
लावणीच्या रचना पूर्णपणे पुरुषांकडून केल्या जात व त्याचे सादरीकरण पुरुष प्रेक्षकांपुढे स्त्रियांकडून केले जात असे. त्यामध्ये पुरुषी दृष्टिकोनातून प्रभावित झालेल्या स्त्रियांच्या इच्छा उघडपणे कामुकतेने प्रदर्शित केल्या जात असत. प्रेक्षकांमधील उच्चभ्रू पुरुषांची तिच्याकडून शारीरिक सुखाची अपेक्षा होतीच. अशा प्रकारच्या लोककलांची स्त्रीवादी चिकित्सा कशी करावी?” असे प्रतिपादन शर्मिला रेगे यांनी आपल्या ‘मऱ्हाटी शृंगारीक लावणी’ या लेखात विस्तृतपणे केले आहे. त्यात त्या म्हणतात, “दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या राजवटीत छोटे शेतकरी कर्जबाजारी होऊन भिकेला लागले. इ. स. १८०३ साली भीषण दुष्काळ पडला. बाणाजी यांनी कर्जबाजारीपणाचे आणि दुष्काळाचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. ‘क्लेषदायक परिस्थितीतून सुटण्यासाठी आयांनी स्वत:ला व मुलांना विकले. तरुण स्त्रियांनी वेश्याव्यवसाय सुरू केला. परपुरुषांबरोबर रखेली म्हणून राहू लागल्या. कोणताही कायदेशीर अधिकार नसताना आपली संपत्ती समजणाऱ्या दलालांच्या आहारी गेल्या. दुष्काळ, कर्जबाजारीपणा यामुळे कनिष्ठ जातीतील स्त्रियांच्या विक्रीचे प्रमाण वाढले.’
म्हणजेच स्त्रिया आपणहून वेश्याव्यवसाय, नाचगाणं करण्यासाठी आल्या नाहीत, तर विशिष्ट परिस्थिती आणि हतबलता यातून जिवंत राहण्यासाठी त्यांनी हा मार्ग स्वीकारला. पेशवाईच्या उत्तरार्धातील गुलामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्त्री गुलामांचे अधिक्य होय. साधारण परिस्थितीत शासनाला स्त्री गुलामविक्री हा महसूल मिळवण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग होता. शेवटच्या पेशव्याच्या उधळेपणावरून असा अंदाज करता येतो, की दुष्काळाच्या परिस्थितीत महसूल गोळा करणे सरकारला कठीण जात होते. त्यावेळी बराचसा महसूल स्त्री गुलामविक्रीतून मिळत असे. साधारणत: दोन मार्गांनी त्यांना गुलाम बनविले जात असे. अ) युद्धातून पळवून आणणे ब) कनिष्ठ जातीतील स्त्रीवर व्याभिचाराचा आरोप करून तिला गुलाम बनवणे. म्हणजे एकीकडे हतबलतेतून स्त्रिया स्वतःला विकण्याचा मार्ग अवलंबत होत्या, तर दुसरीकडे जबरदस्तीने त्यांना नाचगाणं देहविक्री गुलामी करण्यास भाग पाडल्या जात होतं. आणि त्या स्त्रियांना किंवा आजपर्यंतच्या त्यांच्या पिढ्यांनाही कलुषित नजरेनेच पाहण्याचा प्रघात कमी झालेला नाही. दुसऱ्या बाजीरावाने एकही युद्ध केले नाही. त्यामुळे स्त्रियांना गुलाम बनविण्यासाठी त्याला दुसरा पर्याय हाताळावा लागला. सरकारकडून व्याभिचारिणी म्हणून पकडून गुलाम बनविलेल्या स्त्रियांमध्ये मुख्यतः कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचा भरणा होता. तर उच्च जातीतील ‘व्याभिचारी स्त्रियांना त्यांच्या जातीतील लोकांकडून वाळीत टाकले जात असे. गुलाम स्त्रिया पेशव्यांच्या दरबारात, नाटक शाळेत व इतर खात्यात कामाला नेमलेल्या असत. याचप्रमाणे गुलाम स्त्रिया घरांमध्ये, गोठ्यांमध्ये, तबेल्यामध्ये कोठारामध्ये नृत्यशाळेत, गोदामांमध्ये निरोप्या म्हणून आणि बांधकामावर काम करीत असत. पेशवे सरकार नेहमी आपल्या अधिकाऱ्यांना पगाराऐवजी अशा स्त्रिया देत असत. पेशवेकाळात स्त्रियांचा वापर एखाद्या वस्तूप्रमाणे झाला.
पेशवाईत स्त्री गुलामांचे दोन प्रकार दिसतात. अ) कुणबिणी ( ज्यांना घरकाम व शेतावर काम करण्यासाठी खरेदी केले जात असे) ब) बटीक (एक तर काही व्यक्तीसाठी किंवा नाटकशाळांसाठी किंवा सरकारच्या नृत्यगृहांसाठी लैंगिक मजूर म्हणून खरेदी केले जात असे) घरकाम करणाऱ्या कुणबी स्त्रिया अतिशूद्र जातीतील नसायच्या परंतु बटीक ही शूद्र किंवा अतिशूद्र जातीची असायची. रस्ते बांधण्यासाठी आणि युद्धसामग्री बनविण्याच्या कामात मजुरांची गरज होती. पेशव्यांच्या दफ्तरातील नोंदीवरून असे दिसून येते, की ज्या कुणबी स्त्रियांचे जातीबाह्य असे बेकायदा संबंध होते त्यांना हद्दपार करून कामास जुंपण्यास येत असे. यावरून असे लक्षात येते की, व्याभिचाराच्या नावावर स्त्रियांच्या लैंगिक आणि उत्पादक श्रमांचा वापर करून घेतला जात असे. लावणी रचनांमधे कनिष्ठ जातीतील स्त्रियांचे चित्र हे लैंगिक इच्छा अतृप्त असलेल्या व मूलतः व्याभिचारी असे रंगवले आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या दरबारात लावणीचे सार्वजनिक सादरीकरण होऊन लावणी खासगी नाटकशाळेकडून सार्वजनिक क्षेत्राकडे वळली. तेव्हा ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती. सर्व पुरुष प्रेक्षक असलेले हे सार्वजनिक सादरीकरण ‘लावणी ‘तमाशा’ म्हणून ओळखले गेले. जास्तीतजास्त शृंगारिक लावण्या होळीच्या तिन्हीसांजेला सादर केल्या जात असत. परंतु जेव्हा बाजीराव पेशवा ब्रिटिशांना शरण गेला (१८१८) व पेशवाईचा अंत झाला. त्यावेळी तमाशावर नवीन आश्रयदाता शोधण्याची वेळ आली. इ.स. १८४०च्या सुमारास लावणी तमाशा ग्रामीण भागाकडे वळला. त्या काळातील बरेचसे लावणी रचनाकार हे विशेषत: महार, मांग अशा कनिष्ठ जातींतील होते.”
वरवर पाहाता या लावण्यांमध्ये स्त्रीची लैंगिकता शब्दांकित झाल्यासारखे वाटते. परंतु सखोल विश्लेषणातून असे लक्षात येते, की  त्या लावणीत बटीक विरुद्ध सौभाग्यवती असा विरोधाभास आहे. या लावणी रचनांतून स्त्रीच्या अतृप्त इच्छा या कनिष्ठ जातीच्या बटीक स्त्रीच्या मुखातून ध्वनित होतात; तर विरहाचे दुःख पत्नीच्या मुखातून व्यक्त होते. लावणी साहित्यातील बटीक ही शारीरिक सुखाची आत्यंतिक गरज व्यक्त करते. ती पुरुषाला तिच्यावर पत्नीप्रमाणे अधिकार गाजविण्याचे आव्हान देते.
पेशवाईच्या उत्तरार्धात स्त्रियांच्या इच्छा आकांक्षांवर एकूणच पुरुषी दृष्टिकोनाचा प्रभाव दिसून येत असे. तेव्हापासून लावणीच्या आशयात व स्वरुपात बरेचसे बदल झाले.
खरे तमाशा फड बंद पडले आणि मराठी चित्रपटांच्या केंद्रस्थानी लावणीशैली आली. तमाशा लोकरंगभूमीवर अश्लिलतेचा आणि अनुचिततेचा शिक्का मारल्यामुळे नाचीची कामुकता कमी झाली. संगीतबारीच्या कोल्हाटी स्त्रिया शृंगारिक लावण्या सादर करीत असत आणि कंत्राटदारांकडून जास्तीतजास्त पैसे देणाऱ्यांना त्यांचे लैंगिक श्रम विकले जात असत. त्यामुळे यापेक्षा वग श्रेष्ठ ठरला. व्हिक्टोरियन संस्कृतीने स्त्रियांच्या कामुकतेच्या प्रदर्शनात केलेल्या बदलांमुळे वरिष्ठ जातींची शहरी नाट्यगृहे नैतिक व सुसंस्कृत ठरली. कोल्हाटी स्त्रिया त्यांच्या सर्जनशीलतेपासून वंचित झाल्या. प्रेक्षकांना हवे असलेल्या लैंगिकतेचे नियंत्रण कंत्राटदारांनी केले. १९३० च्या दशकामध्ये उदयाला आलेल्या मराठी बोलपटांमुळे ही प्रक्रिया जोमाने वाढली.
सुरुवातीला मराठी बोलपटाच्या दुनियेत (१९३२-१९४२) पौराणिक कथांवरील आणि सामाजिक विषयांवरील चित्रपट लोकप्रिय होऊन भरभराटीस आले. त्याचवेळी अनेक लहान मोठ्या शहरांतून तमाशाची थिएटर्स बंद पडली.
दुसऱ्या महायुद्धामुळे चित्रपट बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि यंत्रसामग्रीच्या आयातीवर अनेक बंधने लादण्यात आली. चित्रपटांची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच परवाना घेण्याची वेळ आली. मध्यंतरी हिंदी सिनेमा हा राष्ट्रीय संस्कृती म्हणून उदयाला आला आणि त्यांना परवाना व कच्चा माल याबाबत प्राधान्य दिले जाऊ लागले. महायुद्धानंतरच्या काळात तमाशा शैलीच्या उदयातून प्रादेशिक मराठी चित्रपटांचे पुनरुज्जीवन झाले. ‘जय मल्हार’ व ‘रामजोशी’ हे या शैलीचे पहिले चित्रपट होते. हे चित्रपट त्यातील लावण्यांमुळे खूपच यशस्वी झाले. मराठी चित्रपटांच्या मुख्य प्रवाहाने प्रादेशिकतेवर भर देऊन तमाशा शैलीचा स्वीकार केला. तमाशा शैलीला प्रसिद्धी मिळण्याचे एक कारण म्हणजे मुंबई राज्याने १९४० मध्ये तमाशावर बंदी जाहीर केली होती. या बंदीचे कारण देताना लावणीतील शब्द अश्लिल आणि असभ्य असून तमाशा म्हणजे छुपा वेश्या व्यवसायच आहे असे म्हटले गेले होते.
मराठी चित्रपटांनी तमाशा शैलीचा स्वीकार केल्याने लावणीवर नाच करणाऱ्या कोल्हाटी व कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचे कामुक अविर्भाव काढून टाकले गेले. मराठी चित्रपटांवर ब्राह्मण व मराठ्यांचे प्रभुत्व होते. कोल्हाटी, महार, मांग यांच्या लावणी तमाशाचे साहित्य घेऊन त्याचे एक क्रयवस्तूत रूपांतर करुन छोट्या शहरातील प्रेक्षकांसमोर सादर केले जात असे. कृष्ण धवल मराठी चित्रपटांचा शहरी प्रेक्षकवर्ग इस्टमन कलर हिंदी चित्रपटांकडे आकर्षित झाला.
काही मराठी चित्रपटांत नाचीला ‘पाखरू’, ‘बिजली’, ‘जवानीचा बाग’ असे संबोधले आहे. या लावण्यांतून नाचीची लैंगिकता ही ग्राम्य, गांवढळ, जंगली असल्याचे भासविले जाते. मराठी चित्रपटातल्या नाच्या या बहुतेक कोल्हाटी जमातीतून आलेल्या आहेत. त्यातल्या फारच थोड्या कलाकार (उषा चव्हाण, लीला गांधी, सरला येवलेकर, मधु कांबीकर) मराठी सिनेमात ‘नाच्या’ म्हणून यशस्वी झालेल्या आहेत.
लावणी जातपितृसत्तेची बळी
पुरुषांना हवी असलेली दिलखेचक, आकर्षक, शृंगारिक अशी लावणीची बांधणी करून स्वतःचे मनोरंजन करून घ्यायचे. मद्यपान, विलासी, चैनीत जीवन जगायचे. विशिष्ट नृत्य विशिष्ट जाती आणि स्त्रियांना वेठीस धरून बदनाम करायचे हे या व्यवस्थेचे कुटील डाव पूर्वीपासूनच चालत आलेले आहेत. त्यात धार्मिक तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेणाऱ्या राजकारण्यांनीही गलिच्छतेचा कळस गाठलाय.
पेशव्यांच्या विलासी जीवनात जडजवाहिर, कापड, बागबगीचे यासोबतच नाटकशाळा आणि कुणबिणींचाही समावेश असल्याचे वर्णन डॉ. वर्षा शिरगावकर यांनी ‘पेशव्यांचे विलासी जीवन’ या पुस्तकात विस्तृतपणे  केले आहे. विलासाच्या अनेक अंगांमध्ये कुणबिणी राखणे याचाही अंतर्भाव आहे. त्याला नाटकशाळा संबोधले जाई. पहिल्या बाजीरावाची मस्तानी ही नाटकशाळा तर त्याचा मुलगा रघुनाथराव याच्या नाटकशाळेची नावे लाडू, केसरी, रत्ना, स्वरुपा, शामा अशी होती. सवाई माधवरावाच्या नाटकशाळेचे दाखले प्रभाकर या शाहिराच्या एका लावणीमध्ये आले आहेत.
‘सातशे दासी गुणी नाटकशाळा किती ।
पाहताच प्रभू, काही ओवाळूनि टाकती ॥
दुसऱ्या बाजीरावाच्या काळात नाटकशाळा असणे या विधानाचा उच्चांक गाठला गेला. नाटकशाळांवर अमाप पैसा खर्च झाला. त्यापैकी नाटकशाळांवरील खर्चाच्या नोंदी मिळतात. त्या मासिक पगार या स्वरूपाच्या आहेत. – हेमंत – रू. ५०, मैना – रू. ४५, मैना कसबीण – रू. २००, लक्ष्मी परभीण- रू. ३००, याखेरीज इतर नाटकशाळांची नावे अशी- रमा माळीण, गंगा कसबीण, कृष्णीशुद्री, भागिरथी शुद्री, आवडी शुद्री. दुसऱ्या बाजीरावाच्या खर्चाच्या नोंदीमध्येच ‘विलास प्रकरण’ यासाठी खर्च अशी नोंद आहे.
शुद्र भटक्या मुस्लीम आणि ब्राह्मण स्त्रियांना फसवून, त्यांची खरेदी विक्री होत असे. आपली मालकी सिद्ध करण्यासाठी त्यांच्या पायात कडे असे. कुणबीनी पळून गेल्याची अनेक उदाहरणे ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मिळतात. यावरून त्यांच्यावर कित्येक प्रसंगी जुलूम होत असावेत असे लक्षात येते. मालक मरण पावल्यावर किंवा त्या म्हाताऱ्या झाल्यावर त्यांची विशिष्ट पद्धतीने मुक्तता होत असे. मुक्तीनंतरच्या जीवनाविषयी मात्र ऐतिहासिक कागदपत्रे मौन पाळताना दिसतात.
इ.स. १८१८ मध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्यानंतर जेव्हा मराठ्यांच्या प्रांतातील गुलामांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला. तेव्हा इंग्रज सरकारने मराठ्यांकडे १५,०००४८ गुलाम होते अशी नोंद केली. त्यांपैकी काही कुणबिणींना कलावंतिणींनी विकत घेतले होते. त्यांना पुढे नाचाचे शिक्षण देण्यात आले. इंग्रज राजवटीमध्ये इंग्रजांच्या संस्थाने खालसाकरणाच्या धोरणामुळे संस्थानांवर अवलंबून असलेले अनेक कलाकार, कारागीर हे जसे सैरभैर झाले, तशाच कुणबिणीदेखील त्यांच्या मुक्तीनंतर आणखी दिशाहीन झाल्या असाव्यात. नंतर समाजाने नाकारलेल्या स्त्रियांमध्ये त्यांचा समावेश होऊन त्या उच्चभ्रू समाजाच्या खिजगणतीतही राहिल्या नसाव्यात. (डॉ. वर्षा शिरगावकर ‘पेशव्यांचे विलासी जीवन’)
जातीसंघटना आणि पितृसत्तेचे राजकारण
“प्रथम स्वधर्म सोडून मन मानेल तसे वर्तन करणे, दारू पिऊन रस्त्यांत लोळणे, पोऱ्यांचे तमाशे पाहत फिरणे, जुवा खेळणे, गांजा वगैरे ओढणे, रांडा ठेवणे इत्यादी वाईट व घाणरेडी आचरणे तुम्ही करू लागला. आता रांडा कोण? यांची काही सृष्टीविरहित उत्त्पत्ती झाली का? का या कोणी दुसऱ्या देवाने केल्या? रांडा या तुम्हीच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रियांपैकी स्त्रिया असतात.” असे १८८२ साली ताराबाई शिंदेंनी आपल्या, ‘स्त्री पुरुष तुलना’ या पुस्तकात नमूद करून ठेवले आहे.
म्हणजे एकंदरीतच आपल्या सुखासाठी भोगविलासासाठी अनेक स्त्रियांना गुलाम करून त्यांचे आयुष्य नासवून त्यांना बटिक करायचे आणि त्यांनाच नाचणाऱ्या म्हणून हिणवायचे, शुद्र, अस्पृश्य हीन लेखायचे. म्हणूनच लावणी ही शूद्रजातीतील आणि त्यातही पुरुषांसाठी भोगवस्तू असलेल्या स्त्रियांकडून केली जाते. म्हणून ती बदनाम असा एक सामाजिक संकेत तयार झाला.
ग्रामीण भागात शेती उद्योग करणारे शेतकरी कुणबी आत्ताआतापर्यंत कुस्त्या, जत्रा, तमाशांचे फड यात रमत असत. शिकून नोकरी राजकारण करणारी त्यांचीच एक पिढी मात्र नाचगाण्यावर आक्षेप घेते, हा अंतर्विरोध लक्षात घ्यायला हवा.
लालमहालात चित्रीकरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, की आताही नाटक, सिनेमा आणि नृत्याकडे पाहण्याच्या पूर्वीच्याच ब्राह्मणी दुषित दृष्टिकोनातूनच मराठा समाजही याकडे पाहणार का? आणि लावणी सादरीकरणामुळे महाल बाटला, अशुद्ध झाला असं समजून गोमूत्र शिंपडून त्याची शुद्धी करणे हे हास्यास्पद आहे. जर महालात चित्रीकरण, वा यासारख्या कोणत्याही गोष्टींना मज्जाव आहे तर गोमूत्र कसं काय चाललं? मराठीत एखाद्या वाईट कृत्याचं वर्णन ‘शेण खाणे’ एखाद्यावर ‘चिखलफेक’ करणे असा होतो. म्हणजे मलमुत्रचिखल हे घाणीचं प्रतीक आहे. मग लालमहाल लावणीसारख्या नृत्याविष्काराने अपवित्र होतो आणि जनावरांच्या मूत्राने पवित्र होतो हे हास्यास्पद नाही काय?
मराठा संघटना या सगळ्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे? लाल महालात गोमूत्र शिंपडले यावर त्यांचा आक्षेप कसा नाही?
पुरोगामी भूमिका घेणाऱ्या आणि जिजाऊ, ताराबाई, फुले आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या मराठा संघटना याबाबत मात्र प्रतिगामी पारंपरिक भूमिका घेताना दिसतात.
गोमूत्र पवित्र-पाळी अपवित्र, बेलाचे पान, आंब्याचे पान, तुळशीचे पान पवित्र- एखादी व्यक्ती अपवित्र. एखादी जात पवित्र दुसरी अपवित्र. गाय पवित्र, डुक्कर कावळा किंवा तत्सम प्राणी अपवित्र असं कसं काय असू शकतं?
नाट्यशास्त्रविषयक संस्कृत ग्रंथांत नाट्य, गीत आणि नृत्य या कलांचे मार्ग आणि देशी असे दोन ठळक वर्ग मानलेले आहेत. मार्ग म्हणजे नटराज शंकराने निर्मिलेली आणि नाट्याचार्य भरतमुनीने सांगितलेली अभिजात कला आणि देशी म्हणजे भारतातील निरनिराळ्या देशांत, आजच्या भाषेत प्रदेशांत, परंपरेने चालू असलेली लोककला. त्यांतील नृत्यकलेच्या बारा देशी पद्धती पंडित वेद याने ‘संगीत मकरंद’ या ग्रंथात सांगितल्या आहेत. पंडित वेद हा शिवाजीमहाराजांचे वडील शहाजीराजे यांच्या दरबारातला, म्हणजे सतराव्या शतकाच्या पूर्वाधातील त्याने सांगितलेल्या बारा देशी नृत्यप्रकारांत ‘लावणम्’ नावाचा एक प्रकार आहे. (डॉ. वर्षा शिरगावकर ‘पेशव्यांचे विलासी जीवन’)
म्हणजे लावणीची पूर्वसूरी असलेल्या नृत्यप्रकाराला कलासक्त असलेल्या शहाजीराजे शिवाजी महाराजांनी दातृत्व बहाल केले, त्याच लावणीने मराठ्यांना बाटवले. महाराजांच्या महालाला बाटवले. असा अर्थ घ्यायचा का?
वरून जातीय अभिमानी उद्दघोषणा देत गोमूत्र शिंपडले गेले.
यातल्या कित्येकांनी आपल्या लहानग्या मुलींनी शाळा कॉलेजातील स्नेहसंमेलनात केलेल्या लावणी नृत्याला कौतुकाने दाद दिली असेल, फोटो काढले असतील. वैष्णवीसुद्धा कुणाची तरी मुलगीच आहे. कलावंत आहे. मंदिराच्या केल्या गेलेल्या शुद्धीने तिच्या भावना दुखावल्या असतीलच. एखाद्या कलावंताच्या कलेच्या सादरीकरणामुळे एखादी जागा भ्रष्ट कशी काय होऊ शकते?
रस्त्यावर उतरून निषेध नोंदवणाऱ्या काही स्त्रियांनाही वाटतंय, की शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या वास्तव्याने पवित्र झालेली वास्तू लावणी नृत्याने बाटली. ही म्हणजे ‘वेश्या आहेत म्हणून लेकीबाळी घरात सुरक्षित आहेत’ या भयंकर फसव्या वाक्यासारखी स्थिती झाली. कोवळ्या मुली, देवाला सोडायच्या, गरीब, लाचार मुलींना वेश्या व्यवसायात ढकलायचे आणि वर समाजापासून त्यांना दूर ठेवून त्यांचे शोषण करायचे. ही पुरुषांच्या सोयीची व्यवस्था स्त्रियांनीही लक्षात घेतली पाहीजे. पुरुषसत्ताक स्त्री, शुद्र, गुलामीची परंपरा लक्षात घेतली पाहिजे. स्त्रियांना नाडवून, फसवून, तिची कोंडी करून, तिला गुलाम करून तिचा उपभोग घेणारी पुरुषी व्यवस्था आपल्या सोयीप्रमाणे कधी बायको कधी रखेल, आणि कायमस्वरुपी गुलाम असा स्त्रीचा वापर करुन घेत असते. शुद्र, कुणबीन, महारीण, कलावंतीन अशी स्त्रियांची जात नसून  केवळ माणूस असणे, जातीविरहीत असणे याचे स्त्रियांना स्वातंत्र्य असायला हवे.
लालमहालात घडलेली शुद्धीकरणाची ही घटना पुरुषसत्तेला बळकटी देते, तशीच जातीय संघटनादेखील पुरुषसत्तेला बळकटी देण्याची शक्यता आहे. लाल महालातील लावणी निषेध प्रकरणातून दुसरा कोणता संदेश मिळतो?
सारिका उबाळे या कवयित्री आहेत.
Support Free & Independent Journalism
You must be logged in to post a comment.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares