शाळेच्या बाकावरून : मुलांच्या कल्पनाशक्तीला बळ – Loksatta

Written by

Loksatta

आपण स्वत:च्या कल्पनाशक्तीतून लिहिलेला लेख/कविता/छोटीशी गोष्ट किंवा काढलेले सुंदर चित्र कुणीतरी पाहावे, त्याचे कौतुक करावे असे प्रत्येकालाच वाटते. खरे तर कौतुकाचे काही शब्द किंवा पाठीवरची थाप खूप काही देऊन जाणारी असते. विशेषत: शालेय विद्यार्थी यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो, ते आवडण्याजोगे आहे. ही भावना आत्मविश्वास तर देतेच, पण नवीन कलाकृती तयार करायला उद्युक्तही करते, प्रेरणा देते. शाळेत असताना त्यांच्या जडणघडणीचा काळ लक्षात घेऊनच मुलांमधील क्षमतांना वाव देण्याच्या हेतूनेच प्रयत्न केले जातात. मासिक/ हस्तलिखित म्हणूनच महत्त्वाचा उपक्रम आहे. कारण मुलांच्या कल्पनाशक्तीचा जो फुलोरा फुलतो, जो विविधरंगी असतो तो इथे अनुभवता येतो.
ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील श्रीराम विद्यामंदिर शाळा ही त्या परिसरातील मुलांना प्रयत्नपूर्वक घडवणारी शाळा म्हणून ओळखली जाते. सर्वसाधारण मुलांप्रमाणे या मुलांनाही सर्व प्रकारचे अनुभव प्राप्त व्हावेत म्हणून इथे सातत्याने विविध स्वरूपाचे उपक्रम राबवले जातात. आकांक्षा नावाचे हस्तलिखित हा त्यापैकीच एक उपक्रम. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेच्या चाकोरीत बांधून न ठेवता त्यांना त्यांच्या मनातील विचारभावना मांडण्यासाठी उपलब्ध असणारे मुक्त व्यासपीठ म्हणजे आकांक्षा हस्तलिखित. आकांक्षा म्हणजे इच्छा, महत्त्वाकांक्षा, प्राथमिक स्तरातील मुले ही स्वप्नांमध्ये, विविध कल्पनांमध्ये खूप रमतात. त्या स्वप्नांना शब्दांच्या रूपाने मांडता यावे यासाठी हस्तलिखित तयार केले जाते, जेणेकरून मुलांनी विविध लेख, कविता लिहिणीच्या प्रयत्न करावा. त्यांच्या या प्रयत्नांचे कुठेतरी कौतुक होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना लिहिते होण्याची प्रेरणा मिळावी हाच त्यामागील उद्देश आहे. ही हस्तलिखिते चाळताना बालप्रतिभेचे सुंदर आविष्कार या रंगीबेरंगी पानांमधून दिसून येतात.
पहिल्याच वर्षी मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला व उत्स्फूर्तपणे हस्तलिखित तयारही झाले. शाळेला अपेक्षित होती ती कल्पना प्रत्यक्षात साकार झाली. मुलांनी स्वरचित, संग्रहित केलेल्या कविता, लेख, चित्रे यांनी आकांक्षा मासिक दरवर्षी सजते. या शाळेमध्ये कष्टकरी वर्गातील मुले मोठय़ा प्रमाणावर येतात, घरी तुलनेने अभ्यासासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक पोषक वातावरणाचा बऱ्याचदा अभाव असतो. या पाश्र्वभूमीवर जेव्हा आकांक्षाचा १७ वा अंक या वर्षी निघतो तेव्हा मुख्याध्यापिका अमृतकर मॅडम, श्रीराम विद्यामंदिर शाळेचे सर्व शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी यांचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते. सर्वानी घेतलेली मेहनत या हस्तलिखिताच्या माध्यमातून दिसून येते.
ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला ‘प्रकाश’ हा वार्षिक अंक काढण्यात येतो. (सन २०१६ रोजी) या अंकाला ६९ वर्षे या वर्षी पूर्ण झाली आहेत. दरवर्षी एक विषय घेऊन त्यावर मुलांकडून लेख लिहून घेतले जातात. विद्यार्थी स्वत: प्रयत्नपूर्वक लेख लिहितात आणि त्यासाठी शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन प्राप्त होते. विद्यार्थ्यांना आपले विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी प्रकाश हे हक्काचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांची सृजनशीलता विकसीत व्हावी, त्यांचे मानसिक स्वरूपात लिखाण प्रसिद्ध व्हावे हा प्रकाश मासिकामागील प्रमुख उद्देश आहे. लेखांबरोबर कविता, चुटकुले, विनोद/ विविध प्रकारची कोडी, शब्दकोडी इ. विविध स्वरूपाचे लिखाण अंकात समाविष्ट केले जाते. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांनी विविध स्वरूपाचे साहित्य वाचण्याचा प्रयत्न करावा जेणे करून त्यांची भाषा समृद्ध व्हावी असा व्यापक विचार त्यामागे आहे. या आधी सण, पर्यावरण, गड व किल्ले, उद्योग, खेळ, कला, निवडणूक इ. विविध विषय या वार्षिक अंकासाठी हाताळण्यात आले आहेत.
या वर्षीचा अंक शिक्षण या संकल्पनेवर आधारित आहे. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण, ज्ञानरचनावाद, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयावर तुलनेने कमी हस्तलिखिते तयार होतात. पण इथे बीजिंग ऑलिंपिक, पर्यावरण दिनविशेष दिनदर्शिका अशी वेगळ्या विषयांवरील हस्तलिखिते ही आहेत. प्रत्येक हस्तलिखित हे संग्राह्य़ अशा स्वरूपाचे आहे आणि खरोखरच इथे हस्तलिखितांचा उत्तम साठा पाहावयास मिळतो.
ठाण्यातील सौ. आनंदीबाई जोशी इंग्रजी शाळेच्या रोशनी मासिकाचे या वर्षी २२ वे वर्ष आहे. या वर्षीच्या अंकाच्या मुखपृष्ठावर माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे पोट्र्रेट आहे आणि ते अतिशय उत्तम दर्जाचे आहे. अंकाचे वैशिष्टय़ म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या चारही भाषेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख, कविता, विनोद, विविध प्रकारची कोडी इ. वैविध्य स्वरूपातील लेख वाचावयास मिळतात. त्यामध्येदेखील इतिहास, भूगोल, विज्ञान किंवा विज्ञान/ तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन संशोधन इ. विषयांसंदर्भातील माहितीपूर्ण लेख असतात. इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेले डॉ. कलाम यांच्यावरील लेख आहेत.या वर्षीच्या रोशनी मासिकात मोनालिसा पेंटिंगची (रहस्ये) माहिती, भारतीय सैन्याविषयीची माहिती, भारतीय ध्वजाची माहिती, हिरोशिमा नागासाकी घटनेला ७० वर्षे पूर्ण झाली. त्या विषयावरील लेख असे माहितीपूर्ण लेख आहेत. मराठीत आपल्या आयुष्यातील दोन मोलाचे दिवस, नात्यातील रेशीमबंध असे काहीसे वेगळे लेख आहेत. हिंदीमध्ये सुमित्रानंदन पंत या महान कवीवरील छान लेख आहे. त्याचबरोबर हिमालयाचे महत्त्व, संत गाडगे महाराज यांच्यावरील लेख आहेत. प्रत्येक पानाच्या खालच्या बाजूस छान सुविचार, थोर व्यक्तींची बोधप्रद वचने/ प्रसिद्ध वाक्ये (चारही भाषेतील) आहेत. विशेष म्हणजे अंकात कोणतीही जाहिरात नसते.
काही शाळांमधील ग्रंथालयातील जुनी हस्तलिखिते/मासिके चाळताना कालानुरूप विषयांमधील, एकंदरीत आराखडय़ामधील फरक जाणवतो. पण काही शाळा प्रयत्नपूर्वक परंपरा जोपासू पाहात आहेत ही एक सकारात्मक बाबच म्हणावी लागेल.
मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares