शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील खरीप पिकांची अंतिम आणेवारी पन्नास पैशांच्या आत जाहीर झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांपुढे प्रशासन झुकल्याचे दिसत असून, गतवर्षीची चूक दुरूस्त करण्यात आली आहे. अतिवृष्टी, सततच्या पावसाने खरीप हंगाम वाया गेला असताना प्रशासनाकडून नजर व सुधारित आणेवारी पन्नास पैशांच्या पुढे जाहीर झाल्याने, शेतकर्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. ही आणेवारी कमी लावण्यात यावी, यासाठी काही संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर अंतिम आणेवारी किती जाहीर होते, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले होते. वेळप्रसंगी याबाबत शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, आणेवारी कमी जाहीर झाल्याने हे वातावरण निवळले गेले आहे .
यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसाने खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. कपाशी, बाजरी, मूग आदी पिके वाया गेली. कपाशीचे उत्पन्न कमालीचे घटल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी शासनाच्या विविध योजनांची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, यासाठी अंतिम आणेवारीची प्रतिक्षा होती. गतवर्षी आघाडी शासनाच्या काळात अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले असताना, प्रशासनाने आणेवारी जाहीर करताना चूक केल्याने भाजपाने याबाबत आरोप केले होते. यंदा मात्र शिंदे सेेना -भाजपा युतीने मागील वर्षीच्या चुकीत सुधारणा केल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.
जाहीर झालेली खरीप पिकांची अंतिम आणेवारी अशी :
बेलगाव, दिवटे, कोनोशी, मुरमी, शोभानगर, शेकटे खु, थाटे, ठाकुर निमगाव, सेवानगर (47 पैसे), अधोडी, अंतरवाली बु, बाडगव्हाण, बोधेगाव, गोळेगाव, हसनापूर, कोळगाव, लाडजळगाव, माळेगाव ने, नजिक बाभूळगाव, राक्षी राणेगाव सालवडगाव सुळे, पिंपळगाव, सोनेसांगवी शिंगोरी, शेकटे बु, सुकळी (48 पैसे), अंतरवाली खु. शे, चेडेचांदगाव, मंगरुळ बु, मंगरुळ खु, नागलवाडी, वाडगाव, वरखेड (49 पैसे).
‘पुढारी’ने उठविला आवाज
नजर व सुधारित आणेवारी जाहीर होताच दै. पुढारीने याबाबत वृत्ताच्या माध्यमातून जागृती करण्याचा प्रयत्न केला. शिवाय अंतिम आणेवारी जाहीर होण्याअगोदर प्रशासनाला शेतकर्यांच्या संतापाची जाणीव करून दिली होती. त्याची प्रशासनाकडून दखल घेण्यात आल्याचे दिसून आले आहे.

Article Tags:
news