‘स्वाभिमानी’ने बांधले विमा प्रतिनिधीचे हात – Agrowon

Written by

अमरावती : वीमा प्रतिनिधीकडून सर्वेक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांना पैशाची मागणी त्यासोबतच अपुरा परतावा या कारणावरून संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीचे हात बांधत त्याला जेरबंद केले. जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.१४) घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. अमरावती जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी द्वारे शेतकऱ्यांना वीमा परतावा देण्यात आला. मात्र ३००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम १००० रुपयांपेक्षा कमी आहे. विमा कंपनीने उशिरा प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा केला नाही, तक्रारी केल्यानंतर विमा कंपनीकडून पंचनामाचे सोपस्कार पूर्ण झाले नाही, तक्रारी करूनही अनेक शेतकरी भरपाई पासून वंचित आहेत, ज्यांच्या खात्यात पैसे आले ते देखील अपुरे असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
इतकेच नाही तर पंचनाम्यासाठी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांना पैशाची मागणी केली असाही आरोप स्वाभिमानी कडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नुकसानीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे निर्देश कंपनीला दिले होते. त्याची पूर्तता देखील कंपनीकडून करण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धामणगाव रेल्वे येथील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बुधवारी धडक दिली. यावेळी भारतीय कृषी विभाग कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी नितीन सावळे यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र चर्चेत आंदोलकांचे समाधान न झाल्याने त्यांनी कंपनीकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत वीमा प्रतिनिधीला सोडणार नाही अशी भूमिका घेतली. त्याचवेळी काही पदाधिकाऱ्यांनी वीमा प्रतिनिधी नितीन सावळे यांचे हात बांधले. त्यामुळे वातावरण चांगले तापले होते. अखेरीस विमा प्रतिनिधी नितीन सावळे यांनी शेतकऱ्यांबाबत कंपनीच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून कळविणार असल्याचे लेखी दिले. त्यासाठी दोन दिवसाचा वेळ मागण्यात आला.
स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नमते घेत दोन दिवसासाठी हे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड. चेतन विनायक परडखे, कपिल किशोर पडघान, प्रशांत शिरभाते, छोटूभाऊ रामचंद्र मुंदे, तेजस सुरेशराव मुंदे, उमेश शिवरकर, सूरज शिवरकर यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. स्वाभिमानीच्या या आंदोलनाच्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चाने कक्षात होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बैठक असल्याचे सांगत त्यांनी तेथून काढता घेतला. विमा प्रतिनिधीला सोबत नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र स्वाभिमानीने तो हाणून पाडला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
© agrowon 2022

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares