Solapur Yashaswini Agro Farmers Producer Company Founded By … – Maharashtra Times

Written by

अनिता माळगे यांनी सुरुवातीला परिसरातील महिला शेतकऱ्यांना एकत्र करत एक गट तयार केला.बोरामणी या गावात शेतकरी गटाची स्थापना त्यांनी केली. काही दिवसांनी महिला शेतकऱ्यांचे दहा गट तयार केले. दहा गटांना सामूहिक शेती,विक्री व्यवस्था,मार्केटिंग आदी विषयांवर तज्ज्ञांची मार्गदर्शन करण्यात आलं.दहा गटांच्या स्थापनेनंतर शंभर महिला जोडल्या गेल्या.आत्मा या संस्थेमार्फत या शेतकरी महिलांना सामूहिक शेती करण्यासाठी मार्गदर्शनपर शिबिरे घेऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.पाहता पाहता २०१५ पर्यंत या महिला गटांची संख्या १८ झाली जवळपास एक हजार महिला जोडल्या गेल्याचं अनिता माळगे सांगतात.

शेतकरी महिला गट स्थापन केल्यानंतर शेतकरी महिलांची कंपनी स्थापन करण्यात आली. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यापूर्वीचं उत्पादन व विक्री सुरू करण्यात आलं होतं.कंपनी स्थापन होण्याअगोदर या महिला विविध प्रकारच्या पिकांची लागवड करुन उत्पादन घेत होत्या. यशस्विनी अ‍ॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना २०१५ मध्ये करण्यात आली. कंपनीकडून ज्वारीपासून विविध वस्तू तयार करून विक्री केली जाऊ लागली. पुढे डाळ मिलची स्थापना करण्यात आली,मिरची कांडप मधून विविध प्रकारचे मसाले तयात करून त्याची योग्य पॅकिंग करून विक्रीची व मार्केटिंगची व्यवस्था करण्यात आली, असं अनिता माळगे सांगतात. तूर,मूग, हरभरा,उडीद, सोयाबीन,मका, गहू, बाजरी, ज्वारी या उत्पादनावर प्रक्रिया कंपनीद्वारे केली जाते. कडक भाकरी,लोणचे,मसाले यासारखे पदार्थ देखील यशस्विनी या कंपनीत तयार केले जात आहे.

अनिता माळगे यांनी यशस्विनी अ‍ॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीत फक्त महिलाच काम करताना दिसतात, अशी माहिती दिली. प्रत्येक गटातील महिला विविध मालांचे उत्पादन घेतात.शेतकऱ्यांकडून माल घेऊन त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचे उत्पादन करून त्याची विक्री करण्याची जबाबदारी महिलाच पार पाडतात.जवळपास ३६ प्रकारची उत्पादनं या कंपनीद्वारे घेतली जातात. कंपनीचा वाढता व्याप आणि उलाढाल पाहून महिला शेतकऱ्यांच्या विविध समित्या या यशस्विनी अ‍ॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीत काम करतात.कंपनीच्या संचालक मंडळावर ही महिला शेतकरी काम करतात, अशी माहिती अनिता माळगे यांनी दिली.

पुणे,मुंबई,विविध प्रदर्शने,महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा माल शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी यशस्विनी अ‍ॅग्रो फार्मर्स कंपनी पार पाडत आहे. कोणत्याही प्रकारच्या पॉलिशिंग शिवाय डाळ ग्राहकांना विक्री केली जाते. अनिता माळगे यांनी त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीला डी मार्ट, रिलायन्स रिटेल, आयटीसीचा विक्रेता कोड मिळाल्याची माहिती दिली. रिलायन्स फ्रेश सारख्या मोठ्या कंपनीसोबत करार केल्याचं देखील अनिता माळगे यांनी सांगितलं. आमच्या कंपनीची दर महिन्याची उलाढाल 4 कोटी रुपयांची असल्याचं माळगे सांगतात. शेतकरी महिलांनी तयार केलेल्या मालाची लवकरच परदेशात विक्री केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आपली यशस्विनी अ‍ॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील ३२ गावातील १४०० महिलांनी एकत्र येत कंपनी स्थापन केली आहे. सध्या यशस्विनी कंपनीत ५० ते ५५ महिला जबाबदारी पार पाडतात. शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करुन विक्री करतो, असं अनिता माळगे म्हणाल्या. सुरुवातीपासून खूप अडचणी आल्या पण आम्ही सकारात्मक राहिलो, असं त्या म्हणाल्या. नाबार्ड, आत्मासोबत स्मार्ट आणि मॅग्नेट प्रकल्पाचं सहकार्य मिळतं. सोलापूर जिल्ह्यात आत्माच्या माध्यमातून त्यांनी ९५ गट स्थापन केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दीड लाख महिला शेतकरी आमच्याशी जोडल्या गेल्याचं अनिता माळगे सांगतात. शेतीपुरक उद्योगासाठी आम्ही प्रत्येक महिलेला ५० हजार प्रमाणं एका गटाला पाच महिलांसाठी अडीच लाखांचं कर्ज याप्रमाणं २२ कोटींचं वाटप केल्याचं अनिता माळगे म्हणाल्या. आम्हाला नाबार्ड, विदर्भ कोकण बँक आणि यशस्विनी अ‍ॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असा आमच्यात त्रिपक्षीय करार झाल्याचं माळगे म्हणाल्या. नाबार्डच्या माध्यमातून पाच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्याचं त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या कंपनीचं कौतुक केल्याचं अनिता माळगे म्हणाल्या.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares