आस्थेवाईक आणि उपायात्मक – दिव्य मराठी

Written by

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
‘शेतकरी बांधवांनो, जे विकतं ते पिकवा’ हे संतोष देशमुख यांचे नवे पुस्तक. शेती व शेतकरी यांच्या भवितव्याचा विचार मांडणारा एक तरुण लेखक शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून शेतकऱ्यांचा आधारवड होऊ पाहतो आहे…
गावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गावाने सामूहिक प्रयत्न करणे जसे लेखकाला गरजेचे वाटते, तसेच सरकारनेही उक्तीप्रमाणे कृती करणे गरजेचे आहे…

कृषीप्रधान देश म्हणून ओळख असणाऱ्या भारतातील लाखोंचा पोशिंदा जगण्यापेक्षा मरणाला कवटाळत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न हा केवळ चिंतेचाच विषय नसून गहन चिंतनाचाही विषय बनत चाललेला आहे. शेतीचे नैसर्गिक आधार व शेतकऱ्यांचे भावनिक – मानसिक आधार तुटत चालले असल्यामुळे आर्थिक विवंचनेतून हतबल होऊन शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. शेतमालाला हमीभाव नाही. रासायनिक खते व कीटकनाशके, बी बियाणे व मजुरीचे वाढते दर, मजुरांची कमतरता, पुढाऱ्यांची पोकळ आश्वासने, सुशिक्षित तरूणांचा शेतीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, व्यापाऱ्यांची संघटित लुटीची वृत्ती, शासकीय कर्मचाऱ्यांचा उदासिन दृष्टिकोन, पर्यावरणाचा होत गेलेला ऱ्हास अशा नानाविध प्रश्नांच्या गर्तेत हा शेतकरी सापडला आहे. १९९५ ते २०१६ पर्यंत देशात ३ लाख ३२ हजार ७९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील ६९ हजार ४४ आणि २०१७ आणि २०१८ वर्षांचा आकडा पकडला, तर तो ७२ हजारांवर जातो. हे वास्तव पत्रकार, लेखक संतोष देशमुख यांना अस्वस्थ करते. या अस्वस्थतेतून ते शेतीची हत्या व शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टिकोनातून उपायात्मक लिखाण करतात. या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकाचे मूल्य अधिक आहे.
एकीकडे अनेक अभ्यासक शेतीचे भयावह व नकारात्मक चित्र मांडत असताना लेखक स्वानुभवातून सामाजिक बांधिलकीची जोपासना करत, शेती व शेतकरी सुधारू शकतो, असा थेट संदेश या लेखन प्रपंचातून देतो. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत जाणे, प्रश्नांच्या तीव्रतेची जाणीव करून देणे, नंतर निर्माण झालेल्या प्रश्नांचा गुंता सोडवणे, तथा त्यावरील उपाय सांगणे अशा स्वरुपाची मुद्देसूद मांडणी हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. नानाविध संकटावर मात करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करणाऱ्यांच्या यशोगाथा लेखकाने या पुस्तकात आवर्जून मांडलेल्या आहेत. ही प्रेरणादायी शिदोरी आपणासमोर मांडत असताना बहुपीक पद्धती व गटशेतीला प्राधान्य देण्याचे सुतोवाच केले आहे. तसेच गटशेतीचे प्रयोग यशस्वी करत असताना सरकारने शेतकऱ्यांना उत्तम रस्ते, २४ तास वीज, पाण्याची व्यवस्था, माल साठवणूक व्यवस्था,कल्याणकारी योजनांची प्रभावी व योग्य अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागू शकतात, यावर लेखकाचा विश्वास आहे.
आज, देशांतर्गत व देशाबाहेरील बाजारपेठा शेतकऱ्यांना खुणावत आहेत. मात्र, शेतकरी उद्योजक होण्यासाठी सरकारची ध्येय धोरणे शेतीला पुरक असावीत. सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास शेतकरी आत्मविश्वासाने उभा राहील, असा आशावाद त्यांच्या लेखणीत पदेापदी दिसतो आहे. शेतकऱ्यांनी शेतीचा पोत, पाणी, वातावरण आदी बाबींचा विचार करून गटशेती, बहुपीक पद्धतीला प्राधान्य देऊन उत्पादीत माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवल्यास दोघांनाही आर्थिक फायदा होईल. यासाठी ‘शेतकरी ग्राहक बाजार’ निर्मितीवर भर देण्याचे देशमुख यांनी सुचवले आहे. एकेकाळचा वैभवसंपन्न अवस्थेत जीवन जगणारा शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. बँकेकडून, सावकाराकडून कर्ज घेताना तो मेटाकुटीला येतो. बँकेकडून एक लाखाचे कर्ज घेण्यासाठी त्याला दहा हजाराचे कमिशन द्यावे लागत आहे. याशिवाय देवाच्या नावाने चालणाऱ्या सावकारीचा नवीन संदर्भ देऊन आपल्याला माहिती नसणाऱ्या मुद्याला त्यांनी नव्याने स्पर्श केलेला आहे. विमा, शेअरमार्केट, खासगी संस्थेत एजंटामार्फत पैसा गुंतवताना त्याची विश्वासार्हता तपासून पाहण्याचा अचूक सल्लाही  दिलेला आहे.

दर्जेदार बियाणे मिळणे, हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. तसेच ती सरकारची जबाबदारीही आहे. पण नको असलेले दर्जाहीन बियाणे  लिकिंग पद्धतीने शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्यामुळे शेतकऱ्यांची अधोगती अर्थात कृषीप्रधान देशाची वाताहत होत आहे. बियाणे निर्माण करणाऱ्या देशी कंपन्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बदं पडत चालल्या आहेत. परिणामी, विदेशी कंपन्याचे फावत असून त्यांच्या मनमानीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. बियाण्यांच्या संदर्भात शेतकरी आज पुरता परावलंबी झालेला आहे. बदलत्या वातावरणात तग धरणारे, पाणी, तापमान व कीड यावर मात करणारे सहनशील वाण देशी संशोधनातून निर्माण झाले व ते शेतकऱ्यांना किफायतशीर भावात विनासायास उपलब्ध करून दिले तरच शेती व शेतकरी टिकेल, हा आशावाद आहे.

भारतात औषधी वनस्पतीशी संबंधित ४०० कोटींची उलाढाल होते. जागतिक स्तरावर या वनस्पतींना मागणी असल्यामुहे अशी शेती करण्याला शेतकऱ्यांनी पुढकार घेण्याचे आवाहन लेखकाने केले आहे. याशिवाय उत्तम दर्जाचे मसाला पिके शेतातून पिकवावेत. शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीला प्राधान्य दयावे. रेशीम शेती, बांबू शेती, फुलशेती, गवताची शेती, चारापीके, औषधी वनस्पती, काजू, बदाम, खजूर, ड्रगन फ्रुट, जट्रोफा आदी पीक पद्धतीला महत्त्व देणे लेखकाला उपयुक्त वाटते. शेतीला पूरक जोडधंदा, हवामान बदलावर आधारित शेती व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीला प्राधान्य, बाजारापेठेनुसार पीक घेण्यावर भर देण्याचा लेखकाने दिलेला महत्त्वपूर्ण सल्ला शेतकऱ्यांच्या पचणी पडणारा आहे.

पर्यावरणाचा ढासाळलेला समातोल राखण्यासाठी राज्यात ‘ट्री क्रेडिट योजना’ राबवून वृक्षसंवर्धन करावे. याची संपूर्ण जबाबदारी सरकारने शेतकऱ्यांवर टाकून प्रतिशेतकरी दोन हजार रुपये अनुदान द्यावे. हवामानाच्या अचूक अंदाजासाठी २४ तास सुरु राहील, अशी नवीन दूरदर्शन वाहिनी सुरु करावी. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी चौकस राहावे. नवनवीन प्रयोग यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. केवळ नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. तर पूरक ध्येय धोरणाची आखणी व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यातच सर्वांचे हित आहे,   
मात्र, एका शेतकऱ्याने एखाद्या पिकाची लागवड केली म्हणून मीही लागवड करतो ही चढाओढीची मानसिकता बंद व्हावी. या धावपळीच्या चंगळवादी दुनियेत पायापुरतेच पाहण्याची संकुचित मनोवृत्ती आत्मघातास कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर लोकवर्गणीतून मुला-मुलींचे शिक्षण, आजारपण दूर करण्याचे काम काही गावातून केले जात असल्याच्या सुखद वास्तवाची त्यांनी या पुस्तकाद्वारे नोंद घेतली आहे.  हेही खरेच की,  गावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गावाने सामूहिक प्रयत्न करणे, जसे लेखकाला गरजेचे वाटते, तसेच सरकारनेही उक्तीप्रमाणे कृती करणेगरजेचे आहे. गावासाठी नियुक्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या न हाकता खेड्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. लोककल्याणकरी योजनांची लोकांना माहिती देऊन योग्य अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यास निश्चित मदत होईल, अशीही सकारात्मक विचारांची मांडणी लेखकाने केली आहे. 

या पुस्तकाला  परभणी येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांची प्रस्तावना असून, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी पुस्तकाची पाठराखण केलेली आहे. सरकारने लेखकाची दखल घेऊन, शेतकऱ्यांनी लेखकाने दिलेला सल्ला अंमलात आणून मार्गक्रमण केल्यास शेती आणि शेतकऱ्यांचे भयावह चित्र बदलेल, अशी अाशा कायम आहे. पंचफुला प्रकाशनची ही निर्मिती संग्राह्य झाली आहे.
(लेखक ग्रामीण साहित्याचे अभ्यासक तथा शिवछत्रपती महाविद्यालय, सिडको, औरंगाबाद येथे मराठी विभाग प्रमुख आहेत.)

डॉ. वैजनाथ कदम
kadamvaiju25@gmail.com
संपर्क : ९४२३७४२०५७
 
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares