कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या एकमेव महिला पायलटची थरारक कथा! – InMarathi

Written by

मनोरंजन, ज्ञान, वैचारिक…सर्वकाही…"InMarathi"…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 
===
१९९९ साली पाकिस्तानने त्यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत परत भारतात घुसखोरी केली. १९९९ सालच्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारताची सीमा ओलांडली आणि त्यांनी भारताच्या हद्दीतील अनेक चौक्यांवर कब्जा केला.
ह्या घुसखोरांना हुसकावून परत हाकलवून लावण्यासाठी कारगिलच्या युद्ध सुरु झाले. ज्या ज्या ठिकाणी ह्या घुसखोरांनी चौक्यांवर कब्जा केला होता, ती ठिकाणं कारगिल आणि द्रास ह्या परिसरात अत्यंत उंच आणि दुर्गम स्थानी आहेत.
त्या घुसखोरांना हुसकावून लावून आपल्या चौक्यांवर कब्जा मिळवण्यासाठी भारताला कडवे प्रत्युत्तर द्यावे लागले. अखेर अनेक वीरांचे हौतात्म्य आणि शौर्याची किंमत चुकवून भारताने आपल्या चौक्या परत काबीज केल्या.
अतिउंचावर झालेले युद्ध म्हणून ह्या युद्धाकडे बघता येईल. ह्यात युद्धासाठी लागणारी सामुग्री आणि मनुष्यबळाची ने -आण करण्याचा चांगलाच अनुभव भारताला मिळाला.
 
INDIAN ARMY SOLDIERS FIRE ARTILLERY SHELLS TOWARDS KASHMIR InMarathi
 
खरंतर तेव्हा भारत अण्वस्त्रसज्ज झाला होता, आणि त्यामुळे पाकिस्तानच्या ह्या घुसखोरीवर भारत काय प्रत्युत्तर देतो ह्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. पण भारताने संयम दाखवत हे युद्ध कारगिलपुरतेच मर्यादित ठेवले.
त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला पाकिस्तानला अमेरिकेसकट अनेक देशांनी कारगिलमधून सैन्य मागे घेण्याचा इशारा दिला. ह्या युद्धात आपण आपले अनेक सैनिक बांधव गमावले.
त्यांच्या शौर्य आणि त्यागामुळेच ह्या युद्धात पाकिस्तानला धूळ चाटवण्यात आपल्याला यश मिळाले. ही कामगिरी यशस्वी करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या एकमेव महिला पायलट गुंजन सक्सेना ह्यांच्याबद्दल मात्र फार कमी लोकांना ठाऊक आहे.
गुंजन सक्सेना आणि श्रीदिव्या राजन ह्या दोघींविषयीं बोलताना सर्वप्रथम हे जाणून घेतले पाहिजे की त्या भारतीय सैन्यातील पहिल्या फायटर पायलट आहेत ज्यांनी अगदी खऱ्या युद्धात भाग घेऊन शत्रूवर हल्ला केला आहे.
कारगिलचे युद्ध हे असे पहिले युद्ध होते, ज्यात महिला पायलटने भाग घेतला होता.
 
Gunjan Saxena
 
गुंजन सक्सेना ह्यांच्या कुटुंबातच देशसेवा भिनलेली आहे. देशासाठी शौर्य गाजवणे हे त्यांच्या रक्तातच आहे. त्यांचे वडील व भाऊ दोघेही सैन्यात होते. त्यामुळे त्यांच्या मनावर लहानपणापासूनच देशसेवेचे संस्कार झाले.
त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजातून पदवी घेतल्यानंतर सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला हे बघून कुणालाही फार आश्चर्य वाटले नाहो. १९९४ साली भारतीय वायुसेनेने पहिल्यांदा महिलांना वैमानिक होऊन देशसेवेची संधी देण्याचे ठरवले.
त्या पहिल्या २५ ट्रेनी महिला पायलट्सच्या बॅच मध्ये गुंजन सक्सेना आणि श्रीदिव्या राजन ह्या दोघी देखील होत्या. ह्या २५ महिला म्हणजे देशसेवा करण्याचे ध्येय जोपासलेल्या तरुणी होत्या.
जरी महिलांना फायटर स्क्वाड्रनमध्ये भाग घेता येण्यासाठी २०१६ साल उजाडले, पण ह्याचा श्रीगणेशा गुंजन आणि श्रीदिव्या ह्यांनी १९९९ सालीच केला होता.
 
gunjan-saxena-srividya-rajan-9c3a
 
त्याकाळी महिलांना वायुसेनेत प्रवेश देण्याबद्दल अनेकांना आक्षेप होता. कारण ह्या ठिकाणी काम करायचे म्हणजे प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण गुंजन आणि श्रीदिव्या ह्यांनी हे दाखवून दिले की स्त्रिया सुद्धा फायटर पायलट होऊ शकतात.
त्यांच्यात सुद्धा ती क्षमता नक्कीच असते. त्यांनी भारतीय तरुणींपुढे एक आदर्श प्रस्थापित केला.
पण हे करणे त्यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. सैन्यात जाणे ही पुरुषांची मक्तेदारी समजली जात असे. आणि त्यामुळे स्त्रियांना सैन्यात प्रवेश देण्याविषयी फारशी अनुकूलता नव्हती.
ज्या स्त्रियांची निवड होत असे, त्यांनाही अगदी कठीण परीक्षा द्यावी लागत असे. जी कामे पुरुष करू शकतात, त्याच जबाबदाऱ्या स्त्रिया देखील उत्तमप्रकारे हाताळू शकतात हे त्यांना सिद्ध करून दाखवावे लागत असे.
गुंजन आणि श्रीदिव्या अश्याच संधीच्या शोधात होत्या. त्यांना १९९९ च्या कारगिल युद्धाच्या रूपाने स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळाली.
फ्लाईट लेफ्टनन्ट गुंजन सक्सेना आणि फ्लाईट लेफ्टनन्ट श्रीदिव्या राजन ह्यांना फायटर जेट चालवण्याचा अनुभव नव्हता. पण त्यांनी यशस्वीपणे अश्या ठिकाणी विमान/ हेलिकॉप्टर चालवले जिथे पाकिस्तानी सैन्याचा हल्ला सुरु होता.
ते शस्त्रास्त्रे वापरून कसेही कुठेही समोर दिसेल त्यावर हल्ला करत होते. युद्ध जोमात सुरु होते आणि आर्मीला ह्या युद्धासाठी प्रत्येक पायलटची आवश्यकता होती. त्यामुळे महिला पायलट्सना बोलावण्यात आले आणि त्यांच्यावर वैद्यकीय निर्वासनाची जबाबदारी सोपवण्यात आली.
 
Women Army Inmarathi
 
तसेच सप्लाय ड्रॉप्स आणि युद्धाच्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याची जागा शोधण्याची जबाबदारी सुद्धा त्यांना देण्यात आली. गुंजन आणि श्रीदिव्या ह्यांचे लहान “चीताह” हे हेलिकॉप्टर निःशस्त्र होते, तसेच शत्रूंच्या हल्ल्यात ते पूर्णपणे असुरक्षित होते.
पण तरीही ह्या दोन शूर महिलांनी ह्या कशाचेही भय न बाळगता उत्तर काश्मीरच्या धोकादायक क्षेत्रात हेलिकॉप्टर उडवले. एकदा एका हल्ल्याच्या वेळेला पाकिस्तानी सैन्याने गुंजन ह्यांच्या चॉपरच्या दिशेने एक रॉकेट सोडले.
पण ते रॉकेट थोडक्यात हुकले आणि हेलिकॉप्टरला न धडकता बाजूच्या डोंगरावर जाऊन पडले.गुंजन आणि श्रीदिव्या ह्यांना असे अनेक अनुभव आले ज्यात त्यांनी मृत्यू अगदी जवळून बघितला.


इतर सर्व भारतीय सैनिकांप्रमाणेच ह्या दोघीही देशासाठी प्राण देण्यास सर्वस्वी तयार होत्या. चुकून जर विमान शत्रूच्या हद्दीत विमान कोसळले तर तयारी असावी म्हणून गुंजन ह्यांच्याकडे INSAS असॉल्ट रायफल तसेच रिव्हॉल्व्हर सुद्धा होती.
NDTV ला दिलेल्या मुलाखतीत गुंजन ह्यांनी सांगितले की जेव्हा त्या जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरमधून नेत असत तेव्हा त्यांना देशासाठी लढण्याची आणखी प्रेरणा मिळत असे. त्या म्हणतात की , “एक हेलिकॉप्टर पायलट म्हणून तुमच्या मनात येणारी ही सर्वश्रेष्ठ भावना असू शकते.
जखमी सैनिकांना हॉस्पिटलला पोचवणे ही इतर महत्वाच्या जबाबदाऱ्यांपैकी एक महत्वाची जबाबदारी होती. एखाद्याचा जीव वाचवणे ह्यापेक्षा मोठे दुसरे कुठलेच समाधान असूच शकत नाही. कारण त्यासाठीच तुम्ही तिथे असता. ”
 
Rescue operation
 
महिलांसाठी सैन्यात फार कमी संधी आहेत. त्यामुळे सात वर्षांच्या सेवेनंतर गुंजन ह्यांनी निवृत्ती घेतली. कारगिल युद्धात दाखवलेल्या त्यांच्या ह्या असामान्य शौर्यासाठी त्यांना शौर्य वीर पुरस्कार मिळाला.
सैन्याकडून असा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. गुंजन आणि श्रीदिव्या ह्यांना कधी फायटर जेट चालवण्याची संधी मिळाली नाही.
त्यांच्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वायुसेनेत किंवा सैन्यात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणींचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला. गुंजन ह्यांना “कारगिल गर्ल” म्हणून ओळखले जाते. त्यांनी आयुष्याचा साथीदार म्हणून वायुसेनेतीलच अधिकाऱ्याची निवड केली.
देशासाठी कार्य करून झाल्यानंतर आता त्या त्यांच्या घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. कारगिल गर्ल गुंजन ह्यांना एक कडक सॅल्यूट!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
जवान
कोण म्हणतं स्त्रिया अबल असतात?मनात आलं तर कांही करु शकतात.’त्रिवार वंदन तुम्हा’
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares